दीड दिवसांच्या विसर्जन सोहळयात 6011 श्रीगणेश मूर्तींना भावपूर्ण निरोप
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 22 पारंपारिक विसर्जन स्थळांसोबत कोव्हीड 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी टाळण्याकरिता निर्माण करण्यात आलेल्या 151 कृत्रिम विसर्जन स्थळांवर श्रीगणरायाच्या 6011 मूर्तींचे विसर्जन व्यवस्थितरित्या संपन्न झाले. महानगरपालिकेच्या वतीने महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार सर्वच ठिकाणी करण्यात आलेल्या चोख विसर्जन व्यवस्थेत दीड दिवसाचा विसर्जन सोहळा नियोजनबध्द रितीने पार पडला.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील 22 पारंपारिक विसर्जन स्थळांवर 3030 घरगुती व 19 सार्वजनिक अशा दीड दिवसांच्या 3049 श्रीगणेशमुर्तींचे विसर्जन संपन्न झाले.* यामध्ये बेलापूर विभागात 5 विसर्जन स्थळांवर 1209 घरगुती व 5 सार्वजनिक, नेरुळ विभागात 2 विसर्जन स्थळांवर 173 घरगुती, वाशी विभागातील 2 विसर्जन स्थळांवर 349 घरगुती व 3 सार्वजनिक, तुर्भे विभागात 3 विसर्जन स्थळांवर 653 घरगुती व 3 सार्वजनिक, कोपरखैरणे विभागात 2 विसर्जन स्थळांवर 36 घरगुती व 1 सार्वजनिक, घणसोली विभागात 4 विसर्जन स्थळांवर 504 घरगुती व 7 सार्वजनिक, ऐरोली विभागात 3 विसर्जन स्थळांवर 106 घरगुती अशा एकुण 3030 घरगुती व 19 सार्वजनिक अशाप्रकारे एकूण 3049 श्रीगणेशमुर्तींना भावपूर्ण निरोप देत विसर्जन करण्यात आले.
मागील वर्षीप्रमाणेच यावर्षीही पारंपारिक कोव्हीड 19 प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने विसर्जनस्थळांवर गर्दी होऊ नये व सोशल डिस्टन्सींगचे पालन व्हावे यादृष्टीने गतवर्षीपेक्षा 16 अधिक म्हणजेच एकूण 151 कृत्रिम विसर्जन तलाव विभागवार तयार करण्यात आले होते. या *151 कृत्रिम विसर्जन स्थळांना नागरिकांचा उतम प्रतिसाद मिळाला. याठिकाणी 2895 घरगुती व 67 सार्वजनिक अशा दीड दिवसाच्या एकूण 2962 श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन संपन्न झाले* यामध्ये – बेलापूर विभागात – 21 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 311 घरगुती व 7 सार्वजनिक, नेरूळ विभागात – 27 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 77 घरगुती व 1 सार्वजनिक, वाशी विभागात – 18 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 366 घरगुती व 1 सार्वजनिक, तुर्भे विभागात – 20 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 402 घरगुती व 9 सार्वजनिक, कोपरखैरणे विभागात – 16 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 906 घरगुती व 6 सार्वजनिक, घणसोली विभागात – 17 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 541 घरगुती व 35 सार्वजनिक, ऐरोली विभागात – 23 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 89 घरगुती व 3 सार्वजनिक व दिघा विभागात – 9 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 203 घरगुती व 5 सार्वजनिक अशाप्रकारे तात्पुरत्या स्वरूपात निर्मिती करण्यात आलेल्या एकूण 151 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 2895 घरगुती व 67 सार्वजनिक अशा दीड दिवसाच्या एकूण 2962 श्रीगणेशमुर्तींना भावपूर्ण निरोप देत विसर्जन करण्यात आले.
अशाप्रकारे दीड दिवसांच्या विसर्जन प्रसंगी 5925 घरगुती व 86 सार्वजनिक अशा एकूण 6 हजार 11 श्रीगणेश मूर्तींना भावपूर्ण निरोप देण्यात आला.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 22 विसर्जन स्थळांपैकी मुख्य 14 तलावांमधील गॅबियन वॉलच्या विशिष्ट क्षेत्रात श्रीगणेशमुर्तींचे विसर्जन करून पर्यावरण संरक्षण – संवर्धन कार्यात भाविकांनी आपले योगदान दिले. त्याचप्रमाणे महापालिका आयुक्त श्री अभिजीत बांगर यांनी कृत्रिम विसर्जन तलावात विसर्जन करावे अशा केलेल्या आवाहनाला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला.
विशेष म्हणजे नागरिकांना त्यांच्या सोयीच्या वेळेत घराजवळ विसर्जन करता यावे यादृष्टीने ‘ऑनलाईन श्रीगणेशमूर्ती विसर्जन स्थळ नोंदणी’ करिता तयार करण्यात आलेल्या nmmc.visarjanslots.com या विशेष पोर्टलवर 380 भाविकांनी आपल्या विसर्जनाची वेळ नोंदणी करून सुलभ रितीने विसर्जन केले. यापुढील काळातील विसर्जन दिवसाची नोंदणी पोर्टलवर ऑनलाईन सुरू असून त्याचा नागरिकांनी उपयोग करून घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
सर्वच विसर्जनस्थळांवर सुरक्षेच्या दृष्टीने बांबूंचे बॅरेकेटींग करण्यात आले होते. लाईफगार्डस्, स्वयंसेवक यांच्यासह अग्निशमन दलही कार्यरत होते. श्रीमूर्तींच्या सुयोग्य विसर्जनासाठी तराफ्यांची व्यवस्था करण्यात आली होती. मुख्य विसर्जनस्थळांवर पुरेशा विद्युत व्यवस्थेसह जनरेटरची पर्यायी व्यवस्था करण्यात आली होती. तसेच पिण्याच्या पाण्यासह प्रथमोपचाराची सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आली होती.
22 मुख्य विसर्जन स्थळे व 151 कृत्रिम तलाव अशा सर्व विसर्जनस्थळांवर ओल्या व सुक्या निर्माल्यासाठी दोन स्वतंत्र निर्माल्य कलश ठेवण्यात आले होते. त्याठिकाणी 5.5 टनापेक्षाही अधिक ओले निर्माल्य जमा करण्यात आले असून त्याची वाहतुक स्वतंत्र निर्माल्य वाहनाव्दारे करण्यात आली. या निर्माल्याचे पावित्र्य राखण्याची काळजी घेत त्यावर प्रक्रिया करण्यासाठी तुर्भे येथील प्रकल्पस्थळी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.
कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून पोलीस यंत्रणा सर्वच ठिकाणी अत्यंत सतर्कतेने कार्यरत होती. यापुढील काळातील श्रीगणेश विसर्जन अशाच प्रकारे सुव्यवस्थित रितीने संपन्न होण्यासाठी आठही विभाग कार्यालय क्षेत्रात सर्व यंत्रणा सुसज्ज असणार आहे.