श्रीगणेशोत्सवासाठी नवी मुंबई महानगरपालिका पोलीस विभागासह सज्ज
कोव्हीड सुरक्षा नियमांचे पालन करून गणेशोत्सव आरोग्योत्सव स्वरूपात साजरा करण्याचे आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांचे आवाहन
कोव्हीड 19 च्या संभाव्य तिस-या लाटेच्या पार्श्वभूमीवर साजरा होणारा श्रीगणेशोत्सव शासनाने निर्गमित केलेल्या कोव्हीड सुरक्षा नियमावलीच्या कक्षेत काटेकोरपणे साजरा व्हावा तसेच कुठेही गर्दी होणार नाही याकडे महापालिका व पोलीस विभागाने परस्पर समन्वयाने बारकाईने लक्ष द्यावे असे निर्देश महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी श्रीगणेशोत्सव 2021 बाबतच्या पूर्वतयारी आढावा बैठकीप्रसंगी दिले.
याप्रसंगी महापालिका अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे, प्रशासन व परिमंडळ 1 उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार व परिमंडळ 2 उपआयुक्त श्री. अमरिश पटनिगेरे, शहर अभियंता श्री. संजय देसाई, परिवहन व्यवस्थापक श्री. योगेश कडुस्कर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पाटील, उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, डॉ. श्रीराम पवार, श्री. अशोक मढवी, श्रीम. संध्या अंबादे आणि सर्व विभागांचे सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी, सर्व कार्यकारी अभियंता तसेच सहा. पोलीस आयुक्त श्री. गजानन राठोड व श्री. विनायक वस्त आणि इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकामध्ये श्रीगणेमूर्तींची उंची ही सार्वजनिक उत्सवाकरिता 4 फूट व घरगुती उत्सवाकरिता 2 फूटांपर्यंत असावी असे सूचित करण्यात आले असून त्याविषयी गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी तसेच नागरिकांना यापूर्वीच माहिती देण्यात आली आहे तसेच मूर्तीकारांनाही त्याबाबत अवगत करण्यात आलेले आहे. तथापि या अनुषंगाने पुन्हा एकवार सर्व मंडळे तसेच मूर्तीकारांना माहिती देण्यात यावी असे आयुक्तांनी निर्देशित केले.
सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मंडप उभारणी करण्यासाठी मंडळांना आवश्यक परवानगी मिळणे सोयीचे जावे याकरिता 24 जुलैपासूनच www.rtsnmmconline.com या वेबपोर्टलवर विशेष सुविधा निर्माण करून देण्यात आली होती. त्यामध्ये अखेरच्या 31 ऑगस्ट 2021 या तारखेपर्यंत 133 अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी 120 मंडळांनी अर्जासह सर्व कागदपत्रे जोडल्याने त्यांना मंडप उभारणी परवानगी देण्यात आलेली आहे. सदर परवानगीशिवाय कोणीही मंडपाची उभारणी सुरू करू नये असे यापूर्वीच महानगरपालिकेमार्फत जाहीर करण्यात आले असून सदर परवानगीची प्रत मंडपात दिसेल अशा प्रकारे प्रदर्शित करण्याच्या सूचना मंडळांना पुन्हा देण्यात याव्यात असे आयुक्तांनी विभाग अधिकारी यांना सूचित केले.
सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मंडपांमध्ये गर्दी होणार नाही तसेच थर्मल गन, सॅनिटायझरची व्यवस्था असेल त्याचप्रमाणे मास्क, सुरक्षित अंतर आदी नियमांचे पालन होईल याकडे बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी विभाग कार्यालय पातळीवर पथके नेमून प्रत्येक पथकाकडे ठराविक संख्येने मंडळांची पाहणी करण्याची जबाबदारी निश्चित करून द्यावी असे आयुक्तांनी सूचित केले. मागील वर्षी श्रीगणेशोत्सवानंतरच कोरोना बाधितांची संख्या वाढू लागली होती या बाबीकडे विशेष लक्ष वेधत आयुक्तांनी त्यादृष्टीने विभाग कार्यालयांनी सतर्क रहावे व याकामी कोणत्याही प्रकारची हयगय चालणार नाही असे स्पष्ट केले. श्रीगणेशोत्सवामध्ये आरोग्यविषयक जनजागृतीचे उपक्रम राबवून श्रीगणेशोत्सव आरोग्यत्सव स्वरूपात साजरा करण्याविषयी मंडळांना प्रोत्साहीत करावे व त्यादृष्टीने प्रसिध्दी करावी असेही आयुक्तांनी निर्देशित केले.
