नवी मुंबई

मालमत्ता कर अभय योजना जाहीर – दंडात्मक रक्कमेवर 75% सूट

थकीत मालमत्ताकर धारकांना नवी सुवर्णसंधी – थकीत मालमत्ताकराच्या दंडात्मक रक्कमेवर 75% सूट
1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर या दोन महिने कालावधीत मालमत्ता कर अभय योजना जाहीर

महानगरपालिकेच्या उत्पन्नामधील मालमत्ताकर हा प्रमुख स्त्रोत असून याव्दारे जमा होणा-या महसूलामधूनच नागरिकांकरिता विविध सेवासुविधांची दर्जेदार परिपूर्ती करण्यात येत असते. कोव्हीड कालावधीत लॉकडाऊन व इतर कारणांमुळे थकबाकीसह मालमत्ताकर भरणा करण्यात नागरिकांना भेडसावणा-या अडचणी लक्षात घेत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन महिन्यांच्या कालावधीत ‘मालमत्ताकर अभय योजना 2021-22’ जाहीर करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. थकीत मालमत्ताकराच्या दंडात्मक रक्कमेवर 75 टक्के इतकी भरीव सवलत जाहीर करण्यात आल्याने नागरिकांसाठी हा फार मोठा आर्थिक दिलासा आहे.

दि. 1 ऑक्टोबर 2021 ते 30 नोव्हेंबर 2021 या दोन महिन्यांच्या कालावधीत या अभय योजनेचा लाभ मालमत्ताकर थकबाकीदारांना घेता येणार आहे. 30 सप्टेंबर 2021 पर्यंतच्या थकीत मालमत्ता कराच्या दंडात्मक रक्कमेवर 75% इतकी भरीव सूट देणारी ही थकबाकीदारांसाठी अत्यंत लाभदायी योजना आहे. या योजनेमध्ये जाहीर केलेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत थकबाकीदार नागरिकांनी मालमत्ता कराची संपूर्ण थकीत रक्कम अधिक केवळ 25% दंडात्मक रक्कम भरणा केल्यास त्यांची 75% दंडात्मक रक्कम माफ होणार आहे.

ही रक्कम थकबाकीदारांनी एकाचवेळी भरणा करावयाची असून ती टप्प्याटप्प्याने भरता येणार नाही याची नागरिकांनी नोंद घ्यावयाची आहे. त्याचप्रमाणे जाहीर केलेल्या अभय योजनेच्या कालावधीमध्येही कोणत्याही प्रकारची मुदतवाढ दिली जाणार नाही याचीही दखल घ्यावयाची आहे. त्यामुळे 30 नोव्हेंबरपर्यंत न थांबता नागरिकांनी लगेच आपली आपल्या मालमत्ताकराची थकीत रक्कम व त्यावर केवळ 25 टक्के दंडात्मक रक्कम भरणा करून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने एका बाजूला थकीत मालमत्ताकर धारकांना थकीत कर भरण्याकरिता प्रवृत्त करण्यासाठी जप्तीची कारवाई करण्यात येत आहे. त्याचवेळी थकीत करामधील दंडात्मक रक्कमेतून सूट दिल्यास थकीत करभरणा करणे अधिक सोयीचे ठरेल हा दृष्टीकोन नजरेसमोर ठेवून जाहीर करण्यात आलेली ही अभय योजना थकबाकीदारांसाठी लाभदायी आहे.

1 ऑक्टोबर पासून अभय योजनेचा लाभ घेण्यासाठी दंडात्मक रक्कमेतून 75 टक्के सूट वजा केल्यानंतर देय रक्कम किती राहील याची माहिती महानगरपालिकेच्या www.nmmc.gov.in या वेबसाईटवर सहज उपलब्ध असेल व सदर रक्कमेचा भरणा ऑनलाईन पध्दतीने महानगरपालिकेच्या वेबसाईटवर तसेच NMMC e-connect या मोबाईल ॲपव्दारे अभय योजनेच्या विशेष लिंकवर करता येणार आहे. रक्कम ऑनलाईन भरणा करण्यासाठी डेबिट कार्ड / क्रेडिट कार्ड / इंटरनेट बँकींग / एनईएफटी / आरटीजीएस या सुविधांचा उपयोग नागरिकांना करता येईल. *रक्कम भरणा करण्यासाठी मालमत्ताकर थकबाकीदारांना महानगरपालिकेच्या कोणत्याही कार्यालयात जाण्याची गरज असणार नाही तसेच सर्व माहिती ऑनलाईन उपलब्ध असल्याने थकबाकीविषयी कोणत्याही प्रकारची माहिती घेण्यास कोणासही संपर्क साधण्याची गरज राहणार नाही.

मालमत्ताकर विभागाच्या कार्यप्रणालीमध्ये पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेने “झिरो पब्लिक कॉन्टॅक्ट” या तत्वावर विविध बाबींमध्ये सुधारणा करण्यास सुरुवात केली असून त्याचाच एक भाग म्हणून करदात्यांना अत्यंत सुलभ पध्दतीने थकीत कराचा भरणा करणे शक्य व्हावे अशा पध्दतीने अभय योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

महानगरपालिकेच्या महसूलामधील मालमत्ताकाराचे महत्व लक्षात घेता त्यामधूनच नागरी सेवा सुविधांची परिपूर्तता केली जात असल्याने मालमत्ताकर थकबाकीच्या दंडात्मक रक्कमेवर 75 टक्के इतकी भरीव सवलत देणा-या या अभय योजनेचा लाभ घेऊन थकबाकीदार नागरिकांनी शहर विकासात आपले अनमोल योगदान द्यावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button