मलेरिया, डेंग्यू प्रतिबंधात्मक कार्यवाहीमध्ये वाढ, नागरिकांनी आपले घर व परिसरात डास उत्पत्ती स्थाने निर्माण होऊ नयेत म्हणून घ्यावी खबरदारी
मलेरिया, डेंग्यू प्रतिबंधात्मक कार्यवाही वाढविण्याचे आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांचे निर्देश
आपले घर व परिसरात डास उत्पत्ती स्थाने निर्माण होऊ नयेत याकरिता नागरिकांनाही सजग राहण्याचे केले आवाहन
संपूर्ण मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात मागील काही दिवसात विशेषत्वाने डेंग्यू आजाराच्या रूग्णसंख्येत काही प्रमाणात वाढ होत असल्याचे निदर्शनास येताच महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी आरोग्य विभागास अधिक सतर्क होऊन डासअळीनाशक तसेच डास प्रतिबंधात्मक कार्यवाही वाढविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार डास उत्पत्ती स्थाने शोध मोहीमेसह डास अळीनाशक फवारणी व रासायनिक धुरीकरणाची कार्यवाही वाढविण्यात आली आहे.
सद्यस्थितीत अनियमितपणे पडणारा पाऊस तसेच वातावरणातील आकस्मिक बदल यामुळे सर्दी, खोकल्याच्या रूग्णांची संख्या वाढलेली दिसत आहे. सध्याच्या कोव्हीड प्रभावित काळात कोरोनाबाधितांची प्रत्यक्ष रूग्णसंख्या काहीशी मर्यादीत असली तरी कोव्हीडच्या लक्षणांशी इतर आजारांच्या लक्षणांचे साधर्म्य असल्याने महानगरपालिकेच्या वतीने कोव्हीड टेस्टींगमध्ये कोणत्याही प्रकारे घट करण्यात आलेली नाही. दैंनंदिन दररोज 7 हजारांपर्यंत टेस्टींग करण्यात येत असून कोव्हीड रूग्ण आढळतो त्याठिकाणी टारगेटेड टेस्टींग करून कोरोनाची साखळी खंडीत करण्यावर भर दिला जात आहे.
त्यासोबतच मलेरिया, डेंग्यु अथवा पावसाळी कालावधीतील इतर आजार डोके वर काढू नयेत याचीही काळजी घेतली जात आहे. याकरिता दैनंदिन डास अळीनाशक फवारणी व रासायनिक धुरीकरण व्यतिरिक्त घरांतर्गत डास उत्पत्ती स्थाने शोधून नष्ट करण्यात येत आहेत तसेच आरोग्य कर्मचारी घरोघरी भेटी देवून ताप सर्वेक्षण करीत आहेत.
जुलै व ऑगस्ट 2021 या दोन महिन्यांच्या कालावधीत दैनंदिन घरांतर्गत डास उत्पत्ती स्थाने शोध मोहिमेअंतर्गत एकुण 4,12,907 घरांना भेटी देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये 1644 ठिकाणी घरांतर्गत डास उत्पत्ती आढळून आली आहे. त्यापैकी 695 स्थाने पूर्णपणे नष्ट करण्यात आली असून 949 स्थानांवर अळीनाशक फवारणी करुन प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आलेली आहे.
या पाहणीमध्ये नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील ब-याच इमारतींच्या गच्चीवर पडलेल्या टाकाऊ वस्तू तसेच घरांच्या छज्जांमध्ये पाणी साचून तेथे डासांची उत्पत्ती होत असल्याचे आढळून येत असून ही स्थाने निर्माण होऊ नयेत व असतील तर ती पुढाकार घेऊन नष्ट करावीत यादृष्टीने नागरिकांचे प्रबोधन करण्यात येत आहे.
सद्यस्थितीत अनियमितपणे पडणा-या पावसामुळे व वातावरणातील अनियंत्रित बदलामुळे विषाणूजन्य तापाचे रुग्ण अधिक संख्येने आढळून येत आहेत. महानगरपालिकेच्या वतीने जानेवारी ते ऑगस्ट 2021 पर्यंत एकूण 55,157 रक्त नमुने घेण्यात आले आहेत. त्यापैकी 12 हिवताप दूषित रुग्ण व 85 संशयित डेंग्युचे रुग्ण आढळले आहेत.
शासकीय मार्गदर्शक सुचनेनुसार सर्वच रुग्णालयांमधून या तापाच्या निदानाकरीता ताप तपासणी तक्त्यानुसार एनएस 1 ही चाचणी केली जाते. ही चाचणी केवळ स्क्रिनींग चाचणी आहे याची नागरिकांनी नोंद घेणे गरजेचे आहे. त्यामुळे नागरिकांनी ही स्क्रिनिंग चाचणी दूषित आढळून आल्यास घाबरुन न जाता वैद्यकिय सल्यानुसार आपल्या नजिकच्या महानगरपालिका नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा नमुंमपा रुग्णालयात जाऊन औषधोपचार घेणे प्रकृतीच्या दृष्टीने आवश्यक व हितावह आहे.