कोव्हीड 19 चा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने गर्दी टाळणे तसेच मास्कचा वापर अनिवार्य असणे या महत्वाच्या गोष्टी असल्याचे सांगत आयुक्तांनी श्रीगणेशमूर्ती दुकानातून घरी आणताना व विसर्जन करताना कमीत कमी व्यक्ती त्याठिकाणी येतील हे पहावे व तशा प्रकारच्या सूचना नागरिकांप्रमाणेच गणेशमूर्ती विक्रेत्यांनाही द्याव्यात असे सूचित केले.
विसर्जनाच्या दिवशी गर्दी न होण्याच्या दृष्टीने मागील वर्षी 22 पारंपारिक मुख्य विसर्जन स्थळांच्या जोडीला एकूण 135 कृत्रिम विसर्जन तलावांची सर्व विभागांमध्ये निर्मिती करण्यात आली होती. या संकल्पनेला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला होता. त्यामुळे मागील वर्षीच्या विसर्जनाचा आढावा घेऊन यावर्षी नागरिकांना अधिक सोयीचे होईल अशा नवीन 21 कृत्रिम तलावांची वाढ करीत एकूण 156 कृत्रिम विसर्जन तलाव निर्माण करण्यास आयुक्तांनी यापूर्वीच परवानगी दिलेली आहे व त्यांच्या कामास सुरूवातही झालेली आहे. ही कृत्रिम विसर्जन तलाव निर्मितीची कामे श्रीगणेशोत्सव सुरू होण्याच्या आदल्या दिवशीच पूर्ण असावीत असे निर्देश देत नागरिकांच्या माहितीसाठी या विसर्जन तलावांच्या ठिकाणांची माहिती फ्लेक्स होर्डींगव्दारे तसेच सोशल मिडियाच्या विविध माध्यमांतून नागरिकांच्या माहितीसाठी व्यापक स्वरूपात प्रसिध्द करावी असेही आयुक्तांनी निर्देश दिले.
कृत्रिम विसर्जन तलाव निर्मितीसोबत सर्व तलावांत योग्य पातळीपर्यंत पाणीव्यवस्था, पूजा व आरतीसाठी टेबल्स, विसर्जनासाठी स्वयंसेवक व्यवस्था अशा बाबींकडेही बारकाईने लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच या कृत्रिम तलावांची अखेरच्या विसर्जनदिनानिमित्त सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेण्याचेही आयुक्तांमार्फत सूचित करण्यात आले.
याशिवाय नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पारंपारिक 22 मुख्य विसर्जन स्थळांवरही प्रतिवर्षीप्रमाणे सर्व सुयोग्य व्यवस्था करण्याच्या सूचना आयुक्तांनी यावेळी दिल्या. त्यामध्ये प्रामुख्याने त्याठिकाणी स्वयंसेवक व लाईफगार्ड्स व्यवस्था, तेथील विद्युतव्यवस्था, सीसीटिव्ही व्यवस्था, प्रथमोपचार व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, निर्माल्याचे ओले व सुके असे वेगवेगळे संकलन करणे, त्याचे पावित्र्य जपत योग्य रितीने विल्हेवाट लावणे तसेच कोणत्याही परिस्थितीत हार व पुजा साहित्य पाण्यात टाकले जाणार नाही याची दक्षता घेण्याचे व यासाठी आवश्यकतेनुसार स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घेण्याचे आयुक्तांनी निर्देशित केले.
नवी मुंबई महानगरपालिका व पोलीस विभाग नागरिकांना श्रीगणेशोत्सव उत्साहाने साजरा करता यावा यासाठी सज्ज आहे. तथापि नागरिकांनी सध्याची कोव्हीड 19 परिस्थिती लक्षात घेता आपल्या वर्तनामुळे कोव्हीडच्या तिस-या लाटेला निमंत्रण तर दिले जात नाही ना? असा प्रश्न स्वत:लाच विचारून स्वयंशिस्तीचा अवलंब करावा आणि कोव्हीड प्रतिबंधात्मक अनुरूप वर्तन (covid appropriate behavior) ठेवावे. शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे तसेच आपल्याला कोरोनाची लागण होणार नाही व आपल्यामुळे इतरांना कोरोनाची लागण होऊन प्रादुर्भाव वाढणार नाही याची दक्षता घ्यावी आणि यावर्षीचा गणेशोत्सव आरोग्योत्सव स्वरूपात साजरा करावा असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी केले आहे.