नवी मुंबई

श्रीगणेशोत्सवातील 50 टन 330 किलो निर्माल्यावर होणार नैसर्गिक खतनिर्मिती

10 सप्टेंबरपासून सुरू झालेला यावर्षीचा श्रीगणेशोत्सव कोव्हीड 19 च्या पार्श्वभूमीवर आंतरिक भक्तीभावाने शासकीय मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत अत्यंत उत्साहात संपन्न झाला. विसर्जनस्थळी होणारी गर्दी टाळण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार मागील वर्षीच्या 135 कृत्रिम विसर्जन स्थळांच्या संख्येत सर्वच विभागांमधील नागरिकांची मागणी लक्षात घेऊन 16 ने वाढ करीत यावर्षी विभागवार 151 कृत्रिम विसर्जन तलावांची निर्मिती करण्यात आली होती, त्यालाही नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला.

त्याचप्रमाणे विसर्जनस्थळी एकाच वेळी गर्दी होऊन नये व भाविकांना त्यांच्या सोयीच्या वेळेत विसर्जन करता यावे याकरिता nmmc.visarjanslots.com हे विशेष पोर्टल कार्यान्वित करून ‘ऑनलाईन श्रीगणेशमूर्ती विसर्जन स्थळ नोंदणी’ सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. या सुविधेचा लाभ 1174 नागरिकांनी घेत ही संकल्पना यशस्वी केलेली आहे. त्याचप्रमाणे नैसर्गिक जलस्त्रोत रक्षणाच्या दृष्टीकोनातून कृत्रिम विसर्जन स्थळांवर विसर्जन करण्यास प्राधान्य दिल्याचे पर्यावरणपूरक चित्र दिसून आलेले आहे.

नवी मुंबईकर नागरिकांचा पर्यावरणशील दृष्टीकोन लक्षात घेऊन महानगरपालिकेच्या वतीनेही प्रतिवर्षीप्रमाणेच श्रीमुर्तींसोबत विसर्जनस्थळी येणा-या पुष्पमाळा, फुले, दुर्वा, तुळस, शमी, फळांच्या साली-तुकडे यासारखे पुनर्प्रक्रिया करण्यायोगे ‘ओले निर्माल्य’ तसेच मुर्तीच्या गळ्यातील कंठी, सजावटीचे सामान असे ‘सुके निर्माल्य’ ठेवण्यासाठी 22 पारंपारिक विसर्जनस्थळांवर तसेच 151 कृत्रिम विसर्जन स्थळांवर स्वतंत्र निर्माल्य कलशांची व्यवस्था करण्यात आली आहे.

अशाप्रकारे ओले व सुके निर्माल्य वेगवेगळ्या कलशात ठेवण्याच्या संकल्पनेला नागरिकांनी नेहमीप्रमाणेच उत्तम प्रतिसाद दिल्यामुळे यावर्षीच्या श्रीगणेशोत्सव विसर्जन कालावधीत दीड दिवसाच्या विसर्जनादिवशी 12 टन 95 किलो, गौरीसह पाच दिवसाच्या विसर्जनाप्रसंगी 24 टन 140 किलो तसेच सात दिवसाच्या विसर्जनाप्रसंगी 3 टन 680 किलो आणि अनंत चतुर्दशीदिनी मोठ्या संख्येने होणा-या विसर्जनप्रसंगी 10 टन 415 किलो अशाप्रकारे गणेशोत्सवातील 4 विसर्जनदिनी एकूण 50 टन 330 किलो इतके ओले निर्माल्य जमा झाले आहे. या निर्माल्याच्या वाहतुकीसाठी स्वतंत्र वाहन व्यवस्था करण्यात आली होती. हे निर्माल्य महानगरपालिकेच्या अद्ययावत तुर्भे प्रकल्पस्थळी स्वतंत्रपणे ठेवण्यात आले असून त्यावर शास्त्रोक्त खत निर्मिती प्रक्रिया केली जात आहे.

नवी मुंबई हे स्वच्छतेमध्ये राज्यातील अग्रणी व देशातील तृतीय क्रमांकाचे स्वच्छ शहर म्हणून मानांकीत आहे. यावर्षीच्या स्वच्छ सर्वेक्षणात ओडीएफ कॅटेगरीमध्येही वॉटरप्लस हे सर्वोच्च मानांकन संपादन करणारे नवी मुंबई हे राज्यातील एकमेव शहर आहे. या अनुषंगाने सर्व 22 पारंपारिक आणि 151 कृत्रिम विसर्जन स्थळांवर कोव्हीड 19 प्रतिबंधात्मक घ्यावयाची काळजी तसेच स्वच्छतेविषयी आवाहन करणारे होर्डींग प्रदर्शित करण्यात येऊन शहर स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात आली. त्याचप्रमाणे स्वच्छ नवी मुंबई मिशनचे ब्रँड ॲम्बेसेडर तथा सुप्रसिध्द संगीतकार गायक श्री. शंकर महादेवन यांच्या आवाजातील स्वच्छतेविषयीच्या जिंगल्स विसर्जनस्थळी प्रसारित करून जनजागृती करण्यात आली तसेच ओला-सुका व घरगुती घातक कचरा वर्गीकरणाची हस्तपत्रकेही वितरित करण्यात आली. नवी मुंबईला लाभणा-या मानांकनामध्ये जागरूक स्वच्छताप्रेमी नागरिकांचा महत्वाचे योगदान असून हे स्वच्छताप्रेम गणेशोत्सवातही विसर्जनस्थळी योग्य कलशांमध्ये ओले व सुके निर्माल्य ठेवण्यातून दिसून आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button