अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनी नवी मुंबई महानगरपालिकेचे ‘स्वच्छतेचे पुढचे पाऊल’
स्वच्छता ही निरंतर चालत राहणारी प्रक्रिया असून स्वच्छ सर्वेक्षण 2021 ला देशात पहिल्या नंबरचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून सामोरे गेलो असताना अद्याप त्या सर्वेक्षणाचा निकाल जाहीर झालेला नसला तरी पहिला नंबर मिळवणे व तो कायम राखणे हे आपले ध्येय राहणार असून आज अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘निश्चय केला नंबर पहिला’ हेच आपले उद्दिष्ट असल्याचे जाहीर करीत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी ‘स्वच्छ सर्वेक्षण 2022’ करिता आजपासून सर्व नागरिकांच्या सहयोगाने नवी मुंबई महानगरपालिका सज्ज झाली असल्याचे जाहीर केले.
75 व्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून महापालिका मुख्यालयात आयोजित ‘स्वच्छतेचे पुढचे पाऊल’ या कार्यक्रमाप्रसंगी आयुक्त आपले मनोगत व्यक्त करीत होते. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीम.सुजाता ढोले व श्री. संजय काकडे, प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. धनराज गरड, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, शहर अभियंता श्री. संजय देसाई आणि इतर अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. फेसबुक लाईव्ह व यू ट्युब लाईव्ह व्दारे अनेक नवी मुंबईकर नागरिक या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
केवळ इच्छ़ा म्हणून आपण देशातील सर्वात स्वच्छ शहर बनणे हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवलेले नाही तर आपल्या शहरामध्ये ती क्षमता आहे. यादृष्टीने महानगरपालिका प्रयत्नशील आहेच तथापि नागरिकांच्या संपूर्ण सहभागाशिवाय ते शक्य नाही हे स्पष्ट करीत नागरिकांनी घरातील दररोज निर्माण होणारा कचरा ओला, सुका व घरगुती घातक अशा प्रकारे वेगवेगळा करावा, त्यासाठी वेगवेगळे डबे ठेवावेत व महानगरपालिकेच्या स्वच्छतामित्रांकडे तो कचरा वेगवेगळा द्यावा. केवळ एवढेच केले तरी स्वच्छतेचे 90 टक्के उद्दिष्ट साध्य होईल असे सांगत नवी मुंबईकर नागरिक ते करतील असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला.
कचरा वर्गीकरण ही सर्वात महत्वाची बाब असून ज्या सोसायट्या वर्गीकरण केलेला कचरा देणार नाहीत त्यांचा कचरा उचलला जाणार नाही हे आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले. हे वारंवार सांगितले जाते असे असले तरी स्वच्छतेमध्ये अग्रभागी राहण्यासाठी हे अनिवार्य आहे हे नागरिकांनी लक्षात घेतले पाहिजे व वर्गीकरण केलेला कचराच दिला पाहिजे आणि कारवाई करण्याची वेळच येणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे असे आयुक्तांनी सांगितले.
नागरिकांनी वेगवेगळा दिलेला कचरा स्वच्छता मित्रांकडून वेगवेगळाच ठेवला जावा याबाबत अधिक सतर्कता बाळगली जाईल तसेच स्वच्छतेविषयी नागरिकांना तक्रारी दाखल करण्यासाठी व त्या निवारणासाठी कार्यरत असणारी तक्रार निवारण प्रणाली (grievance redressal system) अधिक प्रभावी करण्याबाबत त्वरित कार्यवाही करण्यात येत असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले.
स्वच्छता ही प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाची सवय व्हावी यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करताना स्वच्छ सर्वेक्षण 2021 मधील काही उल्लेखनीय उपक्रमांची व्याप्ती वाढविण्याचा मनोदय आयुक्तांनी व्यक्त केला. यामध्ये झोपडपट्टी भागातील कच-याची त्याच ठिकाणी विल्हेवाट लावणारे ‘झिरो वेस्ट स्लम मॉडेल’ सर्वच झोपडपट्टी भागात राबविण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी जाहीर केले. त्याचप्रमाणे झिरो वेस्टची ही संकल्पना गांव-गांवठाण व सेक्टर भागातही राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नवी मुंबईकर नागरिक अत्यंत जागरूक असून त्या जागरूकतेचा उपयोग स्वच्छता कार्यात व्हावा यादृष्टीने शहरातील काही रस्त्यांच्या स्वच्छतेवर लक्ष ठेवण्याकरिता ‘रस्ते दत्तक योजना’* राबविण्याची अभिनव संकल्पना आयुक्तांनी जाहीर केली. या माध्यमातून स्थानिक नागरिकांचा स्वच्छतेवर राहणारा वॉच तो परिसर आणि शहर स्वच्छतेसाठी मोलाचा ठरेल असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला.
