नवी मुंबई महानगरपालिकेची ऑनलाईन विसर्जन वेळ बुकींग सुविधा उपलब्ध
विसर्जनस्थळावरील गर्दी टाळण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेची ऑनलाईन विसर्जन वेळ बुकींग सुविधा:
महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोव्हीडचा प्रभाव रोखण्यासाठी 10 सप्टेंबरपासून सुरु होणारा श्रीगणेशोत्सव कोव्हीड सुरक्षा नियमांचे पालन करुन साजरा करावा असे आवाहन करण्यात आले आहे. याबाबत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी महापालिका व पोलीस विभागाची संयुक्त बैठक आयोजित करुन श्रीगणेशोत्सव शासकीय नियमांनुसार साजरा होईल याकडे काटेकोरपणे लक्ष देण्याचे सूचित केले आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेने विसर्जन स्थळांवर कुठल्याही प्रकारे गर्दी होऊ नये याची काळजी घेत पारंपारिक 22 विसर्जन स्थळांव्यतिरिक्त मागील वर्षीच्या 135 कृत्रिम विसर्जन स्थळांमध्ये वाढ करीत यावर्षी 151 कृत्रिम विसर्जन स्थळे निर्माण केली आहेत. या विसर्जन स्थळांवर सुनियोजित पध्दतीने विसर्जन संपन्न व्हावे याकरीता महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने nmmc.visarjanslots.com हे विशेष पोर्टल तयार करण्यात आले आहे.
या विशेष ॲपवर श्री गणेश विसर्जन 2021 करिता श्रीमूर्ती विसर्जनासाठी ऑनलाईन स्लॉट बुकींग करता येणार असून हे अॅप भाविकांना वापरणे सोपे व्हावे याकरीता नोंदणी प्रक्रिया अत्यंत सुलभ ठेवण्यात आलेली आहे.
नागरिकांनी श्रीगणेश विसर्जनासाठी आपल्या नजिकच्या विसर्जन स्थळांवर विसर्जनाची वेळ निश्चित करण्यासाठी https://nmmc.visarjanslots.com या पोर्टलवर जाऊन ‘ऑनलाईन स्लॉट बुकींग’च्या ‘रजिस्ट्रेशन’ सेक्शनवर क्लिक करावयाचे आहे.
यानंतर नोंदणीच्या पृष्ठावर ‘पूर्ण नाव’ नमूद करावयाचे असून त्यानंतर ‘नोंदणी प्रकार’ यामध्ये ‘मंडळ / वैयक्तिक’ यापैकी योग्य पर्याय क्लिक करावयाचा आहे. तसेच ‘मोबाईल क्रमांक’ सेक्शनमध्ये आपला मोबाईल क्रमांक नोदवावयाचा आहे.
त्यानंतर ‘शहर’ सेक्शनमध्ये नवी मुंबई व त्यापुढील ‘वॉर्ड’ सेक्शनमध्ये महानगरपालिकेच्या 8 विभाग कार्यालय क्षेत्रापैकी आपला विभाग निवडावयाचा आहे.
यानंतर निवडलेल्या वॉर्डातील ‘विसर्जन स्थळे’ यांची यादी दिसणार असून त्यामध्ये आपल्याला हव्या असलेल्या विसर्जन स्थळावर क्लिक करावयाचे आहे.
त्यानंतर ‘विसर्जन तारीख’ या सेक्शनमध्ये 11/09/2021 (1.5 दिवस), 14/09/2021 (5 दिवस / गौरी गणपती विसर्जन), 16/09/2021 (7 दिवस) व 19/09/2021 (10 दिवस) या पर्यायांपैकी आपणास हवा असलेला पर्याय निवडावयाचा आहे.
त्याखाली असलेल्या ‘विसर्जनाची वेळ’ सेक्शनमध्ये दुपारी 12 ते रात्री 10 या विसर्जन वेळेतील प्रत्येक अर्ध्या तासाचे स्लॉट प्रदर्शित होतील, त्यामधून आपल्याला सोयीच्या वेळेचा स्लॉट निवडावयाचा आहे आणि नोंदणी पूर्ण झाली असल्याचा आयकॉन क्लिक करावयाचा आहे.
ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नोंदणी करताना रजिस्टर केलेल्या मोबाईल क्रमांकावर आपली नोंदणी झाल्याचा एसएमएस प्राप्त होणार असून सदर रजिस्ट्रेशनची प्रिंटही काढण्याची सुविधा उपलब्ध आहे.
त्याचप्रमाणे गुगल मॅपवर आपले विसर्जन स्थळही शोधण्याची सुविधा उपलब्ध आहे.
नागरिकांनी विसर्जनस्थळावर होणारी गर्दी टाळण्यासाठी, सुरक्षित अंतर नियमांचा भंग होणार नाही याची काळजी घेत विसर्जन वेळेचे ऑनलाईन बुकींग करावे व घरातील मोजक्या व्यक्तींनीच विसर्जनस्थळी यावे. विसर्जनापूर्वीची निरोपाची आरती घरीच करून विसर्जनस्थळी आल्यानंतर तेथे कमीत कमी वेळ थांबावे तसेच लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांनी विसर्जन स्थळी जाऊ नये असे यापूर्वीच सूचित करण्यात आले आहे.
तरी नवी मुंबईकर नागरिकांनी विघ्नहर्त्या श्रीगणेशाचा हा उत्सव आरोग्य सुरक्षेचे भान राखून अत्यंत उत्साहाने साजरा करण्यासाठी या ऑनलाईन विसर्जन स्लॉट बुकींग सुविधेचा लाभ घ्यावा आणि आपली विसर्जनाची तारीख, वेळ व स्थळ निश्चित करावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.