उलवे नोड येथे आगरी कोळी समाजाच्या एकतेची नारळीपौर्णिमा उत्साहात साजरी
उरण (दिनेश पवार) : उलवे नोड मधील स्थानिक आगरी कोळी भूमिपुत्रांनी नारळीपोर्णिमा उत्साहात साजरी केली. चार वर्षांपूर्वी समाजबांधवांवर परप्रांतीयांकडुन झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आणि त्याच परप्रांतीय गुंडांना राजकीय वरदहस्त प्राप्त असल्याने स्थानिक आगरी कोळी समाज प्रचंड चिडला होता. त्याच्या निषेधार्थ गावच्या सीमा ओलांडून सर्व समाज बांधवानी उलवे नोड मध्ये एकत्र यावे, सर्वांचे समन्वय असावे या हेतूने वितेश म्हात्रे (सदस्य – वहाळ ग्रामपंचायत) आणि अनिकेत ठाकुर (सरचिटणीस – मनसे उलवे) यांच्या संकल्पनेतुन आगरी कोळी एकतेची नारळीपोर्णिमा दरवर्षी साजरी होत आहे. यावर्षीही उलवे नोड मध्ये नारळी पौर्णिमा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणुन राहुल पाटील (शहराध्यक्ष – उलवे मनसे), मनोज कोळी (सचिव – मनसे उलवे), विनोद कोळी (अध्यक्ष – आगरी कोळी सामाजिक संस्था), सुनिल कोळी (उपशाखाध्यक्ष – गणेशपुरी मनसे), प्रणय कोळी (युवा नेते – भाजपा उलवे),अंकित नाईक (अध्यक्ष – जाणता राजा सामाजिक विकास मंडळ बामणडोंगरी), अक्षय पाटील (उपाध्यक्ष – जाणता राजा सामाजिक विकास मंडळ बामणडोंगरी), प्रतिक कोळी (गायक), समाज बांधव कल्पेश म्हात्रे, विनायक कोळी, भावेश घरत आदी समाज बांधव उपस्थित होते.