एमआयडीसी क्षेत्रातील उद्योग समुहांना 2 टर्शिअरी ट्रिटमेंट प्रकल्पातील पुनर्प्रक्रियाकृत पाणी डिसेंबरपासून होणार उपलब्ध- नवी मुंबई महानगरपालिका व एमआयडीसीमध्ये सामंजस्य करार
नवी मुंबई हे झपाट्याने विकसित होणारे शहर असून येथील वाढत्या लोकसंख्येचा दूरगामी विचार करून महाराष्ट्र शासनाकडून सन 2002 मध्ये मोरबे धरण प्रकल्प हस्तांतरीत करून पूर्ण करण्यात आला. त्यासोबतच पाणी बचतीचे उद्दीष्ट नजरेसमोर ठेवून शहरात दररोज निर्माण होणा-या 450 द.ल.लि. सांडपाण्यावर 100 टक्के शास्त्रोक्त प्रक्रीया करून त्या पाण्याचा पुर्नवापर करणा-या सी-टेक अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत 7 मलप्रक्रिया केंद्रांची उभारणी करण्यात आली.
त्यामध्येही आधुनिकता जपत केंद्र शासनाच्या अमृत मिशन प्रकल्पांतर्गत कोपरखैरणे व ऐरोली येथील मलप्रक्रिया केंद्रांत प्रत्येकी 20 द.ल.लि. क्षमतेचे टर्शिअरी ट्रिटमेंट प्रकल्प (Tertiary Treatment Plant) उभारुन त्यामधील पुर्नप्रक्रियाकृत पाणी टीटीसी औद्योगिक क्षेत्रातील उद्योगसमुहांना पुरविण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार 2017 मध्ये हे काम सुरु करण्यात आले असून या वर्षाअखेरीस डिसेंबर 2021 पर्यंत हे प्रकल्प कार्यन्वित होऊन एमआयडीसी क्षेत्रातील वाशी, कोपरखैरणे, ऐरोली भागातील उद्योग समुहांना पुर्नप्रक्रियाकृत स्वच्छ पाणी पुरविले जाणार आहे.
या टर्शिअरी ट्रिटमेंट प्रकल्पांमध्ये अल्ट्रा फिल्टरेशन व अल्ट्रा व्हायलेट अशा प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून येथील मलप्रक्रिया केंद्रात स्वच्छ होणा-या प्रक्रियाकृत पाण्यावर टर्शिअरी ट्रिटमेंटव्दारे प्रक्रिया केली जाऊन हे पुनर्प्रक्रियाकृत पाणी अधिक स्वच्छ होणार आहे. या पुनर्प्रक्रियाकृत पाण्याची गुणवत्ता केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या गुणवत्ता निकषापेक्षा उत्तम दर्जाची असल्याने तसेच एमआयडीसी कडून टीटीसी औद्योगिक क्षेत्रात पुरवठा करण्यात येणा-या पाण्याइतकी चांगली असल्याने या पुनर्प्रक्रियाकृत पाण्याचा वापर टीटीसी औद्योगिक क्षेत्रातील उद्योग समुहांना पुरवठा कऱण्याचे गृहित धरून हा पथदर्शी प्रकल्प महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाच्या अमृत योजनेअंतर्गत मंजूर केला आहे. केंद्र सरकार, महाराष्ट्र शासन आणि नवी मुंबई महानगरपालिका यांच्यामार्फत हा प्रकल्प एकत्रितपणे राबविण्यात येत आहे.
याविषयी नवी मुंबई महानगरपालिका आणि एमआयडीसी यांच्यामधील सामंजस्य करार महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर आणि एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन यांच्या मान्यतेने नुकताच करण्यात आलेला असून त्यावर महानगरपालिकेच्या वतीने शहर अभियंता श्री. संजय देसाई तसेच एमआयडीसीच्या वतीने मुख्य अभियंता श्री. सुधाकर वाघ यांनी स्वाक्षरी केली आहे. या करारानुसार सदर पुनर्प्रक्रियाकृत पाणी टीटीसी क्षेत्रातील औद्योगिक संस्थाना रु.18.50 प्र.घ.मि. दराने पुरविण्याचे निश्चित करण्यात आले असून त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेस 15 वर्षांमध्ये 494 कोटी इतका महसुल प्राप्त होणार आहे.
सद्यस्थितीत एमआयडीसी मार्फत टीटीसी औद्योगिक क्षेत्रात रु.22.50 प्र.घ.मि. याप्रमाणे 50 द.ल.लि. इतका पाण्याचा पुरवठा केला जात असून त्याजागी नवी मुंबई महानगरपालिकेच्या टर्शिअरी ट्रिटमेंट प्रकल्पातील पुनर्प्रक्रियाकृत पाणी रु.18.50 प्र.घ.मी. या दराने उपलब्ध होणार असल्याने उद्योग समुहांच्या खर्चातही मोठी बचत होणार आहे.