नमुंमपा कार्यक्षेत्रात एखादा संशयित हिवताप, डेंग्यू रुग्ण आढळल्यास त्या परिसरात रुग्ण संशोधन कार्यवाही अंतर्गत आसपासच्या 100 घरांमधून घरांतर्गत डास उत्पत्ती शोधणे व रासायनिक धुरीकरण तसेच जलद ताप सर्वेक्षण करण्यात येते. त्याचप्रमाणे त्या भागातील नागरिकांना घ्यावयाच्या काळजीविषयी आरोग्य शिक्षण देण्यात येते. महापालिकेची सर्व रुग्णालये तसेच नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे याठिकाणी तापाच्या रुग्णाची मोफत रक्त तपासणी केली जात आहे.
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात जानेवारी ते ऑगस्ट 2021 पर्यंत डेंग्यूचे 85 संशयित रुग्ण आढळून आले असून त्यापैकी 8 रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे अंतिम निदान झाले आहे, त्यामुळे त्या परिसरातील 9763 घरांमध्ये पावडर फवारणी करण्यात आली व 9834 घरांमध्ये रासायनिक धुरीकरण करण्यात आलेले आहे.
त्याचप्रमाणे जानेवारी ते ऑगस्ट 2021 पर्यंत हिवतापाचे 12 रुग्ण आढळून आले असून या रुग्णांच्या परिसरात 1369 घरांमध्ये पावडर फवारणी करण्यात आली व 1417 घरांमध्ये रासायनिक धुरीकरण करण्यात आले आहे.
नवी मुंबई महानगरपालिका हिवताप व डेंग्यू आजारांवरील प्रतिबंधासाठी नागरी प्राथमिक आरोग्य कार्यक्षेत्रात सोसायटी-वसाहती तसेच कोव्हीड लसीकरण केंद्रांच्या ठिकाणी विशेष शिबिरांचे आयोजन करुन नागरिकांमध्ये हिवताप व डेंग्यू आजारांबाबत जनजागृती करीत आहे. अशा प्रकारची शिबिरे विविध ठिकाणी राबविण्यात येत असून त्यामध्ये डास उत्पत्ती स्थानांची प्रात्यक्षिके, डासअळी व त्यांचे प्रकार, प्रदर्शन संच, हस्तपत्रके, पोस्टर्स अशा विविध बाबींविषयी जनजागृती करण्यात येत आहे. जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यात अशा 115 शिबीरांचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये 17667 नागरिकांचे प्रबोधन करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे 22853 हस्तपत्रके वितरित करण्यात आली असून 1871 पोस्टर्स लावण्यात आली आहेत.
सद्यस्थितीत डेंग्युच्या डास उत्पत्तीसाठी पोषक वातावरण असल्याने या पारेषण कालावधीमध्ये घरांतर्गत डास उत्पत्ती टाळण्यासाठी तसेच डेंग्यूसारखे किटकजन्य आजार होऊ नयेत म्हणून नागरिकांनी आपल्या गच्चीवर, घराच्या परिसरात भंगार साहित्य, रिकाम्या बाटल्या, करवंटया, रंगाचे डबे, उघडयावरील टायर्स पडलेले असतील तर ते तातडीने नष्ट करावेत, फुलदाण्या ट्रे, फेंगशुई मध्ये साचलेले पाणी आठवड्यातून एकदा बदलावे, घरामधील व घराबाहेरील पाणी साठविण्याचे ड्रम, टाक्या, भांडी आठवडयातून एकदा पाणी काढून पूर्णपणे कोरडी करावीत, शक्यतो डास प्रतिबंधात्मक मच्छरदानीचा वापर करावा आणि महत्वाचे म्हणजे आपले घर, कार्यालय, परिसर येथे पाणी साचू देऊ नका असे सूचित करण्यात येत आहे.
डासांची निर्मिती होऊ नये याकरिता घर व परिसरात कुठेही पाणी साचू न देण्याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. यादृष्टीने डास उत्पत्ती रोखण्यासाठी नागरिकांचे संपूर्ण सहकार्य अपेक्षित असून डास उत्पत्ती स्थाने शोधण्यासाठी अथवा रासायनिक फवारणीसाठी आपल्या घरी, सोसायटी – वसाहतीत येणा-या महापालिका कर्मचा-यांना नागरिकांनी संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.