दही हंडी खरेदीदार नसल्याने व्यावसायिक चिंतीत
उरण (दिनेश पवार) कोरोनामुळे गेल्यावर्षी जन्माष्टमी साजरी झालीच नाही, ना दहीहंडी फुटल्या. यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून शासनाने निर्बंधही मोठ्या प्रमाणावर शिथिल केले आहेत. तरीही यंदा या उत्सवाला परवानगी नाकारण्यात आली आहे. तरीही काही नियम अटींवर यंदा गोविंदा खेळण्यास परवानगी मिळेल, अशी आशा युवक तसेच व्यावसायिकांना आहे. गोविंदासाठी उरण बाजारात विविध रंगांच्या आकाराच्या हंड्या विक्रीसाठी आल्या आहेत.
५० टक्के तरी धंदा होईल की नाही अशी चिंता हंडी आणि शिग घेण्यासाठी अजून गोविंदा पथकांची पावलं दुकानाकडे वळलेली नाहीत. त्यामुळे यंदाही ५० टक्के तरी धंदा होईल की नाही अशी चिंता व्यावसायिकांना आहे असे उरण तालुक्यातील मुलेखंड गावातील कुंभार सुरेखा कुंभार यांनी सांगितले.
४० रूपयांपासून ते अगदी २५० रूपयांपेक्षा अधिक किंमतीच्या हंड्या सध्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. रस्त्याच्या कडेला राजपाल नाका, महाराष्ट्र स्वीट, महाराष्ट्र ज्वेलर्सच्या बाजूला, गांधी चौक आदी ठिकाणी व दुकानांच्या बाहेर या हंड्या विक्रीसाठी ठेवलेल्या दिसत आहेत.
कृष्णजन्म झाल्यावर रात्री बारा वाजता काही ठिकाणी हंडी बांधून ती बालगोपाळांकडून फोडून घेतात. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी गोपाळकाला रंगतो. या हंड्या अगदी पाच फुटापासून १५ फुटांपर्यंत उंच बांधल्या जातात. परंतु यावेळी कोरोनामुळे एक तरी थर लावता येईल का अशी शंका उपस्थित केली जात आहे. गणपतीपूर्वी येणाऱ्या या मोठ्या सणासाठी सध्या बाजारपेठा सजल्या आहेत. गोविदांसाठी लागणाऱ्या रंगीबेरंगी हंड्या, दुकानांबाहेर लटकताना दिसत आहेत. मात्र ते खरेदीसाठी कोणी येत नसल्याने व्यावसायिक चिंतेत आहेत.