नवी मुंबई

थकबाकीदार 119 जप्त मालमत्तांवरील भूखंड / मिळकती विक्रीच्या कार्यवाहीचा हुकुमनामा प्रसिध्द

थकबाकीसह मालमत्ताकर भरण्याची नोटीस बजावूनही नोटीशीच्या विहीत कालावधीत थकबाकी न भरणा-या 119 मालमत्ताधारकांवर कायदेशीर कारवाई करीत थकबाकी वसूल करण्याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मालमत्ताधारक यांच्या नावावर असलेले मोकळे भूखंड / मिळकती जप्त करण्यात आलेल्या आहेत. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम प्रकरण 8 मधील नियम 45 अन्वये सदर जप्तीची कार्यवाही करण्यात आली असून मालमत्ताकर थकबाकीदार कसूरदाराने त्यांच्या मिळकतीवरील कराची रक्कम वसूलीच्या खर्चासह 21 दिवसाच्या आत महानगरपालिकेकडे जमा केली नाही तर मिळकतीची विक्री करण्यात येईल असा हुकुमनामा मालमत्ताकर विभागामार्फत जारी करण्यात आलेला आहे.

सदर मिळकतधारक / मालक यांनी सदर मिळकत विक्री / गहाण, दान या व अन्य प्रकारे मालकी हक्कामध्ये बदल करण्यास प्रतिबंधीत करण्यात येत असल्याचे हुकुमनाम्यात स्पष्ट नमूद करण्यात आलेले आहे.

मालमत्ता कर हा महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत असल्याने मालमत्ताकर विषयक बाबींचा नियमित आढावा महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने घेतला जात असून थकबाकीदारांना अभय योजनेची सवलत देऊनही त्याचा लाभ न घेणा-या व त्यानंतरही नोटीशीस प्रतिसाद न देणा-या मोठ्या मालमत्ताकर थकबाकीदारांवर कारवाई केली जात आहे.

मालमत्ताकर थकबाकीदारांना थकबाकीच्या रक्कमेमध्ये 75 टक्के इतकी सवलत देण्याची अभय योजना नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने जाहीर करण्यात आली होती. या दोन महिन्यांच्या कालावधीतही अभय योजनेला प्रतिसाद न देणा-या मोठ्या रक्कमेच्या मालमत्ताकर थकबाकीदारांना नोटीस बजावून संधी देण्यात आली होती. तथापि या नोटीशीचा कालावधी संपूनही नोटीशीला प्रतिसाद न देणा-या 119 मालमत्ता जप्त करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये बेलापूर विभागातील 19, नेरुळ विभागातील 20, वाशी विभागातील 34, तुर्भे विभागातील 10, कोपरखैरणे विभागातील 17, घणसोली विभागातील 12 व ऐरोली विभागातील 7 अशा एकूण 119 मालमत्तांचा समावेश आहे.

या 119 मालमत्ताधारकांना रक्कम भरणा करण्यासाठी 21 दिवसांची मुदत देण्यात आलेली असून या कालावधीतही प्रतिसाद न देणा-या थकबाकीदारांच्या मालमत्तांची विक्री केली जाणार आहे याची स्पष्ट सूचना हुकुमनाम्याव्दारे जाहीर करण्यात आलेली आहे. सदर हुकुमनामा नागरिकांच्या माहितीसाठी नवी मुंबई महानगरपालिकेचे संकेतस्थळ www.nmmc.gov.in यावर प्रसिध्द करण्यात आलेला आहे.

तरी सदर 119 मालमत्ताकर थकबाकीदार कसुरदारांनी त्यांच्या मिळकतीवरील कराची रक्कम वसूलीच्या खर्चासह 21 दिवसांच्या आत महानगरपालिकेकडे जमा करावी अन्यथा मिळकतीची विक्री केली जाईल हे लक्षात घ्यावे तसेच नागरिकांना या मिळकतीसंबंधी खरेदी / गहाण, दान व अन्य त-हेने मालकी हक्कात बदल करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे याची नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने थकबाकीदारांविरोधातील कारवाई अशीच सुरु राहणार असून थकबाकीदारांनी आपल्या मालमत्तांची जप्ती / विक्री याची वाट न बघता मालमत्ताकर थकबाकीचा भरणा करावा असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button