नवी मुंबई

कोव्हीडचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका सज्ज

कोरोना बाधीतांची दैनंदिन मोठ्या प्रमाणावर वाढणारी संख्या लक्षात घेऊन “मिशन ब्रेक द चेन” ची आणखी प्रभावी अंमलबजावणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.  महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांचे दैनंदिन स्थितीवर बारीक लक्ष असून सर्व संबंधीत घटकांशी नियमित संवाद साधत कोव्हीड प्रतिबधात्मक उपाययोजनांचे योग्य प्रकारे नियोजन करण्यात येत आहे. या अनुषंगाने तातडीने बैठक आयोजित करत आयु्क्तांनी कोव्हीडचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी तत्पर कार्यवाहीचे निर्देश दिले. याकरिता आठही विभागांकरिता विभाग प्रमुख दर्जाचे समन्वय अधिकारी नेमण्यात आले असून त्यांच्याव्दारे कोव्हीड  उपाययोजनांवर नियंत्रण ठेवले जात आहे.

          कोव्हीडचा वाढता प्रसार रोखण्यासाठी कन्टनमेंट क्षेत्राचे व्यवस्थापन व कोरोना बाधितांच्या संपर्कातील व्यक्ती शोध (कॉन्टॅक्ट ट्रेसींग) या दोन महत्वाच्या बाबींवर विशेष लक्ष केंद्रीत करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिेलेले आहेत.

यामध्ये कन्टनमेंट क्षेत्राच्या व्यस्थापनाची जबाबदारी संबंधीत विभागाचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी यांची असून त्यांनी कंन्टनमेंट क्षेत्राच्या मार्गदर्शक सूचनांनुसार स्थानिक परिस्थितीनुसार तीन कॅटॅगरीमध्ये योग्य प्रकारे प्रतिबंध करावयाचा आहे. रुग्ण संख्येनुसार कन्टनमेंट क्षेत्राची कॅटेगरी निश्चित झाल्यानंतर त्याठिकाणी बॅनर लावणे, सॅनिटायझेशन करणे, पोलीस विभागासह त्या क्षेत्राचे व्यवस्थापन करणे अशा विविध बाबींची जबाबदारी विभाग कार्यालयातील अधिनस्त कर्मचा-यांवर निश्चित करावी व विभाग कार्यालय पातळीवर वॉर रुम तयार करून त्या कार्यवाहीवर नियमित लक्ष ठेवावे असे निर्देश विभाग अधिकारी यांना देण्यात आले.

          गृह विलगीकरणात असलेली व्यक्ती घराबाहेर पडणार नाही याची जबाबदारी सोसायटी पदाधिका-यांवर निश्चित करण्यात यावी. तसेच गृह विलगीकरणातील व्यक्तीच्या हातावर स्टॅंप मारण्यात यावेत व गृह विलगीकरणातील व्यक्ती घराबाहेर पडल्यास त्याच्यावर कायदेशीररित्या गुन्हा दाखल करण्यात यावा असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी दिले.

अशाच प्रकारे कोरोना बाधीताच्या संपर्कातील व्यक्ती शोधाचे प्रमाण (कॉन्टॅक्ट ट्रेसींग) सध्या 25 व्यक्ती इतके असून ते 30 हून अधिक करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात यावी असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी सर्व नागरी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी यांना दिले. अशा व्यक्ती शोधानंतर त्याचे योग्य व्यवस्थापन काटेकोररित्या करणे महत्वाचे असून त्याकडे बारकाईने लक्ष द्यावे असेही आयुक्तांनी सूचित केले.

कोव्हीड उपचार करणा-या महानगरपालिका व खाजगी अशा प्रत्येक कोव्हीड उपचार केंद्रे / रुग्णालये यांच्यासाठी महानगरपालिकेमार्फत समन्वय अधिकारी नेमण्यात आला असून त्यांनी त्यांच्याकडे जबाबदारी असलेल्या केंद्र / रुग्णालयांमधील बेड्सची सद्यस्थिती अवगत करून घ्यावी तसेच महानगरपालिकेच्या बेड्स ॲव्हेलेबलिटी डॅशबोर्डवर तेथील बेड्सची उपलब्धतता नियमित अद्ययावत होत राहील याकडे काटेकोर लक्ष द्यावे असे आयुक्तांनी निर्देशित केले.

प्रत्येक खाजगी रुग्णालयानेही आपल्या रुग्णालयासाठी समन्वय अधिकारी यांची नेमणूक करावी व या दोन्ही समन्वय अधिका-यांनी परस्परांच्या संपर्कात राहून नागरिकांना बेड्स उपलब्धतेबाबत तसेच इतर गोष्टींबाबत कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही याकडे लक्ष देण्याचे आयुक्तांनी सूचित केले. यामध्ये विशेषत्वाने रूग्णालयातील आयसीयू कक्षात उपचार घेणा-या रुग्णांच्या आरोग्य स्थितीबाबत नियमित माहिती घेऊन तेथील बेड्स व्यवस्थापनाबाबत दक्ष राहून लक्ष ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या.

सिडको एक्झिबिशन सेंटर येथे कॉल सेंटर कार्यान्वित करण्याबाबत तत्परतेने कार्यवाही करावी असे सूचित करीत नागरिकांना कोव्हीड उपचारार्थ बेड्स उपलब्धतेबाबत माहिती होण्याच्या दृष्टीने हेल्पलाईन नंबर लवकरात लवकर जाहीर करण्यात यावा असे आयुक्तांनी निर्देशित केले. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन तात्पुरती बंद करण्यात आलेली कोव्हीड केअर सेंटर तत्परतेने सूरु करणेबाबत गतीमान कार्यवाही करण्यात येत आहे त्याला कालबध्द रितीने गती देण्याचे निर्देश आयुक्तांनी अभियांत्रिकी व आरोग्य विभागाला दिले.

           नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरटी-पीसीआर लॅबमधून 24 तासात चाचणी अहवाल प्राप्त होत असून त्यामध्ये कोणत्याही प्रकारे खंड पडता कामा नये असे निर्देशित करीत खाजगी लॅबमधूनही 24 तासात चाचणी अहवाल मिळायलाच हवा अशा प्रकारचे आदेश सर्व लॅबना देण्यात यावेत अशा सूचना आयुक्तांनी दिल्या.

           कोरोना बाधीतांची वाढती संख्या लक्षात घेता महानगरपालिकेने काही निर्बंध जारी केले आहेत त्याचे काटेकोर पालन केले जाणे अत्यंत आवश्यक आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मास्कचा नियमित वापर, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखणे तसेच वारंवार हात धूणे अथवा सॅनिटायझरचा वापर करणे ही आरोग्याची त्रिसुत्रीच कोरोनापासून बचावाची ढाल आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोना सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button