नवी मुंबई

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात लसीकरणाला गती देण्यासाठी जसलोक हॉस्पिटल व सिटी बॅंकेचा सामाजिक बांधिलकी जपत सहभाग

कोव्हीडची संभाव्य तिसरी लाट लांबविण्यासाठी टारगेटेड टेस्टींगसारख्या प्रभावी उपाय करण्याप्रमाणेच या लाटेचा प्रभाव कमी करण्यासाठी लवकरात लवकर जास्तीत जास्त नागरिकांचे कोव्हीड लसीकरण पूर्ण करण्याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी लसीकरण केंद्रांच्या संख्येत 91 इतकी वाढ करण्यात आली असून 110 हून अधिक केंद्रांचे संपूर्ण नियोजन करण्यात आलेले आहे.

सध्या लसींच्या उपलब्धतेनुसार जास्तीत जास्त नागरिक लसीकरणाच्या कक्षेत यावेत यादृष्टीने लसीच्या उपलब्धतेनुसार लसीकरणाचे नियोजन करण्यात येत असून दुस-या डोस विहित कालावधीतच दिला जावा याकडेही बारकाईने लक्ष दिले जात आहे.

संभाव्य तिस-या लाटेचे उद्दिष्ट नजरसमोर ठेवून लसीकरणाला गती दिली जात असताना नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील गरजू घटकांकरिता सिटी बॅंकेच्या सीएसआर निधीमधून चाईल्ड फंड ऑर्गनायझेशन या स्वयंसेवी संस्थेच्या सहयोगाने लसीकरण करण्याचा प्रस्ताव जसलोक रूग्णालयामार्फत महानगरपालिकेस प्राप्त झाला. नवी मुंबई महानगरपालिकेच्या लसीकरण गतिमानतेच्या उद्दिष्टाला पोषक अशा या प्रस्तावास महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी मान्यता दिली.

या विशेष लसीकरण मोहीमेकरीता जसलोक रूग्णालयामार्फत कोव्हिशील्ड लसीचे 25 हजार डोस उपलब्ध झाले असून आज 16 ऑगस्ट रोजी नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र. 22/11 तुर्भे या ठिकाणी तुर्भे स्टोअर परिसारातील नागरिकांसाठी, महानगरपालिका नागरी आरोग्य केंद्र इंदिरानगर तुर्भे या ठिकाणी इंदिरानगर, हनुमाननगर, आंबेडकर नगर, गणेश नगर, गणेशपाडा, श्रमिकनगर परिसरातील नागरिकांसाठी तसेच नमुंमपा शाळा क्र. 36 कोपरखैरणे या ठिकाणी कोपरखैरणेगांव येथील नागरिकांसाठी विशेष लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले होते.

या विशेष लसीकरण सत्रात लसीकरणाचा लाभ घेण्याकरिता चाईल्ड फंड ऑर्गनायझेशन या स्वयंसेवी संस्थेमार्फत त्या परिसरातील 18 वर्षावरील नागरिकांना ओळखपत्रे देण्यात आली असून पुढील 7 ते 10 दिवस ही विशेष लसीकरण सत्रे आयोजित केली जाणार आहेत. या 25 हजार डोसेस नंतरही नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील लसीकरणाची व्याप्ती वाढविण्यासाठी जसलोक हॉस्पिटलच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत.

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 15 ऑगस्टपर्यंत 7 लक्ष 29 हजार 847 नागरिकांनी कोव्हीड लसीचा पहिला डोस घेतलेला असून 2 लक्ष 64 हजार 627 नागरिकांनी कोव्हीड लसीचा दुसरा डोस घेतलेला आहे. अशाप्रकारे 9 लक्ष 94 हजार 474 लसीचे डोस देण्यात आलेले आहेत.

लसीच्या उपलब्धतेनुसार लसीकरणाचे नियोजन केले जात असून आज 16 ऑगस्ट रोजी 30 ते 44 वर्ष वयोगटाकरिता लसीकरण उपलब्ध करून देण्यात आलेले होते. अशाप्रकारे जास्तीत जास्त नागरिकांचे जलद लसीकरण करण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न असून यामध्ये सिटी बॅंक, जसलोक हॉस्पिटल व चाईल्ड फंड ऑर्गनायझेशन या संस्थांनी मदतीची भूमिका घेतलेली आहे. तरी नागरिकांनी उपलब्धतेनुसार कोव्हीड लसीकरण करून घ्यावे व लसीकरण झाल्यानंतर कोव्हीड अनुरूप वर्तन ( Covid Approriate Behavior) कायम राखावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button