नवी मुंबई

डास प्रतिबंधात्मक उपाययोजनांना गती देण्याचे आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांचे निर्देश

प्रत्येक संशयीत डेंग्यू रुग्णाच्या परिसरातील प्रतिबंधात्मक कार्यवाही अधिक प्रभावीपणे राबविण्यावर काटेकोर लक्ष देण्याचे निर्देश देत याबाबतचे संपूर्ण अधिकार व संपूर्ण जबाबदारी संबंधीत नागरी आरोग्य केंद्राच्या वैद्यकिय अधिकारी यांची आहे असे निर्देशित करीत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी डेंग्यू व मलेरिया प्रतिबंधात्मक कार्यवाही करणारे समूह अधिक कृतीशीलपणे सक्रीय करा असे आदेश दिले.

सद्यस्थितीत एमएमआर क्षेत्रातील डेंग्यू व मलेरिया रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील डेंग्यू व मलेरिया स्थितीचा बारकाईने आढावा घेण्यासाठी आयुक्तांनी आरोग्य विभागातील संबंधीत अधिका-यांशी वेबसंवाद साधत प्रतिबिधात्मक उपाययोजना राबविण्यामध्ये अधिक ॲक्टिव्ह होण्याचे निर्देश दिले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. उज्वला ओतुरकर आणि सर्व रुग्णालयांचे वैद्यकीय अधिक्षक व नागरी आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

सद्यस्थितीत असलेल्या संशयीत डेंग्यू रुग्ण व मलेरिया रुग्णांचा आयुक्तांनी नागरी आरोग्य केंद्रनिहाय सविस्तर आढावा घेतला व त्यांच्या कार्यक्षेत्रात केल्या जात असलेल्या प्रतिबंधात्मक कार्यवाहीची बारकाईने माहिती घेतली.

महानगरपालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रात येणा-या रुग्णांव्यतिरिक्त खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांकडे जाणा-या एकूण एक रुग्णांचीही माहिती महानगरपालिकेकडे असणे गरजेचे असून त्यादृष्टीने कोव्हीड उपायोजनांकरिता नागरी आरोग्य केंद्रनिहाय बनविलेले खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांचे व्हॉट्सॲप ग्रूप मलेरिया, डेंग्यू रुग्णांकरिता सक्रीय करावेत असे निर्देश आयुक्तांनी दिले. खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांकडे अथवा रुग्णालयांमध्ये उपचारासाठी जाणारी एकही संशयीत केस महानगरपालिकेकडून सुटता कामा नये याकडे बारकाईने लक्ष देण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. अतिरिक्त आयुक्त आणि वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांनी डेंग्यू, मलेरियाच्या दृष्टीने हॉटस्पॉट वाटतात अशा भागांना प्रत्यक्ष भेटी देऊन तेथील स्थितीची व त्याठिकाणी राबविण्यात येणा-या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची बारकाईने पाहणी करावी असेही आयुक्तांनी सूचित केले.

डेंग्यूचा संशयीत रुग्ण किंवा मलेरियाचा रुग्ण सापडल्यास त्या परिसरात असलेल्या घरांतील आरोग्य स्थितीचे निरीक्षण तसेच डास उत्पत्ती स्थानांची शोध मोहिम बारकाईने राबविण्याचे निर्देश देतानाच आवश्यक त्याठिकाणी मनुष्यबळ वाढविण्याचे आदेश संबंधीत ठेकेदारास द्यावेत असेही निर्देश आयुक्तांनी दिले. ठेकेदाराचे कर्मचारी करीत असलेल्या शोधकार्य व फवारणी कामांवर नागरी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी यांनी आपल्या यंत्रणेमार्फत काटेकोर लक्ष द्यावे व याबाबतचा दैनंदिन अहवाल सादर करावा असेही निर्देश आयुक्तांमार्फत देण्यात आले. *ठेकेदाराने अथवा त्याच्या कामगारांनी कामचुकारपणा केल्याचे आढळल्यास त्यावर दंडात्मक कारवाई करणे व सुधारणा न दिसल्यास त्याचे कंत्राट रद्द तसेच काळ्या यादीत टाकणे बाबतची कारवाई करणेबाबतही कठोर निर्णय घेण्यात येईल असे स्पष्ट संकेत आयुक्तांनी दिले.

