नवी मुंबई महापालिका मुख्यालयात अभियंता दिन उत्साहात संपन्न
भारतरत्न सर विश्वेश्वरय्या यांनी प्रत्येक काम वैशिष्ट्यपूर्ण रितीने केले त्यामुळे त्यांच्या जयंती दिन हा अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो हे त्यांच्या कार्यकर्तृत्वाला केलेले अभिवादन असून यामधून आपण करीत असलेले काम नाविन्यपूर्ण करण्याचा प्रयत्न करणे ही त्यांना वाहिलेली खरी आदरांजली असेल असे मत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी व्यक्त केले.
नवी मुंबई महानगरपालिका अभियांत्रिकी विभागाच्या वतीने मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात अभियंत्यांचे प्रेरणास्थान असलेल्या भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीदिनानिमित्त आयोजित ‘अभियंता दिन’ समारंभात ते आपले मनोगत व्यक्त करीत होते. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले व श्री. संजय काकडे, शहर अभियंता श्री. संजय देसाई, समारंभाचे प्रमुख वक्ते व माजी शहर अभियंता श्री. मोहन डगांवकर, माजी शहर अभियंता श्री. सुरेंद्र पाटील, अतिरिक्त शहर अभियंता श्री. मनोज पाटील व श्री. शिरीष आरदवाड आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या अभियांत्रिकी विभागाने आजवर केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कामामुळेच नवी मुंबई महानगरपालिकेचा नावलौकीक सर्वत्र असून नवी मुंबई ही नाविन्यपूर्ण व गुणवत्तेला प्राधान्य देणारी महानगरपालिका असल्याचे सांगत आयुक्तांनी हा लौकीक वाढविण्यासाठी अधिक चांगले काम करण्यासाठी कटिबध्द राहण्याची आवश्यकता व्यक्त केली. याकरिता प्रत्येकाने आपण करीत असलेले काम अधिक नाविन्यपूर्ण रितीने करण्याची सवय लावून घ्यावी व केलेल्या उल्लेखनीय कामाने आत्मसंतुष्ट न होता नवे काम करताना सतत अद्ययावत रहावे असे ते म्हणाले.
अभियंता म्हणून काम करायला मिळणे ही अत्यंत भाग्याची गोष्ट असून अभियंत्यांना आपण करीत असलेल्या कामाचा अविष्कार आपल्या नजरेने पाहता येतो, त्यामुळे आनंद मिळतो. तथापि तेवढ्याने समाधानी न होता त्यानंतरही आपण हाती घेतलेले काम नाविन्यपूर्ण पध्दतीने करण्याची सवय लावून घ्यावी असे आयुक्तांनी सूचित केले. कायम जागरूक राहून स्वत:च्या क्षमता विकसित केल्याने व कोणतेही काम करताना त्यामध्ये वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करायला हवा यासाठी आजूबाजूच्या चांगल्या गोष्टींचा व जगभरातील उत्तम कामांचा अभ्यास करण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या. अभियंत्याने कार्यालयीन कामकाजात गुंतून न राहता त्याच्या कार्यक्षेत्रातील कामांवर अधिक लक्ष द्यावे असे स्पष्ट करत त्यामुळे कामाची गुणवत्ता वाढेल व अद्ययावत माहिती राहिल्याने आत्मविश्वास वाढेल व जनमानसातही चांगला संदेश जाईल असे आयुक्तांनी विशेषत्वाने नमूद केले.
याप्रसंगी बोलताना शहर अभियंता श्री. संजय देसाई यांनी 1992 साली 50 लाख अंदाजपत्रकीय तरतूदीपासून 29 वर्षात 2100 कोटी रक्कमेच्या अंदाजपत्रकीय तरतूदीपर्यंतच्या अभियांत्रिकी विभागाच्या वाटचालीत स्थापत्य, पाणीपुरवठा, मलनि:स्सारण, घनकचरा व्यवस्थापन अशा सर्वच सेवासुविधांमध्ये गुणात्मक दर्जा राखल्याने नवी मुंबई शहर आज देशातील मानांकित शहरांमध्ये गणले जाते याबद्दल अभिमान व्यक्त केला. 1992 पासूनच्या कामाच्या आठवणी कथन करीत त्यांनी यापुढील काळात वेळ आणि गुणवत्ता पाळून अधिक दर्जेदार काम करण्याचा विश्वास व्यक्त केला.
माजी शहर अभियंता श्री. मोहन डगांवकर यांनी प्रमुख वक्ते म्हणून कौशल्य विकासाकरिता अभियांत्रिकी ज्ञान आणि कोव्हीड प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये महापालिका अभियंत्यांची जबाबदारी या विषयावर भाष्य करताना जागतिक तंत्रज्ञानामध्ये झपाट्याने होत असलेले बदल लक्षात घेऊन विद्यार्थ्याच्या भूमिकेतून नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी अभियंत्यांनी तयार रहिले पाहिजे अशी भूमिका मांडली. याकरिता अद्ययावत तंत्रज्ञानाचे रितसर प्रशिक्षण घेण्यावर भर दिला पाहिजे तसेच आपल्या कार्यक्षेत्रात दूरदृष्टीकोन ठेवून दर्जेदार काम केले पाहिजे असे मत व्यक्त केले. कोव्हीड काळात महानगरपालिका अभियांत्रिकी विभागाने जलद आरोग्य सुविधा निर्मितीमध्ये कामाचा दर्जा उत्तम राखत चांगले काम केले आहे असे अभिप्राय व्यक्त करीत श्री. मोहन डगांवकर यांनी यापुढील काळात शहराच्या नावलौकीकात भर पडेल असे काम महापालिका अभियांत्रिकी विभाग करेल असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी दिवंगत कार्यकारी अभियंता श्री. अनिल नेरपगार व दिवंगत उप अभियंता श्री. चेतन पाटील यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाप्रसंगी महानगरपालिकेचे सेवानिवृत्त अभियंता यांना आवर्जुन निमंत्रित करण्यात आले होते. याप्रसंगी माझी वसुंधरा अभियानाची सामुहिक इ-शपथ ग्रहण करण्यात आली. उप अभियंता श्री. विश्वकांत लोकरे यांनी भारतरत्न सर विश्वेश्वरय्या यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेतला तसेच उप अभियंता श्री. विवेक मुळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.