पाचव्या दिवशीच्या गौरीगणपती विसर्जनासाठी नवी मुंबई महानगरपालिकेची सुयोग्य व्यवस्था

पाचव्या दिवशीच्या गौरीगणपती विसर्जनासाठी नवी मुंबई महानगरपालिकेची सुयोग्य व्यवस्था
महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी केली पाहणी
कोव्हीड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून उत्साहात साज-या होत असलेल्या श्रीगणेशोत्सवामध्ये दीड दिवसाच्या 6011 श्रीगणेशमूर्ती विसर्जनाप्रमाणेच पाचव्या व गौरीसह विसर्जन होणा-या श्रीगणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने सुनियोजित व्यवस्था केलेली आहे. महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी आज काही विसर्जन स्थळांना भेटी देत तेथील व्यवस्थेची पाहणी केली.
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याच्या दृष्टीने कुठेही गर्दी होऊ नये याकरिता 22 पारंपारिक विसर्जन स्थळांसह 151 कृत्रिम विसर्जन तलावांच्या ठिकाणी सुयोग्य नियोजन करण्यात आलेले आहे. नैसर्गिक जलस्त्रोतांची जपणूक पर्यावरणदृष्ट्या व्हावी याकरिता नागरिकांनी कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये विसर्जन करावे याकरिता समाज माध्यमांव्दारे आवाहन करण्यात आले आहे. तसेच तशा प्रकारचे आवाहन करणारे फलकही विसर्जन स्थळांवर प्रदर्शित करण्यात आलेले आहेत. सर्व ठिकाणी स्वयंसेवक आणि लाईफगार्ड्स कार्यरत आहेत.
याशिवाय भाविकांना आपल्या श्रीगणेशमूर्तींचे व्यवस्थिरित्या योग्य वेळेत विसर्जन करता यावे व विसर्जनस्थळी गर्दी होऊन कोव्हीड नियमांचे उल्लंघन होऊ नये याकरिता ‘ऑनलाईन श्रीगणेशमूर्ती विसर्जन स्थळ नोंदणी’ सुविधा https://nmmc.visarjanslots.com या विशेष पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या संकल्पनेलाही नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून आजपर्यंत एकूण 1026 भाविकांनी तसेच आजच्या विसर्जनदिनाकरिता 558 भाविकांनी आपली ऑनलाईन स्लॉट बुकींग केलेले आहे. आठही विभाग कार्यालय क्षेत्रात परिमंडळ उपआयुक्तांच्या नियंत्रणाखाली सर्व विभागांचे सहा. आयुक्त व त्यांचा अधिकारी – कर्मचारीवृद विसर्जन व्यवस्थेसाठी सज्ज आहे.
तरी सुजाण नवी मुंबईकर नागरिकांनी श्रीगणेशोत्सव साजरा करताना आरोग्याचे भान ठेवून स्वयंशिस्तीचे पालन करावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी केले आहे.