एखादा संशयीत डेंग्यू रुग्ण अथवा मलेरिया रुग्ण आढळल्यास त्याच्या आसपासच्या परिसरात डास उत्पत्ती शोधमोहिम राबविताना सोसायट्या / नागरिक यांच्याकडून सहकार्य केले जात नाही अशा अडचणी अनेक नागरी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी यांनी मांडल्या असताना याबाबत संबंधीत विभाग कार्यालयाची मदत घेऊन सोसायट्यांना आवाहन केले जावे व त्यांच्या पदाधिका-यांना या कामाची गरज लक्षात आणून द्यावी व तरीही प्रवेश नाकारण्यात आल्यास कायदेशीर कारवाई करावी असे आयुक्तांनी सूचित केले. अशा प्रकारे डेंग्यू व मलेरियाच्या हॉटस्पॉट क्षेत्रामध्ये तपासणी व प्रतिबंधात्मक कार्यवाहीकरिता प्रवेश नाकारणा-या सोसायट्यांकडून 50 हजार रक्कमेपर्यंत दंड आकारला जाईल असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.

महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या संशयीत डेंग्यू रुग्णांवरील उपचारांबाबत बारकाईने आढावा घेताना आवश्यक औषधसाठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून ठेवणेबाबत आयुक्तांनी निर्देश दिले. तसेच वाशी रूग्णालयात आवश्यतेनुसार रूग्णखाटांची संख्या वाढविण्यात यावी असे निर्देश देण्यात आले. ऐरोली येथील राजमाता जिजाऊ रूग्णालयात ऐरोली, दिघा परिसरातील उपचारासाठी येणा-या रूग्णांची जास्त संख्या लक्षात घेता ऐरोली रूग्णालयातही डेंग्युचा विशेष कक्ष तात्काळ सुरू करणेबाबत निर्देश देण्यात आले. रूग्णखाटांचे नियोजन करताना कोणत्याही परिस्थितीत रुग्ण उपचारासाठी इतर रुग्णालयात संदर्भित होणार नाही याची काटेकोरपणे दक्षता घेण्याचे सूचित करण्यात आले. काही रुग्णांना प्लेटलेट्सची गरज भासते त्याची उपलब्धता महानगरपालिकेमार्फत विनामूल्य करण्यात यावी असेही आयुक्तांनी निर्देशित केले.

डेंग्यू व मलेरिया रोखण्याच्या दृष्टीने ज्या ज्या उपाययोजना कऱणे शक्य असेल त्या प्रभावीपणे करण्याकडे प्रत्येक वैद्यकीय अधिकारी यांनी काटेकोर लक्ष द्यावे व तशा प्रकारचे निर्देश ही कार्यवाही करणा-या शेवटच्या घटकापर्यंत पोहचवावेत असे सूचित करीत आयुक्तांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि डास उत्पत्ती स्थाने शोध मोहिमेला गतीमान करावे असे आदेशित केले. प्रत्येक वैद्यकीय अधिका-याचा आपल्या कार्यक्षेत्रात जागरूकतेने वावर असावा तसेच रुग्णांचा नियमित आढावा घेऊन कार्यक्षेत्रातील रकोणत्या भागाकडे जास्त लक्ष केंद्रीत करणे गरजेचे याकडे बारकाईने लक्ष द्यावे असेही निर्देश देण्यात आले.

नागरिकांनी डेंग्यू / मलेरिया होऊच नये म्हणून घ्यावयाची काळजी याबाबत सर्वांपर्यंत माहिती पोहोचावी याकरिता प्रत्येक भागामध्ये गाड्यांवरील स्पिकरव्दारे जनजागृती करावी तसेच सोशल मिडीया आणि होर्डींगचाही प्रभावी वापर करावा असे निर्देश आयुक्तांनी दिले.

नागरिकांनी डास उत्पत्ती रोखण्यासाठी आपल्या घरात व आजूबाजूच्या परिसरात पाणी साचू देऊ नये, स्वच्छ पाण्याच्या साठवणूकीची भांडी नियमित रिकामी करावीत तसेच एक दिवस कोरडा पाळावा. त्याचप्रमाणे रुग्ण संशोधन कार्यवाहीसाठी अथवा डास उत्पत्ती स्थानांचा शोध घेण्यासाठी वा रासायनिक फवारणीसाठी घर, सोसायटी व परिसरात येणा-या महानगरपालिकेच्या कर्मचा-यांना संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने कऱण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button