कोरोना काळातील नवी मुंबई महानगरपालिकेचे काम उल्लेखनीय – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गो-हे
कोरोनाच्या अडचणीच्या काळात नवी मुंबई महानगरपालिकेने केलेले काम उल्लेखनीय असून विशेषत्वाने कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना तसेच महिलांना आधार देण्यासाठी महानगरपालिकेने पुढाकार घेऊन स्वयंस्फुर्तीने राबविलेल्या योजना हे अत्यंत संवेदनशील वृत्तीने केलेल काम असून नवी मुंबईचे रोल मॉडेल इतर शहरांनीही अनुकरण करावे असे मत महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती ना.डॉ.नीलम गो-हे यांनी व्यक्त केले.
नवी मुंबई महानगरपालिकेने कोरोना महामारीच्या काळात केलेल्या नाविन्यपूर्ण कामांचा तसेच कोव्हीड काळात शासनामार्फत जाहीर करण्यात आलेल्या आर्थिक मदतीचा आढावा आज महापालिका मुख्यालयात विशेष बैठक घेत विधानपरिषदेच्या उपसभापती ना.डॉ.नीलम गो-हे यांनी घेतला.
याप्रसंगी महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे व श्रीम. सुजाता ढोले, कामगार उपआयुक्त श्री.संतोष भोसले, प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीम. हेमांगिनी पाटील, पोलीस उपआयुक्त श्री. अभिजीत शिवथरे, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी श्री. रामकृष्ण रेड्डी, एकात्मिक बालविकास अधिकारी श्री. अनंत खंडागळे आणि महापालिका व इतर विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
नवी मुंबई महानगरपालिकेने कोव्हीड काळात केलेल्या कार्यवाहीची आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी सादरीकरणाव्दारे (Presentation) विस्तृत माहिती दिली. संभाव्य तिस-या लाटेच्या तयारीच्या अनुषंगाने आयसीयू व व्हेंटिलेटर्स बेड्स तसेच आरोग्य सुविधांमध्ये करण्यात येत असलेली वाढ तसेच मुख्यत्वे मुलांसाठी करण्यात येणारे पिडियाट्रिक वॉर्ड याबद्दल उपसभापती महोदयांनी समाधान व्यक्त केले. कोव्हीड काळात नवी मुंबई महानगरपालिकेने केलेल्या उल्लेखनीय कामांचे अनुभव आयुक्तांनी लिहून त्याचे ग्लोबल लेव्हलला व्यापक प्रसारण करावे, जेणेकरून इतरांनाही त्यापासून प्रेरणा घेता येईल व कामाला दिशा मिळेल अशी सूचना उपसभापती महोदयांनी याप्रसंगी केली.
कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांकरिता तसेच महिलांकरिता इतक्या चांगल्या योजना राबविताना त्याचा विनीयोग योग्य प्रकारे होऊन लाभार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी आधार मिळावा याकरिता नियोजनबध्द कार्यप्रणाली तयार करावी असे निर्देश उपसभापती महोदयांनी दिले. त्याचप्रमाणे कोरोनामुक्त सोसायटी, कोरोनामुक्त वसाहती अशी मॉडेल्स विकसित करण्याबाबतही सूचित करण्यात आले.
यावेळी महिला व बालविकास विभाग, कामगार विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग यांच्यामार्फत कोरोना काळात एकल महिला, निराधार मुले, बांधकाम कामगार, घरेलु कामगार, रिक्षा चालक यांना करण्यात आलेल्या आर्थिक मदतीबाबत संबंधित विभागाच्या अधिका-यांनी माहिती दिली. या योजनांचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थी घटकांपर्यंत पोहचण्यासाठी अधिक व्यापक कार्यवाही करावी असे संबंधित विभागांना सूचित करीत यामध्ये संबंधित महानगरपालिकांची मदत घ्यावी असे उपसभापती डॉ.श्रीम.नीलम गो-हे यांनी निर्देश दिले. कामगार विभागाने महानगरपालिकांशी समन्वय ठेवून असंघटित कामगारांची सूची अद्ययावत करणेबाबत तत्पर कार्यवाही करण्याचेही निर्देशित करण्यात आले.
पोलीस विभागाने सादरीकरणाव्दारे दिलेल्या माहितीचे अवलोकन करून सध्या सायबर गुन्ह्यांमध्ये झालेली वाढ ही चिंताजनक असल्याचे नमूद करीत महिला दक्षता समितीच्या ऑनलाईन बैठका घ्याव्यात अशी सूचना उपसभापती महोदयांनी केली. हरवलेली मुले, बालकामगार याबाबतच्या कार्यवाहीचा अहवाल 15 दिवसात सादर करण्याचे त्यांनी निर्देशित केले.
कोरोना काळात नवी मुंबई महानगरपालिका करीत असलेल्या कामांतील अनेक बाबी इतर महानगरपालिकांनाही उपयुक्त ठरतील असे नमूद करीत महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती ना.डॉ.नीलम गो-हे यांनी समाधान व्यक्त केले.