नवी मुंबई

ऑगस्ट महिन्यातील प्रत्येक रविवारी स्वच्छतेच्या उपक्रमांमध्ये नागरिकांचा उत्स्फुर्त सहभाग

स्वच्छतेचा संकल्प दृढ करण्यासाठी भारत सरकारच्या शहर विकास मंत्रालयाच्या वतीने स्वच्छ भारत मिशन व स्वच्छ महाराष्ट्र मिशन अंतर्गत ‘स्वच्छता संकल्प देश का – हर रविवार विशेष सा’ या संकल्पनेवर आधारित विविध उपक्रमांची मोहीम ऑगस्ट महिन्यातील प्रत्येक रविवारी राबविण्याचे सूचित करण्यात आले होते.

त्यास अनुसरून महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार 1, 6, 15 व 22 अशा ऑगस्ट महिन्याच्या प्रत्येक रविवारी दिलेल्या संकल्पनेनुसार सर्व विभाग कार्यालय क्षेत्रांत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले व त्यामध्ये व्यापक लोकसहभागावर भर देण्यात आला.

22 ऑगस्टच्या रविवारकरिता देण्यात आलेल्या ‘लिटरींग अँड स्पिटींग से आझादी’ या संकल्पनेनुसार आठही विभाग कार्यालय क्षेत्रात आयोजित करण्यात आलेले विविध उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यात आले. नारळी पौर्णिमेच्या दिवसाचे औचित्य साधून बेलापूर विभागात एनआरआय मागील बाजूस असलेल्या सागरी किना-याची स्वच्छता मोहीम इन्व्हायरमेंट लाईफ संस्थेच्या सहयोगाने बेलापूर विभागातील अधिकारी, कर्मचा-यांनी राबविली. तसेच करावेगांव तलावाजवळ नागरिकांमध्ये सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकणे व न थुंकणे याविषयी जनजागृती उपक्रम राबविण्यात आला.

नेरूळ विभागात सेक्टर 10 मार्केट भागात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली तसेच दुकानदार व नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली. वाशी विभागात रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या रिक्षा स्टॅंड परिसरात स्वच्छता मोहीम राबवून रिक्षाचालकांचे व प्रवाशांचे प्रबोधन करण्यात आले. तुर्भे विभागात सेक्टर 4, 5 व 9 भागामध्ये स्वच्छता मोहीम राबवून जनजागृती करण्यात आली.

कोपरखैरणे विभागात सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकला जाणा-या सेक्टर 5 व 17 मधील जागांची स्वच्छता करून सुशोभिकरण करण्यात आले व नागरिकांनी कचरा महानगरपालिकेच्या कचरागाड्यांमध्येच द्यावा याविषयी जनजागृती करण्यात आली. घणसोली विभागात आंबेडकरनगर राबाडे भागातील मार्केट क्षेत्रात सफाई मोहीम राबवून दुकानदार व नागरिक यांना पथनाट्य सादरीकरणाव्दारे हसतखेळत स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यात आले.

ऐरोली विभाग कार्यालयाजवळील सेक्टर 3 च्या मार्केट परिसरात स्वच्छता मोहीम राबवून स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात आली. तसेच चिंचपाडा भागात पथनाट्य सादरीकरण करण्यात आले. दिघा विभागात सुभाषनगर येथे व्यापक लोकसहभागातून स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली तसेच रामनगर भागात पथनाट्याव्दारे मनोरंजनातून स्वच्छता संदेश प्रसारित करण्यात आला.

यापूर्वीच्या रविवारी देखील 1 ऑगस्ट रोजी ‘गंदगी से आझादी’ या संकल्पनेनुसार अस्वच्छतेपासून मुक्ती संदेश प्रसारणासाठी आठही विभाग कार्यालयांनी आपल्या क्षेत्रातील मोठ्या सोसायट्यांमध्ये जाऊन कचरा वर्गीकरणाचे महत्व पटवून दिले. तसेच घरातील ओल्या कच-याची कम्पोस्ट बास्केट वापरून घरातच विल्हेवाट लावणे, सोसायटीच्या आवारात कम्पोस्ट पीट्सची व्यवस्था करणे याविषयी जनजागृती कऱण्यात आली. त्याकरिता पथनाट्यासारख्या मनोरंजनातून प्रबोधन करणा-या माध्यमाचा वापर करण्यात आला.

8 ऑगस्टच्या रविवारची ‘घरेलू घातक कचरे से आझादी’ ही संकल्पना असल्याने विभाग कार्यालयांमार्फत सोसायट्यांमध्ये जाऊन घरगुती घातक कच-याविषयी व तो वेगळा ठेवण्याच्या आवश्यकतेविषयी जनप्रबोधन करण्यात आले. याबाबत विभागांतील मार्केट परिसरात जाऊनही माहिती देण्यात आली.

अमृतमहोत्सवी भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून 15 ऑगस्टच्या रविवारी त्या दिवसाकरिता जाहीर केलेल्या ‘सिंगल युज प्लास्टिक से आझादी’ या संकल्पनेनुसार विशेषत्वाने मार्केट क्षेत्रामध्ये जाऊन तसेच फेरीवाल्यांमध्ये सिंगल युज प्लास्टिकचा वापर करू नये याबाबत जागरूकता निर्माण करण्याचे उपक्रम सर्वच विभागांमध्ये राबविण्यात आले. त्याठिकाणी खरेदीसाठी आलेल्या नागरिकांनाही प्लास्टिकचे दुष्परिणाम सांगून त्यांच्यामध्येही जागृती करण्यात आली. याच दिवशी महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी मुख्यालयातील ‘स्वच्छतेचे पुढचे पाऊल’ या विशेष कार्यक्रमात ‘स्वच्छ सर्वेक्षण 2022’ करिता नवी मुंबई आजपासून सज्ज होत असल्याचे जाहीर केल्याने हे सर्व उपक्रम अत्यंत उत्साहात राबविण्यात आले.

लोकसहभागातून स्वच्छतेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत असून त्यामध्ये स्वच्छताप्रेमी नागरिकांचा उत्तम सहभाग मिळत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button