‘मिशन कवच कुंडल’ अंतर्गत 1335 नागरिकांचे त्यांच्या विभागात जाऊन कोव्हीड लसीकरण
महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ‘मिशन कवच कुंडल’ या विशेष कोव्हीड 19 लसीकरण मोहीमेला ११ ऑक्टोबर पासून उत्साहात सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी महानगरपालिका क्षेत्रातील 40 ठिकाणी 1335 नागरिकांचे कोव्हीड लसीकरण संपन्न झाले आहे.
‘मिशन कवच कुंडल’ मोहीम प्रभावी रितीने राबविण्यासाठी महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यमान 101 लसीकरण केंद्रांपासून काहीशी दूर अंतरावर असलेली ठिकाणे निवडून तेथे लसीकरणास प्राधान्य देण्यात येत आहे. याकरिता 4 रुग्णवाहिका व 6 रूग्णवाहिकांमध्ये रूपांतरित केलेल्या बसेस अशा 10 रुग्णवाहिकांव्दारे दररोज 40 वेगवेगळ्या स्पॉटवर जाऊन नागरिकांच्या लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे.
त्याअनुषंगाने ११ ऑक्टोबर रोजी 40 स्पॉटवर 10 रुग्णवाहिकांनी जाऊन 1335 नागरिकांना कोव्हीड 19 लस दिलेली आहे. शासन निर्देशानुसार आजपासून 14 ऑक्टोबर पर्यंत ‘मिशन कवच कुंडल’ मोहीमेअंतर्गत 10 रुग्णवाहिकांव्दारे ‘कोव्हीड लसीकरण आपल्या दारी’ या विशेष लसीकरणाला सुरूवात करण्यात आलेली आहे. या 10 रूग्णवाहिकांपैकी प्रत्येक रूग्णवाहिका दर दिवशी 9 ते 11, 11 ते 1, 2 ते 4 आणि 4 ते 6 अशा वेळांमध्ये निश्चित केलेल्या ठिकाणी उभी राहून कोव्हीड लसीकरण करणार आहे.
नागरिकांना या स्पॉटवरील लसीकरणाची माहिती होण्यासाठी संबंधित नागरी आरोग्य केंद्रांमार्फत त्या परिसरात माईकींगव्दारे माहिती प्रसारण व जनजागृती केली जात आहे. तसेच प्रत्येक जागेवर लाभार्थ्यांना लसीकरणासाठी आणण्याकरिता 3 ते 4 स्वयंसेवक सज्ज असणार आहेत.
मोहिमेच्या पहिल्या दिवशी सीबीडी नागरी आरोग्य केंद्रांच्या क्षेत्रात 50, सेक्टर 48 च्या क्षेत्रात 164, शिरवणे क्षेत्रात 130, इंदिरानगर क्षेत्रात 170, तुर्भे क्षेत्रात 150, वाशीगांव क्षेत्रात 140, महापे क्षेत्रात 200, खैरणे क्षेत्रात 120, पावणे क्षेत्रात 161 व राबाडा क्षेत्रात 50 अशाप्रकारे 10 रुग्णवाहिकांव्दारे 40 स्पॉटवर एकूण 1335 नागरिकांचे कोव्हीड 19 लसीकरण करण्यात आले.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 18 वर्षावरील 10 लक्ष 87 हजार 123 नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतलेला असून 5 लक्ष 54 हजार 900 नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. लोकसंख्येच्या तुलनेत लसीकरणाचे हे प्रमाण राज्यातील मोठ्या शहरांमध्ये सर्वाधिक आहे.
नागरिकांना त्यांच्या घरापासून जवळ लस घेता यावी याकरिता महानगरपालिकेच्या वतीने 101 लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आलेली असून त्यामध्ये आता शासन निर्देशानुसार ‘मिशन कवच कुंडल’ मोहीमेची भर पडलेली असून याकरिता 10 रुग्णवाहिका सज्ज आहेत. तरी नागरिकांनी त्वरित लसीकरण करून घ्यावे व कोव्हीड संरक्षित व्हावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.