18 वर्षावरील 95 टक्के नागरिकांनी घेतला कोव्हीड लसीचा पहिला डोस
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कोव्हीड लसीकरणावर भर दिला जात असून आत्तापर्यंत 10 लक्ष 3 हजार 71 नागरिकांनी म्हणजेच 95 टक्के नागरिकांनी कोव्हीड लसीचा पहिला डोस घेतला आहे आणि 4 लक्ष 58 हजार 195 म्हणजे 43 टक्के नागरिकांनी कोव्हीडचे दोन्ही डोस घेतले आहेत. लोकसंख्येच्या तुलनेत लसीकरणाचे हे प्रमाण इतर मोठ्या शहरांच्या तुलनेत सर्वाधिक आहे.
सप्टेंबर महिन्यात कोव्हीड लसीचा साठा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाल्याने 100 इतक्या मोठ्या प्रमाणात लसीकरण केंद्रे कार्यान्वित करीत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार जास्तीत जास्त नागरिक लसीकरणाव्दारे संरक्षित करण्यावर भर देण्यात आलेला आहे. सप्टेंबर महिन्याच्या 20 दिवसात 1 लक्ष 46 हजार 627 नागरिकांनी पहिला डोस तसेच 1 लक्ष 20 हजार 439 नागरिकांनी दुसरा डोस घेतला असून एकूण 2 लक्ष 67 हजार 66 इतके डोस देण्यात आलेले आहे. विशेष म्हणजे 8 सप्टेंबर रोजी 34112 इतक्या मोठ्या संख्येने एका दिवसातील विक्रमी लसीकरण झालेले आहे.
लसीच्या उपलब्धतेनुसार 18 वर्षावरील नागरिकांसाठी कोव्हीडचा पहिला डोस उपलब्ध करून देण्याप्रमाणेच ज्यांच्या दुस-या डोसची तारीख आलेली आहे त्यांना दुसरा डोस उपलब्ध करून देण्याकडेही बारकाईने लक्ष दिले जात आहे.
त्यासोबतच विविध सेवा पुरविताना मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या संपर्कात येत असलेल्या कोव्हीडच्या दृष्टीने जोखमीच्या पोटँशिअल सुपरस्प्रेडर्स व्यक्तींच्या लसीकरणाकडेही अगदी सुरूवातीपासूनच विशेष लक्ष देण्यात आले असून आयुक्तांच्या निर्देशानुसार विविध सेवा क्षेत्रात कार्यरत असणा-या व्यक्तींसाठी विशेष लसीकरण सत्रांचे 25 जूनपासून आयोजन करण्यात येत आहे.
या अंतर्गत आत्तापर्यंत –
अशाप्रकारे 18 हजार 391 पोटॅशिअल सुपरस्प्रेडर्स व्यक्तींचे प्राधान्याने कोव्हीड लसीकरण करण्यात आलेले आहे.
कोणताही समाजघटक लसीकरणापासून दुर्लक्षित राहू नये याची विशेष काळजी घेत बेघर, निराधार नागरिक तसेच तृतीयपंथीय, रेडलाईट एरिया व दुर्गम दगडखाणी क्षेत्रातील नागरिकांसाठीही लसीकरणाच्या विशेष सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये 594 व्यक्तींचे लसीकरण करण्यात आलेले आहे.
याशिवाय – आजारपणामुळे अथवा वृध्दापकाळामुळे अंथरूणाला खिळलेल्या व शारीरिक हालचाल करता न येणा-या व्यक्ती लसीकरणापासून वंचित राहू नयेत याकरिता जून महिन्यापासूनच अशा व्यक्तींच्या घरी जाऊन लसीकरण करण्यास सुरूवात करण्यात आलेली असून या विशेष उपक्रमांतर्गत आत्तापर्यंत 323 बेडरिडन रूग्णांचे त्यांच्या घरी जाऊन लसीकरण करण्यात आलेले आहे. याशिवाय विविध वृध्दाश्रमांतील 381 व्यक्तींचेही कोव्हीड लसीकरण करण्यात आलेले आहे.
त्यासोबत 273 गरोदर महिला व 176 स्तनदा मातांनीही विशेष कोव्हीड लसीकरण सत्राचा लाभ घेतलेला आहे.
त्याचप्रमाणे, शासकीय निर्देशानुसार 669 शालेय शिक्षकांचेही लसीकरण करण्यात आलेले आहे.
संभाव्य तिस-या लाटेपूर्वी जास्तीत जास्त नागरिक लसीकरणाव्दारे संरक्षित व्हावेत याकरिता लसीच्या उपलब्धतेनुसार नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने लसीकरणाला गतिमानता देण्यात येत असून त्यानुसार सत्रांचे दैनंदिन नियोजन करण्यात येत आहे. 95 टक्केहून अधिक नागरिकांनी लसीकरणाचा पहिला डोस घेतलेला आहे ही समाधानकारक बाब आहे. कोव्हीड लस घेतल्यानंतरही कोव्हीड झाल्यास त्याची तीव्रता कमी राहील. तथापि कोव्हीडच्या विषाणूला आपल्यापासून दूर ठेवण्यासाठी लसीकरण झाल्यानंतरही मास्कचा नियमित व योग्य प्रकारे वापर करणे गरजेचे असून चेह-याला स्पर्श न करणे, वारंवार हात धुवून स्वच्छ राखणे, सुरक्षित अंतर राखणे असे कोव्हीड वर्तन नियम ही प्रत्येकाने आपली नियमित सवय बनविली पाहिजे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.