कोरोनामुळे थंडावलेली शाळेची घंटा नव्या उत्साहाने घणघणली
24 सप्टेंबर रोजीच्या महाराष्ट्र शासन परिपत्रकानुसार महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी निर्गमित केलेल्या आदेशानुसार नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शाळांमध्ये इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग कोव्हीड सुरक्षा नियमावलीचे पालन करून सुरू करण्यास ४ तारखेपासून सुरूवात झाली. साधारणत: पावणेदोन वर्षानंतर शाळेत जाऊन अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांइतकेच वर्गात शिकविण्यासाठी शिक्षकही अतिशय उत्साही होते.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात महानगरपालिकेच्या 8 वी ते 10 वी पर्यंतच्या 72 शाळा तसेच खाजगी 8 वी ते 12 वी पर्यंतच्या 176 शाळा अशा एकूण 248 शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या उत्साही उपस्थितीत शाळांना सुरूवात करण्यात आली. नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये तसेच काही खाजगी शाळांमध्येही विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
तत्पूर्वी त्यांचे मुख्य प्रवेशव्दारावर थर्मल गनव्दारे शारीरिक तापमान तपासण्यात आले तसेच त्यांच्या हातावर सॅनिटायझर देऊनच त्यांना शाळेत प्रवेश देण्यात आला. मोठ्या कालावधीनतर शाळा सुरू होत असल्याने उत्सुकतेने शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांनी कोव्हीड सुरक्षाविषयक प्रत्येक बाब माहित असल्याप्रमाणे सहकार्य केले.
सर्वच शाळांतील शिक्षकांनी पहिला दिवस असल्याने विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधत त्यांची हसतखेळत मनोभूमिका तयार करून घेतली. मास्कचा वापर, कोणतीही कृती केल्यानंतर साबणाने वा सॅनिटायझरने हात स्वच्छ करणे, सुरक्षित अंतर राखणे, चेह-याला स्पर्श न करणे अशा विविध महत्वाच्या बाबींचे महत्व विद्यार्थ्यांना सांगण्यात आले व त्यांच्याकडून तशा प्रकारच्या वर्तनाची अपेक्षा असल्याचे शालेय शिस्तीच्या दृष्टीने महत्वाचे असल्याचे संस्कार त्यांच्यावर करण्यात आले.
शाळांमध्ये आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करणेबाबत शासन परिपत्रक जाहीर झाल्यानंतर महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार महानगरपालिका शिक्षण विभागामार्फत सर्व शाळा व्यवस्थापनांची ऑनलाईन बैठक घेऊन त्यांना शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची माहिती देण्यात आली होती. त्यास अनुसरून सर्व शाळा व्यवस्थापनांनी युध्द पातळीवर शाळांची स्वच्छता करून घेतली व शाळांच्या बेंचची रचना करून शाळेतील वर्गखोल्या व संपूर्ण परिसर सॅनेटाईज करून घेतला.
प्रत्येक शाळेमध्ये विद्यर्थ्यांना हात धुण्यासाठी हॅन्डवॉश स्टेशन तयार करण्यात आले. तसेच एका बेंचवर एक विद्यार्थी अशा प्रकारे बैठक व्यवस्थेचे तसेच विद्यार्थी संख्येचेही शालेय स्तरावर नियोजन करण्यात आले. महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये शिक्षण विभागामार्फत मास्क, सॅनिटायझर, थर्मल गन तसेच हॅन्डवॉश लिक्वीडचा पुरेशा प्रमाणात पुरवठा करण्यात आला. या सर्व उपाययोजनांची पूर्तता करूनच शाळांचे वर्ग भरण्यास सुरूवात झाली.
मुख्यमंत्री ना.श्री. उध्दव ठाकरे यांनी शाळा सुरू होत असताना ‘माझे विद्यार्थी, माझी जबाबदारी’ या भूमिकेच्या अनुषंगाने शिक्षक व विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शाळांच्या रूपाने मुलांच्या भविष्याचे, प्रगतीचे दार खुले होत असल्याचे सांगत कोरोनाच्या अनुषंगाने सर्वांनीच खबरदारी घेऊन तशा प्रकारची वर्तणूक राखण्याचे सूचित केले आहे.
कोरोनाचा प्रभाव वाढल्याने ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय स्विकारून आपण शिक्षणात खंड पडू दिला नाही. आता शाळा पुन्हा सुरू झाल्याने आपण मोकळ्या वातावरणात शिक्षण घेणार आहोत. मात्र या स्वातंत्र्याचा आनंद कोरोना प्रतिबंधात्मक नियमांच्या चौकटीत राहून घेणे गरजेचे आहे हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. यादृष्टीने सर्व पालकांनीही आपल्या पाल्याच्या आरोग्याविषयी सर्वोतोपरी काळजी घेत त्यांना शाळेच्या आवारात सुरक्षितपणे पोहचविण्याची दक्षता घ्यावी त्याचप्रमाणे बऱ्याच कालावधीपासून शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांची मानसिक स्थिती लक्षात घेऊन शिक्षकांनी आनंददायी वातावरण निर्माण करावे तसेच स्वत:च्या व विद्यार्थ्यांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेऊन विद्यार्थ्याचे आरोग्य सुदृढ राहील याची काटेकोर दक्षता घ्यावी असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.