शिरवणे, जुईनगर परिसरात 800 किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त व 40 हजार दंडात्मक रक्कम वसूल
शहर स्वच्छतेप्रमाणेच पर्यावरण आणि मानवी जीवनाला घातक असणा-या प्रतिबंधित प्लास्टिक वापरावरही अंकुश ठेवण्याच्या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कार्यवाही केली जात आहे. महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी विशेष बैठक घेत दिलेल्या निर्देशानुसार या कार्यवाहीला वेग आला असून आज नेरूळ विभागात घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांच्या स्वच्छताविषयक पाहणीप्रसंगी आढळून आलेल्या सिंगल यूज प्लास्टिकवर धडक कारवाई करीत 800 किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे तसेच संबंधितांकडून 40 हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली आहे.
नेरूळ विभागात से. 19 दैनंदिन बाजार शिरवणे आणि जुईनगर सेक्टर 23 गावदेवी मार्केट याठिकाणी सिंगल यूज प्लास्टिकबाबत ही कडक कारवाई करण्यात आली आहे. दोन छोट्या टेम्पोमध्ये गोणींत भरलेले सिंगल युज प्लास्टिक किरकोळ विक्रीसाठी शिरवणे गावात आले असतानां ही कारवाई करण्यात आली. हे दोन्ही नेरूळ टेम्पो विभाग कार्यालयात जमा करण्यात आले आहेत. यामध्ये असलेले साधारणत: एकूण 800 किलो सिंगल युज प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करण्यात आले असून 40 हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल करून घेण्यात आली आहे.
या अचानक आढळून आलेल्या या मोहीमेत मुख्य स्वच्छता अधिकारी श्री. राजेंद्र सोनवणे, स्वच्छता अधिकारी श्री.राजेंद्र इंगळे, स्वच्छता निरीक्षक श्री.अरूण पाटील व श्रीमती जयश्री अढळ, उपस्वच्छता निरीक्षक श्री. निलेश पाटील व श्री.अजित तांडेल श्री. भुषण सुतार आणि साफसफाई पर्यवेक्षक यांनी सहभाग घेतला. प्रतिबंधित प्लास्टिक विरोधातील मोहीम अधिक तीव्र स्वरूपात राबविण्यात येणार आहे.