देश

बहीण-भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा सण – रक्षाबंधन

हिंदू पंचांगाप्रमाणे श्रावणात येणारी राखी पौर्णिमा ही नारळी पौर्णिमेच्या दिवशी किंवा पौर्णिमा लागोपाठ दोन दिवस असेल तर दुसऱ्या दिवशी असणाऱ्या पौर्णिमेला साजरी करतात. याच दिवसाला ‘रक्षाबंधन’ म्हणतात. हा सण बहीण-भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस आहे. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची मंगल मनोकामना असते. बहीण या दिवशी भावाला ओवाळून त्याचा हातावर राखी बांधते आणि आपले भावाविषयी प्रेम व्यक्त करते. “राखी’ ह्या शब्दातच “रक्षण कर’ – “राख म्हणजे सांभाळ’ हा संकेत आहे.

भाऊ-बहीण एकत्र असोत किंवा एकमेकांपासून दूर रक्षाबंधन जल्लोषात साजरा करण्यासाठी हे दोघंही कित्येक दिवस आधीपासूनच तयारी करत असतात. या सणाच्या निमित्ताने भाऊ-बहिणी आपल्या नात्यातील आठवणींना उजाळा देतात. एकमेकांसोबत वादही घालतात आणि थोड्या वेळानंतर एकमेकांवर प्रेमाचाही वर्षावही करतात, असे हे मजबूत नाते.

पुराणात असे म्हटले जाते कि दानवांचा राजा वृत्रासुर याने देवांचा राजा इंद्र याला युद्धाचे आव्हान दिले. इंद्र आपले वज्र घेऊन युद्धास निघाला. त्या वेळी इंद्राला विजय मिळावा म्हणून त्याची पत्नी शुची हिने विष्णूकडून मिळालेला एक दोरा (राखी) इंद्राच्या हातावर बांधला. त्या राखीच्या प्रभावाने इंद्राला त्या युद्धात विजय मिळेल, अशी तिची श्रद्धा होती. इंद्राचा विजय झाला आणि त्याचे गेलेले वैभव परत मिळाले. या प्रसंगाची आठवण म्हणून मनगटावर राखी बांधण्याची पद्धत पडली, असे सांगितले जाते. पांडवांची पत्नी द्रौपदीने भगवान श्रीकृष्णाच्या मनगटामधून वाहणारे रक्त थांबवण्यासाठी तिच्या साडीचा कोपरा फाडून त्याच्या मनगटावर बांधला कारण भगवान कृष्णाने अनवधानाने स्वतःला जखमी केले होते. अशा प्रकारे, भाऊ आणि बहीण आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यात एक बंध निर्माण झाला आणि द्रौपदीचे रक्षण करण्याचे वचन दिले.

ऐतिहासिक काळात चित्तोडच्या राणी कर्मवतीने हुमायूॅं बादशहाला राखी पाठवली व हुमायूॅं बादशहाने पण आपल्या या बहिणीचे बहादुरशहाने केलेल्या आक्रमणापासून संरक्षण केले.

रक्षाबंधनच्या सणाप्रमाणे दक्षिण भारतात कार्तिक महिन्यात कार्तिकेय सण असतो. या दिवशी बहीण आपल्या भावास जेवण देऊन त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते व भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. रक्षाबंधन हे आपल्या व इतरांच्या जीवनामध्ये पवित्रता व मांगल्य निर्माण करण्याचे बंधन आहे. जैन लोक हा दिवस रक्षापर्व म्हणून पाळतात. त्या दिवशी जैन मंदिरातून राख्या ठेवलेल्या असतात. जैन मुनी त्यांचे आदराने ग्रहण करतात. उत्तर भारतात नोकर मालकाच्या हाताला राखी बांधतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button