ठामपा सहा. आयुक्त श्रीम. कल्पिता पिंपळे यांच्यावरील हल्ल्याचा नमुंमपा अधिकारी – कर्मचारी यांनी केला निषेध
ठाणे महानगरपालिकेच्या माजिवडा विभागाच्या सहाय्यक आयुक्त श्रीम. कल्पिता पिंपळे यांच्यावर 30 ऑगस्ट रोजी फेरीवाला विरोधी कारवाई करताना झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करीत अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारावर शीघ्रगतीने खटला चालवून त्याला कायद्यानुसार कठोर शिक्षा होण्यासाठी शासनाकडून विशेष प्रयत्न व्हावेत याबाबतचा आग्रह शासनाला कळविण्यात यावा अशा आशयाचे लेखी निवेदन नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी, कर्मचारीवृंदाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे व श्रीम. सुजाता ढोले यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारीवृंदाने महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांना दिले.
याप्रसंगी प्रशासन विभागाचे उप आयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. धनराज गरड, उप आयुक्त सर्वश्री. जयदीप पवार, मनोजकुमार महाले, श्रीराम पवार, राजेश कानडे, क्रांती पाटील, परिवहन व्यवस्थापक श्री. योगेश कडुस्कर व परिवहन उपक्रमाचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. निलेश नलावडे, सहाय्यक आयुक्त सर्वश्री. अनंत जाधव, सुबोध ठाणेकर, श्रीम. मंगला माळवे, श्रीम. मिताली संचेती आणि इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
एका महिला अधिका-यावर अशाप्रकारचा हल्ला होणे ही चिंताजनक बाब असून अशा घटनांचा सर्व स्तरावरून निषेध होणे आवश्यक आहे. शासकिय, प्रशासकिय अधिका-यांवर आपले कर्तव्य बजावत असताना गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक अशा प्रकारचा भ्याड हल्ला करतात तेव्हा संपूर्ण प्रशासनाचे मनोधैर्य खच्ची होते. त्यामुळे अशा हल्लेखोरांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. या प्रकरणातील गुन्हेगाराला कठोरात कठोर शिक्षा व्हावी ही मागणी करीत आपले दैनंदिन कामकाज करताना शासकिय, प्रशासकिय अधिकारी व कर्मचारी यांना सुरक्षित वातावरण निर्माण होण्याकरिता आवश्यकतेनुसार सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून द्यावी अशीही मागणी नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी, कर्मचारीवृंदामार्फत या निवेदनाच्या माध्यमातून आयुक्तांकडे करण्यात आलेली आहे.