नवी मुंबई

आर्थिक सक्षमतेच्या ‘डबल ए प्लस स्टेबल (AA+ STABLE)’ या राष्ट्रीय पत मानांकनाची नवी मुंबई महानगरपालिका सलग सातव्यांदा मानकरी

“इंडिया रेटींग अँड रिसर्च” (फिच) या राष्ट्रीय स्तरावरील अर्थविषयक मान्यताप्राप्त संस्थेच्या वतीने प्रतिवर्षी विविध संस्थांचे पत मानांकन जाहीर करण्यात येते. मागील 6 वर्षांप्रमाणेच याही वर्षी “इंडिया डबल ए प्लस स्टेबल (AA+ Stable)” हे सर्वोत्तम पत मानांकन नवी मुंबई महानगरपालिकेस सन 2020-21 करीता जाहीर झाले असून अशाप्रकारे आर्थिक सक्षमतेचे डबल ए प्लस मानांकन सातत्याने सातव्या वर्षी मिळविणारी नवी मुंबई ही देशातील एकमेव महानगरपालिका आहे.

देशातील निवासयोग्य शहरांमध्ये आघाडीवर असणा-या नवी मुंबई महानगरपालिकेने नेहमीच दूरगामी दृष्टीकोन राखत नागरिकांसाठी पुरविण्यात येणा-या सेवासुविधांच्या दर्जाकडे बारकाईने लक्ष दिले आहे. त्याचप्रमाणे महसूलविषयक जमा व खर्चाच्या बाबींकडेही काटेकोर लक्ष दिले आहे. त्यामुळेच जमा-खर्चाचा योग्य ताळमेळ राखला जात असून हे सर्वोत्तम आर्थिक पत मानांकन सातत्याने मिळविणे ही सर्व नवी मुंबईकर नागरिकांसाठी अभिमानाची गोष्ट असून या मानांकनाबद्दल महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी आनंद व्यक्त केला आहे.

मागील आर्थिक वर्षात कोव्हीड 19 प्रभावित परिस्थिती असूनही व अनेक बाबींवर निर्बंध असतानाही कर वसूलीची चांगली कामगिरी करण्यात आल्याने नवी मुंबई महानगरपालिकेची आर्थिक स्थिती सक्षम राहिलेली आहे. या कालावधीत थकीत मालमत्ताकर धारकांना दिलासा देणारी ‘मालमत्ताकर अभय योजना’ प्रभावीपणे राबविण्यात आली. त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला. विविध करांव्दारे प्राप्त होणा-या निधीमधूनच नागरी सेवासुविधांची पूर्तता करण्यात येत असल्याने नवी मुंबईकर नागरिकांना अधिक उत्तम दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देणे शक्य झाले. त्याचप्रमाणे कोव्हीड प्रतिबंधात्मक उपाययोजना आरोग्य सुविधांमध्ये आवश्यक वाढ करीत प्रभावीपणे राबविणे शक्य झाले आहे. ‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण 2021’ नवी मुंबई महानगरपालिकेस सॅनिटेशनमधील सर्वोच्च ‘वॉटरप्लस’ मानांकन प्राप्त झाले असून हे मानांकन मिळविणारे नवी मुंबई हे राज्यातील एकमेव शहर आहे.

महापालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. धनराज गरड व इतर विभागप्रमुख यांनी आपल्या सहका-यांसह महानगरपालिकेच्या आर्थिक नियोजनाकडे बारकाईने लक्ष दिले. यामध्ये आयुक्तांनी करवसूलीमध्ये चांगली कामगिरी आणि नागरी सुविधांच्या योग्य बाबींवरच खर्च करण्याचे काटकसरीचे धोरण अवलंबिले आहे. लेखा विभागामार्फत ‘होस्ट टू होस्ट’ या अभिनव प्रणालीव्दारे देयके व रक्कमा अदायगी होत असून महानगरपालिकेचे कोणतेही पेमेंट पुरवठादाराच्या थेट बँक खात्यात जमा होत आहे. यामधून कामकाजात पारदर्शकता आली आहेच शिवाय कामकाजही पेपरलेस व गतीमान झाले आहे. याव्दारे कंत्राटदारांची अदायगी व अधिकारी, कर्मचारी यांचे पगारही वेळेवर होत आहेत. त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिकेकडे महाराष्ट्र शासन, एम.एम.आर.डी.ए., एम.आय.डी.सी. यापैकी कोणाचेही कर्ज, व्याज अथवा कर थकीत नाही.

या सा-यांचे फलित म्हणजे हे पत मानांकन असून यापुढील काळातही महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली जमेच्या तुलनेत नागरिकांना उपयोगी अशा नागरी सुविधांवरील योग्य खर्च ही पध्दत कायम राखली जाणार आहे. त्यामुळे “इंडिया रेटींग अँड रिसर्च” या नामांकीत संस्थेमार्फत “इंडिया AA+ Stable” हे सातत्याने सातव्या वर्षी लाभलेले पत मानांकन कायम राखण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका सज्ज आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button