डेंग्यू, मलेरिया नियंत्रणासाठी प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर महानगरपालिकेचा भर
एमएमआर क्षेत्रातील डेंग्यूचे वाढते प्रमाण लक्षात घेत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी 27 सप्टेंबर रोजी तातडीने बैठक घेत डास प्रतिबंधात्मक कार्यवाही अधिक प्रभावी रितीने राबविण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने संपूर्ण महापालिका कार्यक्षेत्रात सर्व नागरी आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून अतिसंवेदनशील ठिकाणांचा शोध घेऊन अधिक परिणामकारक पध्दतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यावर भर देण्यात येत आहे.
या अनुषंगाने घरांतर्गत डास उत्पत्ती स्थानांचा शोध, रासायनिक धुरीकरण व आरोग्य शिक्षण अशा विविध उपाययोजना केल्या जात आहेत. या मोहिमेमध्ये आढळणारी दूषित स्थाने त्वरीत नष्ट करण्यात येत आहेत. हिवताप व डेंग्यू आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सायंकालीन विशेष रासायनिक धुरीकरण मोहिमेची व्याप्ती वाढविण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे घरांतर्गत डास उत्पत्ती स्थाने शोध मोहिमेलाही वेग देण्यात आलेला आहे.
आयुक्तांनी विशेष निर्देश दिल्याप्रमाणे 27 सप्टेंबरपासून आत्तापर्यंत 67 हजार 175 घरांना प्रत्यक्ष भेटी देण्यात आल्या असून त्यामध्ये 1 लाख 52 हजार 698 डास उत्पत्ती स्थानांची तपासणी करण्यात आलेली आहे. त्यामधील 408 दूषित आढळून आलेल्या स्थानांपैकी 133 स्थाने पूर्णत: नष्ट करण्यात आलेली असून 275 स्थानांवरील डास उत्पत्ती नष्ट करण्यात आलेली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी येथील सार्वजनिक रुग्णालयात विशेष डेंग्यू कक्ष स्थापन करण्यात आला असून त्याठिकाणी रुग्णांचे समुपदेशन केले जात आहे. त्याचप्रमाणे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत सर्वेक्षणाव्दारे जलद ताप सर्वेक्षण मोहिम राबवून ताप असलेल्या आजारी व्यक्तींचे रक्त नमुने घेतले जात आहेत. अशाप्रकारे 27 सप्टेंबरपासून संपर्कातील 524 व्यक्तींचे तसेच ताप असलेल्या 667 इतर व्यक्तींचे रक्त नमुने घेण्यात आलेले आहेत. 27 सप्टेंबरपासून 75 संशयीत डेंग्यू रुग्ण आढळले असून त्यांच्या सभोवतालच्या परिसरातील किमान 100 घरांमध्ये जलद ताप सर्वेक्षण, डास उत्पत्ती स्थाने शोधून ती नष्ट करणे व रासायनिक धुरीकरण मोहिम राबविली जात आहे.
महापालिका आयुक्त यांच्या निर्देशानुसार नागरिकांच्या माहितीसाठी सार्वजनिक जागा व बस थांबे अशा दर्शनी जागी हिवताप, डेंग्यू विषयी जनजागृतीपर फलक व होर्डींग प्रदर्शित करण्यात आले असून प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रामार्फत माईकिंग करण्यात येत आहे आणि सोसायट्यांमध्ये व वसाहतींमध्ये प्रात्यक्षिके दाखवून डास उत्पत्ती स्थाने निर्माण होऊच नये म्हणून जागरूकता निर्माण करण्यात येत आहे. तसेच सोशल मिडियावरही डास उत्पत्ती रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत व मलेरिया / डेंग्यू झाल्यास घ्यावयाच्या काळजीबाबत माहिती प्रसारित करण्यात येत आहे.
अशाप्रकारे प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यास सुरुवात करण्यात आल्याने हिवताप / संशयीत डेंग्यू रुग्णसंख्येवर काही प्रमाणात नियंत्रण येत असल्याचे निदर्शनास येत असून महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांचे याबाबतच्या कार्यवाहीकडे बारकाईने लक्ष आहे.
तरी सुजाण नवी मुंबईकर नागरिकांनी आपल्या घरात व आजूबाजूच्या परिसरात पाणी साचून डास उत्पत्ती होणार नाही याची खबरदारी घ्यावी तसेच पाणी साठवणूकीची भांडी, टाक्या व ड्रम नियमित रिकामे करावेत आणि आठवड्यातील एक दिवस कोरडा पाळावा. महानगरपालिकेमार्फत आपल्या घरी, सोसायटीत, वसाहतीत रुग्ण संशोधन कार्यवाहीसाठी किंवा डास उत्पत्ती स्थानांचा शोध घेण्यासाठी अथवा रासायनिक फवारणीसाठी येणा-या आरोग्य विभागाच्या कर्मचा-यांना त्यांच्या कामात सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने कऱण्यात येत आहे.