नवी मुंबई

अखंडीत पाणीपुरवठ्यासाठी जलवितरणाचे पुनर्नियोजन करण्याचे आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांचे निर्देश

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात एमआयडीसी मार्फत महानगरपालिकेस वितरीत होणारा पाणीपुरवठा अनियमित व कमी दाबाने होत असल्याने पाणीपुरवठ्याविषयी विशेषत्वाने दिघा, ऐरोली, राबाडे तसेच इतर काही भागांतून लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांकडून प्राप्त होत आहेत. पाणीपुरवठ्याविषयी मागील काही दिवसांपासून या वाढलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी महानगरपालिकेसह एमआयडीसी व सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिका-यांची तातडीने बैठक आयोजित करीत याठिकाणचा पाणीपुरवठा अखंडीत व योग्य दाबाने रहावा याकरिता जलवितरण प्रक्रियेचे निरीक्षण करून जलवितरणाचे पुनर्नियोजन करण्याचे निर्देश दिले.

याप्रसंगी नवी मुंबई महानगरपालिकेचे शहर अभियंता श्री. संजय देसाई व कार्यकारी अभियंता श्री. मनोहर सोनावणे, एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता श्री. आर.जी. राठोड, उप अभियंता श्री. संतोष कळसकर तसेच सिडकोचे मुख्य अभियंता श्री. राजेंद्र दहाटकर व अधिक्षक अभियंता पाणीपुरवठा श्री. प्रणिक मूल हे प्रत्यक्ष बैठकीत त्याचप्रमाणे एमआयडीसीचे मुख्य अभियंता श्री. सुधाकर वाघ हे वेब प्रणालीव्दारे उपस्थित होते.

पाणी ही जीवनावश्यक बाब असून त्याबाबत लोकांच्या भावना तीव्र असतात हे लक्षात घेऊन महानगरपालिका, सिडको व एमआयडीसी या तिन्ही प्राधिकरणांनी परस्परांशी समन्वय राखून सगळीकडे समाधानकारक पाणीपुरवठा राहील याविषयी जलवितरणाचे पुनर्नियोजन करावे असे निर्देश आयुक्तांनी दिले. पुनर्नियोजन केल्यानंतर झालेल्या परिणांमाचाही नियमित आढावा घ्यावा असेही निर्देशित करण्यात आले.

साधारणत: मागील महिन्यापासून पाणीपुरवठ्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली असल्याचे नमूद करीत एमआयडीसी मार्फत 1 जुलैपासून झालेल्या दिवसनिहाय पाणीपुरवठ्याचा या बैठकीत सविस्तर आढावा घेण्यात आला. याविषयी एमआयडीसीमार्फत मांडण्यात आलेल्या पूर परिस्थिती व शटडाऊन स्थितीमुळे पाणीपुरवठ्यामध्ये झालेली अनियमितता लक्षात घेतली तरी त्यामुळे नागरिकांना जाणवलेली पाणी टंचाई लक्षात घेऊन या 54 दिवसात सरासरीपेक्षा कमी पुरवठा झाल्याचे आयुक्तांनी निदर्शनास आणून दिले व हा पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी तातडीने नियोजन करावे असे निर्देश दिले.

सिडकोच्या काही भागात महानगरपालिकेच्या मोरबे धरणाचे पाणी दिले जात असून महानगरपालिका व सिडको यांच्यामार्फत दैनंदिन पाणीपुरवठ्याची टॅपींगच्या ठिकाणी घेतली जाणारी नोंद एकाच वेळी घेतली जावी व त्याचे छायाचित्र काढून व्हॉट्सॲपव्दारे परस्परांशी संपर्क राखावा असेही आयुक्तांनी यावेळी निर्देशित केले.

पाणीपुरवठा हा नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय असल्याने तिन्ही प्राधिकरणांनी याचे गांभीर्य ओळखून पाणी वितरणाचे पुनर्नियोजन करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले व पाणीपुरवठा योग्य दाबाने व नियमितपणे होत आहे याकडे काटेकोर लक्ष देण्याचे आदेशित केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button