नमुंमपा शाळांतील 89 विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत फडकविला यशाचा झेंडा
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत 6 एप्रिल 2021 रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या 21 शाळांमधून 243 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते.
इयत्ता आठवीसाठी घेण्यात आलेल्या या परीक्षेतील गुणवंतांची निवड यादी 19 ऑगस्ट 2021 रोजी प्रसिध्द झाली असून यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या 89 विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती पटकाविलेली आहे. या 89 गुणवंतांमध्ये 48 विद्यार्थी व 41 विद्यार्थिनींचा समावेश आहे. मुलांइतक्याच संख्येने मुलींनीही शिष्यवृत्ती परीक्षेत मिळविलेल्या उज्वल यशाबद्दल विशेष कौतुक करण्यात येत आहे.
कोव्हीडच्या काळात शाळा प्रत्यक्ष सुरू नसताना या विद्यार्थ्यांकरिता नियमित अभ्यासक्रमाव्यतिरिक्त या शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी सर्व वर्गशिक्षकांनी ऑनलाईन करून घेतली. त्याचप्रमाणे गृहभेटींमधूनही या विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील शंकांचे शिक्षकांमार्फत निराकरण करण्यात आले. या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांचेमार्फत प्रकाशित विशेष पुस्तके नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आली होती. ऑनलाईन शिक्षण पध्दती असूनही महानगरपालिकेच्या शिक्षकांनी अत्यंत चांगल्या प्रकारे मुलांना शिकविले व मुलांनाही मनापासून केलेला अभ्यास आणि शिष्यवृत्ती परीक्षेच्या केलेल्या तयारीमुळे हे यश त्यांना लाभलेले आहे.
या शिष्यवृत्ती प्राप्त 89 गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये 21 महानगरपालिका शाळांतून आंबेडकरनगर, राबाडे येथील छत्रपती शाहू महाराज विद्यालय शाळा क्र. 55 या शाळेतील सर्वाधिक 35 विद्यार्थी शिष्यवृत्तीप्राप्त झालेले असून नमुंमपा शाळा क्र. 42 घणसोली या शाळेतील 16 विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती संपादन केलेली आहे.
शिष्यवृत्तीप्राप्त या 89 विद्यार्थ्यांना दरमहा 1 हजार इतक्या रक्कमेची शिष्यवृत्ती इ. 12 वी पर्यंत मिळणार असून या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीसाठी ही रक्कम महत्वाची आहेच, शिवाय स्पर्धा परीक्षेतील हे यश त्यांचा आत्मविश्वास वाढविणारे आहे.
अशाप्रकारे नवी मुंबई महानगरपालिका शाळांतील 89 विद्यार्थ्यांनी कोव्हीड काळातही इतक्या मोठ्या प्रमाणावर मिळविलेले हे यश निश्चितच अभिमानास्पद असल्याचे नमूद करीत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.