भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक कामाची पालकमंत्री ना. श्री. एकनाथ शिंदे यांनी केली पाहणी
ऐरोलीमध्ये 1.5 एकरात नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्यतम स्मारक उभारले जात असून यापुढील काळात स्मारकाचे काम अधिक गतीने युध्दपातळीवर करीत 6 डिसेंबर रोजीच्या महापरिनिर्वाण दिनापर्यंत स्मारकाच्या आतील काम पूर्ण करून हे स्मारक जनतेसाठी खुले करावे असे निर्देश महाराष्ट्र राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना.श्री.एकनाथ शिंदे यांनी दिले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ऐरोली सेक्टर 15 येथे उभारण्यात येत असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक उभारणीचे दुस-या टप्प्यातील काम सुरू असून त्याची पाहणी आज नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना.श्री.एकनाथ शिंदे यांनी केली. याप्रसंगी ठाणे लोकसभा सदस्य खासदार श्री. राजन विचारे, महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
स्मारकाची पाहणी करताना मंत्रीमहोदयांनी बाबासाहेबांच्या जन्मापासून संपूर्ण जीवनचरित्राचा आलेख मांडणारे दुर्मिळ छायाचित्रांचे माहितीपूर्ण दालन, देशाला राज्यघटना सादर करतानाचे बाबासाहेबांचे भाषण हे आभासी वास्तवदर्शी चित्रणाव्दारे (Augmented Reality) दाखविण्याची नाविन्यपूर्ण संकल्पना, बाबासाहेबांनी लिहिलेल्या व त्यांच्या चरित्रावर आधारित पुस्तकांचे समृध्द ग्रंथालय, विविध कार्यक्रमांसाठीचे भव्यतम सभागृह अशा विविध प्रकारच्या अभिनव संकल्पनांचा स्मारकात अंतर्भाव केल्याबद्दल प्रशंसा केली. तसेच जगभरातील इतर चांगल्या स्मारकांचा अभ्यास करून या स्मारकाच्या नावलौकीकात भर घालणा-या आणखी कोणत्या वेगळ्या गोष्टी करता येतील, त्याचाही अंतर्भाव करून हे स्मारक देशातील सर्वोत्तम स्मारक होण्यासाठी जीव ओतून काम करावे असे सूचित केले.
महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी स्मारकामधील विविध दालने तसेच सुविधांविषयीची सविस्तर माहिती दिली. संपूर्ण स्मारकातील विविध बाबींची मंत्री महोदयांनी बारकाईने पाहणी केली व ऑडिओ माध्यमाव्दारेही बाबासाहेबांचे चरित्र सांगितले जावे अशा मौलिक सूचना केल्या.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनचरित्र आपल्या सर्वांसाठी सदैव प्रेरणादायी आहे. त्यामुळे या स्मारकाच्या माध्यमातून बाबासाहेबांविषयीचा आपल्या मनात असलेला सार्थ अभिमान वृध्दींगत होईल अशाप्रकारे गतीमान काम करण्याचे निर्देश देत या महापरिनिर्वाण दिनानिमित्त हे स्मारक नागरिकांसाठी खुले होईल असा विश्वास पालकमंत्री ना.श्री.एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.