कोव्हीड लसीचा पहिला डोस घेऊन 8 लाख तर दोन्ही डोस घेऊन 3 लाखाहून अधिक नवी मुंबईकर संरक्षित
ऑगस्ट महिन्यात पुरेशा प्रमाणात कोव्हीड लसीचे डोस उपलब्ध झाल्याने 8 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट या कालावधीत 1 लाख 5 हजार 476 नागरिकांना कोव्हीड लसीचा पहिला डोस तसेच 66 हजार 642 नागरिकांना कोव्हीड लसीचा दुसरा डोस देण्यात आला असून *आत्तापर्यंत 8 लाखाहून अधिक नवी मुंबईकर नागरिकांनी कोव्हीड लसीचा पहिला डोस तसेच 3 लाखाहून अधिक नागरिकांनी कोव्हीड लसीचा दुसरा डोस घेतलेला आहे.
जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करून त्यांना संरक्षित करण्यासाठी महापालिका आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार महानगरपालिकेमार्फत 91 लसीकरण केंद्रे कार्यान्वित करण्यात आली असून लसीच्या उपलब्धतेनुसार दैनंदिन लसीकरणाचे योग्य नियोजन केले जात आहे. त्याचप्रमाणे नागरिकांना त्यांच्या घरापासून जवळच लस घेणे सुविधाजनक व्हावे व कोव्हीड लसीकरणाला वेग देण्यासाठी अधिक लससाठा उपलब्ध झाल्यास शंभरहून अधिक लसीकरण केंद्रे सुरू करण्याचे संपूर्ण नियोजन करण्यात आलेले आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेची लसीकरण केंद्रे व खाजगी रूग्णालयांतील केंद्रे याठिकाणी आत्तापर्यंत 8 लाख 7 हजार 415 नागरिकांनी कोव्हीड लसीचा पहिला डोस घेतला आहे. तसेच 3 लाख 4 हजार 155 नागरिक कोव्हीड लसीचे दोन्ही डोस घेत पूर्ण संरक्षित झालेले आहेत.
यामध्ये –
कोव्हीड लसीचे एकूण 11 लक्ष 11 हजार 570 डोस नागरिकांना देण्यात आलेले आहेत. म्हणजेच अपेक्षित लाभार्थीपैकी 76 टक्के नागरिकांनी पहिला डोस तसेच 28 टक्के नागरिकांनी दोन्ही डोस घेतलेले आहेत. लसीकरणाचे हे प्रमाण इतर मोठ्या शहरांच्या तुलनेत अधिक आहे.
कोव्हीडच्या संभाव्य तिस-या लाटेपूर्वी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण व्हावे याकरिता नवी मुंबई महानगरपालिका प्रयत्नशील असून लस उपलब्ध होईल त्यानुसार ज्यांनी लसीचा पहिला डोस घेतलेला आहे त्यांना विहित कालावधीत दुसरा डोस उपलब्ध करून देण्याची काळजी घेतली जात आहे तसेच 45 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला प्राधान्य दिले जात आहे. या महिन्यात पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध झाल्याने 30 वर्षावरील नागरिकांकरिता विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले होते.
याशिवाय ज्या व्यक्तींचा विविध सेवा पुरविताना मोठ्या प्रमाणावर लोकसंपर्क येतो असे मेडिकल स्टोअर, हॉटेल, सलून, ब्युटी पार्लर, पेट्रोल पम्प, टोल नाका तसेच घरोघरी गॅस वितरण करणारे कर्मचारी, घरकाम करणारे महिला व पुरूष कामगार, ऑटो / टॅक्सी वाहनचालक, सोसायटी वॉचमन अशा कोरोनाच्या दृष्टीने जोखमीच्या व्यक्ती (Potential Superspreders) यांचेकरिता विशेष लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे बेघर, निराधार व्यक्ती, तृतीयपंथीय यांचेकरिता तसेच कॉरी क्षेत्र आणि रेडलाईट भागातही विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात आलेली आहे. कोणताही घटक लसीकरणापासून दुर्लक्षित राहू नये याची सर्वोतोपरी काळजी घेतली जात आहे.
कोव्हीड लसीकरण हे कोरोनाची लागण झाल्यास त्याची तीव्रता कमी करण्यासाठी लाभदायी आहे. मात्र कोव्हीड होऊच नये याकरिता मास्कचा नियमित वापर, चेह-याला कोठेही स्पर्श न करणे, सुरक्षित अंतर राखणे, वारंवार हात स्वच्छ करणे असे कोव्हीड अनुरूप वर्तन (Covid Appropriate behaviour) आपली सवय बनविणे अत्यंत गरजेचे आहे. सध्या कोरोनाबाधीतांची संख्या काहीशी कमी झाल्याने प्रतिबंधातून सवलत देण्यात आली असली तरी कोरोना अजून संपलेला नाही याची जाणीव ठेवावी व कोव्हीड नियमांचे उल्लंघन करून कोरोनाला निमंत्रण देऊ नये असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.