तसेच हे प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर सद्यस्थितीत एमआयडीसी मार्फत उद्योग समुहांना पुरविण्यात येणा-या पाण्याची बचत होणार असून हे बचत झालेले पिण्याचे पाणी एमआयडीसी मार्फत एमएमआरडीए क्षेत्रातील नागरिकांना उपलब्ध होणार असल्याने पाण्याची अडचण दूर होणार आहे. त्याचप्रमाणे केंद्र सरकार व राज्य शासन यांनी जाहीर केलेल्या नागरी भागातील सांडपाणी पुनर्वापर धोरणाची अंमलबजावणी होणार आहे तसेच यामुळे सागरी प्रदूषणही कमी होणार आहे.
सेक्टर 14 कोपरखैरणे येथे 87.50 द.ल.लि. आणि सेक्टर 18 ऐरोली येथे 80 द.ल.लि. क्षमतेची सी-टेक या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत मलप्रक्रिया केंद्रे असून त्याठिकाणी स्वच्छ होणारे सांडपाणी उद्योग समुहांच्या मागणीनुसार अधिक स्वच्छ करण्यासाठी दोन्ही ठिकाणी प्रत्येकी 20 द.ल.लि. क्षमतेचे व उच्च दर्जाचे अल्ट्रा फिल्टरेशन तंत्रज्ञान असलेले टर्शिअरी ट्रिटमेंट प्रकल्प उभारण्यात आले आहेत. या प्रकल्प उभारणीसाठी आवश्यक परवानगी मिळविण्यातील अडचणी दूर करण्यासाठी महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांचेमार्फत शासन पातळीवर सातत्याने पाठपुरावा करण्यात आला असून त्यामुळे या प्रकल्प उभारणीला गती येऊन डिसेंबर 2021 पर्यंत हे प्रकल्प कार्यान्वित होत आहेत.
यामध्ये कोपरखैरणे येथील प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून ऐरोली येथील प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे. येथून एमआयडीसी क्षेत्रातील उद्योग समुहांना पुनर्प्रक्रियाकृत पाणी पुरवठा कऱण्यासाठी 83 कि.मी. पाईपलाईन आणि 24.40 कि.मी. मुख्य जलवाहिनीचे कामही अंतिम टप्प्यात आहे. त्याचप्रमाणे कोपरखैरणे येथे 1.75 द.ल.लि. व ऐरोली येथे 1.70 द.ल.लि. क्षमतेचे भुस्तरीय जलकुंभ त्याचप्रमाणे वाशी येथे 2.50 द.ल.लि., महापे येथे 1.50 द.ल.लि., निब्बाण टेकडी राबाडे येथे 0.75 द.ल.लि. असे उच्चस्तरीय जलकुंभ उभारण्याचे कामही अंतिम टप्प्यात आहे.
सद्यस्थितीत महानगरपालिकेच्या 7 अत्याधुनिक मलप्रक्रिया केंद्रांमध्ये स्वच्छ होणा-या प्रक्रियाकृत पाण्याचा वापर उद्याने तसेच दुभाजकांमधील वृक्षराजी फुलविण्याकरीता करण्यात येत असून त्यामुळे पिण्याच्या पाण्यात बचत होत आहे. यापुढील काळात कोपरखैरणे व ऐरोली येथे प्रत्येकी 20 द.ल.लि. क्षमतेचे 2 टर्शिअरी ट्रिटमेंट प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर एमआयडीसी क्षेत्रातील उद्योग समुहांमध्ये पुरविल्या जाणा-या पाण्यातही बचत होणार असल्याने हे पाणी नागरिकांच्या वापरासाठी उपलब्ध होणार आहे. तसेच पुनर्प्रक्रियाकृत पाणी उद्योग समुहांसाठी घेतल्याने पुरवठा केलेल्या पाण्याची रक्कम नवी मुंबई महानगरपालिकेस उपलब्ध होणार आहे. पर्यावरण संरक्षण व महापालिकेस नागरी सुविधा पुर्ततेसाठी उपलब्ध होणारा निधी या दोन्ही दृष्टीने हे प्रकल्प लाभदायी असून देशात पहिल्यांदाच कार्यान्वित होत असल्याने नवी मुंबई महानगरपालिकेच्या नावलौकीकात भर घालणारे असल्याचे मत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी व्यक्त केले आहे.