महानगरपालिकेच्या स्टेशन्सवरील मदत कक्षातून कागदपत्रे प्रमाणित करून 7698 नागरिकांनी केला लोकल ट्रेन प्रवास
कोव्हीड लसीचे दोन्ही डोस घेऊन 14 दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांकरिता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.श्री. उध्दव ठाकरे यांनी जाहीर केल्याप्रमाणे अमृतमहोत्सवी भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून 15 ऑगस्ट 2021 पासून लोकल ट्रेनने प्रवास करण्यास सुरूवात झालेली आहे.
यामधील महत्वाचा भाग असलेल्या लसीकरण कागदपत्रे तपासणी व ती साक्षांकीत करण्याची कार्यवाही करण्याकरिता महाराष्ट्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने जारी केलेल्या प्रमाण कार्यप्रणाली (SOP) प्रमाणे महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व 11 रेल्वे स्टेशन्सवर 11 ऑगस्टपासून विशेष मदत कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.
या विशेष मदत कक्षांनी 11 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वा. पासून स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीही सुट्टी न घेता सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत अथक काम केले आहे. 15 ऑगस्ट 2021 रोजी रात्री 11 वाजेपर्यंत बेलापूर ते ऐरोली अशा 11 रेल्वे स्टेशनवरील 28 विशेष मदत कक्षांमार्फत 7698 नागरिकांनी आपले आधारकार्ड व कोव्हीडचे दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र साक्षांकीत करून घेत लोकल प्रवासाचा मासिक पास प्राप्त करून घेतलेला आहे.
यामध्ये बेलापूर रेल्वे स्टेशवरील 4 कक्षात 815, सीवूड रेल्वे स्टेशवरील 2 कक्षात 587, नेरूळ रेल्वे स्टेशवरील 4 कक्षात 1417, जुईनगर रेल्वे स्टेशवरील 2 कक्षात 716, सानपाडा रेल्वे स्टेशवरील 2 कक्षात 909, वाशी रेल्वे स्टेशवरील 2 कक्षात 691, तुर्भे रेल्वे स्टेशवरील 2 कक्षात 234, कोपरखैरणे रेल्वे स्टेशवरील 4 कक्षात 531, घणसोली रेल्वे स्टेशवरील 3 कक्षात 519, रबाळे रेल्वे स्टेशवरील कक्षात 315, ऐरोली रेल्वे स्टेशवरील 2 कक्षात 964 याप्रमाणे 11 रेल्वे स्टेशनवरील 28 विशेष मदत कक्षात 7698 नागरिकांनी आपली कागदपत्रे पडताळणी करून घेत मासिक पास प्राप्त केलेला आहे.
15 ऑगस्टला मासिक प्रवासी पास मिळण्यासाठी एकाच वेळी गर्दी होऊ नये व कागदपत्रे पडताळणीमध्ये नागरिकांचा वेळ जाऊ नये याकरिता 11 ऑगस्टपासूनच सकाळी 7 ते रात्री 11 अशा दोन शिफ्टमध्ये शंभरहून अधिक कर्मचा-यांची नियुक्ती करीत महापालिकेच्या माध्यमातून 11 रेल्वे स्टेशनवर तेथील प्रवासी संख्येचा अंदाज घेऊन एकूण 28 विशेष मदत कक्ष स्थापन करण्यात आलेले होते.
या मदत कक्षावरील कर्मचा-यांमार्फत लसीकरण प्रमाणपत्रावरील क्यू आर कोड स्कॅन करुन लसीकरणाची सत्यता पडताळण्यात आली व त्यावर पडताळणी शिक्का मारून लसीकरणाचे प्रमाणपत्र प्रमाणित करण्यात आले. तसेच फोटो आयडी म्हणून आधारकार्डच्या झेरॉक्स प्रतीवरही प्रमाणित शिक्का मारण्यात आला. या प्रमाणित कागदपत्रांच्या प्रती घेऊन रेल्वे स्टेशनवरील तिकीट काऊंटरवर गेल्यानंतर तेथून रेल्वे प्रवासासाठी मासिक पास वितरण करण्यात आला.
अशाप्रकारे रेल्वे स्टेशनवरील विशेष मदत कक्षात जाऊन कागदपत्रे प्रमाणित करावयाच्या प्रणालीप्रमाणेच राज्य शासनामार्फत ऑनलाईन कार्यप्रणालीकरिता https://epassmsdma.mahait.org ही स्पेशल वेबलिंकही उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
कोव्हीडचे दोन डोस घेऊन 14 दिवस झालेल्या नागरिकांना आवश्यकतेनुसार रेल्वे पास सहजतेने उपलब्ध करून घेता यावा याकरिता नवी मुंबई महानगरपालिका सतर्क असून पुढील शासकीय आदेशापर्यंत हे कक्ष तसेच सुरू राहणार आहेत. तरी नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.