पर्यटकांसाठी नवी मुंबई केंद्रबिंदू ठरणार – खासदार राजन विचारे
प्रतिनिधी – नवी मुंबईतील गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या कांदळवन परिसरातील समस्यांबाबत खासदार राजन विचारे यांनी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक वीरेंद्र तिवारी तसेच नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या समवेत ऐरोली येथील किनारी व सागरी जैवविविधता केंद्र येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीतील विषयांवर महत्त्वपूर्ण असे निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीत ठाणे – बेलापूर मार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी खाडीकिनारी अपूर्ण अवस्थेत विकसित करण्यात आलेला पाम बीच वरील रस्ता जोडण्यासाठी घणसोली-ऐरोली दरम्यान कांदळवनच्या जागेतून १.९५ किलोमीटर लांबीचा पूल तयार करण्यासाठी कांदळवन विभागाला आवश्यक असणारी ४.०१२२ हेक्टर (१० एकर) पर्यायी जागा मीरा भाईंदर येथील राज्य शासनाची जागा निश्चित करण्यात आली असून याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पत्रव्यवहार सुरू करण्याचे आदेश या बैठकीमध्ये घेण्यात आले आहेत.
तसेच पाम बीच येथील सायकल ट्रॅक विकसित करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या परवानगी मिळवून देण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे गवळीदेव सुलाईदेवी या पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी आवश्यक असणारी वाइल्ड लाइफ ची ना हरकत देण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
ऐरोली खाडी किनारी खूप मोठ्या प्रमाणावर फ्लेमिंगो पक्षांचा वावर असल्याने याठिकाणी त्या पक्ष्यांना पाहण्यासाठी पर्यटक आकर्षित होत आहेत. त्यामुळे या कांदळवन परिसरात १४ एकर जागेवर किनारी व सागरी जैवविविधता केंद्राच्या विकासासाठी खासदार राजन विचारे यांनी ४० कोटी निधी उपलब्ध करून घेतला होता. याची स्थिती जाणून घेताना सदर प्रकल्पाला या आर्थिक वर्षात १० कोटी रुपये तरतूद करण्यात आलेली आहे. व लवकरच या कामास सुरुवात होणार आहे. या परिसरात पर्यावरण प्रेमींसाठी पर्यावरण पूरक परिसराचा विकास होणार असून जास्तीत जास्त पर्यटक या ठिकाणी आकर्षित होणार आहेत. खासदार राजन विचारे यांनी या परिसराचा बोटीतून पाहणी दौरा करून जेट्टीची कामे लवकरात लवकर मार्गी लावावी. तसेच पर्यटकांसाठी नव्याने बोटी खरेदी करण्यात याव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. व लवकरात लवकर पर्यटकांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन अपर प्रधान कांदळवन मुख्य वनसंरक्षक वीरेंद्र तिवारी यांनी खासदार राजन विचारे यांना दिले.
तसेच गेल्या अनेक वर्षापासून वंश परंपरागत मासेमारी करून उदरनिर्वाह करणाऱ्या नवी मुंबईतील आगरी कोळी मच्छीमारांच्या तलावातील गाळ काढण्यासाठी कांदळवन विभागा मार्फत बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे येथील मच्छीमारांचे उदरनिर्वाहाचे साधन बंद झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. हा तिढा सोडविण्यासाठी खासदार राजन विचारे सन २०१८ पासून पाठपुरावा करीत होते. यासंदर्भात तात्कालीन कांदळवन विभागाचे मुख्य वन संरक्षक श्री. वासुदेवनंद असताना त्यांच्या दालनात बैठक घेऊन त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करून आपण गाळ काढण्यास परवानगी देऊ असे ठरविले होते. परंतु आजतागायत यावर समिती स्थापन न झाल्याने गाळ काढता आला नाही. त्यामुळे त्या गाळात अमोनिया वायू तयार होऊन मासे मरत असल्याची बाब निदर्शनास आणून दिली. खासदार राजन विचारे यांनी आयोजित केलेल्या बैठकीत तलावातील गाळ काढण्याची परवानगी देण्यात यावी तसेच तामिळनाडू येथे आपल्या विभागामार्फत मच्छिमारांसाठी ज्या योजना राबविल्या जातात त्याच धर्तीवर त्यांनाही आपण त्या योजना सुरू कराव्यात अशी मागणी करण्यात आली. त्यावर अपर प्रधान मुख्य कांदळवन वनसंरक्षक वीरेंद्र तिवारी यांनी या नवी मुंबईत ४०० ते ५०० तलाव असून टप्प्याटप्प्याने तलावातील गाळ डिसेंबर पर्यंत काढण्याची परवानगी दिली आहे. परंतु गाळ काढताना कांदळवनाचे नुकसान होता कामा नये तसेच सदर गाळ काढताना कांदळवन विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीतच गाळ काढण्यात येईल या अटीवर परवानगी देण्यात आलेली आहे. या गाळ काढण्यासाठी पहिली सुरुवात कोपरखैरणे, बनकोडे, घणसोली, तळवली, गोठवली येथून करण्यात येईल असा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे येथील स्थानिक मच्छिमारांना न्याय मिळाला असून सर्व उपस्थित मच्छीमार यांनी खासदार राजन विचारे यांचे आभार मानले आहे.
या बैठकीसाठी कांदळवन डी एफ ओ आदर्श रेड्डी, उप संचालक प्रकल्प कांदळवन फाउंडेशन शीतल पाचपांडे, नवी मुंबई विभागाचे आर एफ ओ नथुराम कोकरे, कुकडे, तसेच नवी मुंबई महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता अरविंद शिंदे, वाघचौरे, जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, उपजिल्हाप्रमुख मनोज हळदणकर, उपशहर प्रमुख राजू पाटील, नाना नाईक, नगरसेवक ममित चौगुले, करण मढवी, चेतन नाईक, विभाग प्रमुख विलास हांडे, भारतीय विद्यार्थी सेनेचे संघटक अमित अगवणे, तसेच स्थानिक मच्छीमारांनमध्ये रांजणदेवी मत्स्य शेती प्रकल्प सेवा संस्थेचे अध्यक्ष वासुदेव वेटा व त्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.