ज्यावेळी आपल्याला एखाद्या गोष्टीचा अभिमान वाटतो तेव्हाच तो टिकविण्यासाठी आपण जागरूक राहतो असे सांगत यावर्षी शहरात विविध माध्मयांतून ठिकठिकाणी करण्यात आलेले सुशोभिकरण व त्यामुळे आमुलाग्र बदलून आकर्षक झालेले शहराचे स्वरूप यामुळे नागरिकांच्या मनात आपले शहर स्वच्छ व सुंदर राखण्याची निर्माण झालेली भावना महत्वाचे असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. यामुळे मिळणारी पारितोषिके, होणारा सन्मान हा शहराविषयीच्या अभिमानात भर घालणारा असतो व त्यामुळे नागरिक अधिक उत्साहाने व जबाबदारीने सक्रीय सहभागी होतात असेही निरीक्षण आयुक्तांनी व्यक्त केले.
सर्वसाधारणपणे 2 ऑक्टोबरपासून स्वच्छ सर्वेक्षणाला सुरूवात होत असली तरी स्वच्छता ही सातत्यपूर्ण बाब असल्याने आपण अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनासारखा उत्तम दिवस निवडून स्वच्छ सर्वेक्षण 2022 ची तयारी सुरू करीत असल्याचे सांगत आयुक्तांनी 15 ऑगस्ट ते 2 ऑक्टोबर, 2 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी ते एप्रिल अशा 3 टप्प्यात सर्वेक्षणाची उंचावत नेणारी कार्यवाही करणार असल्याचे आयुक्तांनी यावेळी जाहीर केले.
मागील वर्षी ‘स्वच्छ सर्वेक्षण 2021’ मध्ये स्वच्छतेचे महत्व आणि स्वच्छतेविषयीचे उत्तरदायित्व नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. स्वच्छतेप्रमाणेच शहराचे सुंदर रूपांतरण करीत नागरिकांच्या मनात शहराविषयी आत्मियता वृध्दींगत करण्यात आली. 40 हजार वृक्षलागवडीतून एमएमआर क्षेत्रातील सर्वात उत्तम अशा मियावाकी स्वरूपाच्या जंगलाची कोपरखैरणे येथील निसर्गोद्यानात निर्मिती करण्यात आली. इको सिटी म्हणून ओळख दृढ करण्यासाठी ई बसेसला प्राधान्य दिले.
शहरातही पर्यावरणशील वाहनांचा वापर वाढण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहीत करताना त्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने नागरिकांसाठी पहिल्या चार्जींग स्टेशनचे लवकरच लोकार्पण करण्यात येत आहे. तसेच 8 महिन्यात 20 चार्जींग स्टेशन सुरू करण्याचे तसेच आणखी 20 चार्जींग स्टेशन उभारण्याचे प्रस्तीवित असल्याचेही आयुक्तांनी सांगितले. केवळ नागरिकांना आवाहन करण्यापुरते मर्यादीत न राहता याची सुरूवात महानगरपालिकेपासूनच करण्याच्या दृष्टीने यापुढे महानगरपालिकेमार्फत घेण्यात येणारी वाहने इलेक्ट्रिकल घेण्यात येतील असेही आयुक्तांनी जाहीर केले.
नवी मुंबई महानगरपालिकेकडे बघण्याचा नागरिकांचा दृष्टीकोन बदलला पाहिजे व त्यांचा विश्वास वाढला पाहिजे अशाप्रकारे लोकाभिमुख काम करावे असे महापालिका अधिकारी, कर्मचारी यांना सूचित करतानाच महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी स्वच्छ सर्वेक्षण 2022 ला सुरूवात करताना त्यामध्ये नवी मुंबईकर नागरिक अधिक उत्साहाने सहभागी होतील असा विश्वास व्यक्त केला आहे.
या कार्यक्रमानिमित्त ‘स्वच्छ नवी मुंबई मिशन’चे ब्रँड ॲम्बेसेडर तथा सुप्रसिध्द गायक संगीतकार श्री. शंकर महादेवन यांनी चित्रफितीव्दारे ‘कच-यापासून मुक्ती’ हे ध्येय नजरेसमोर ठेवून आपण नवी मुंबईकर नागरिकांनी स्वच्छताकार्यात आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे असे आवाहन केले आणि स्वच्छतेच्या विविध उपक्रमांत नियमित सहभागी राहीन असे आश्वासित केले आहे.
याप्रसंगी मलनि:स्सारण विषयक काम करणा-या 8 सफाईमित्रांचा तसेच शौचालय व्यवस्थापनाचे काम करणा-या 8 स्वच्छतामित्रांचा आयुक्तांच्या हस्ते शाल व वृक्षरोपे प्रदान करून सन्मान करण्यात आला. सफाईमित्र विश्वास कांबळे यांनी प्रातिनिधीक स्वरूपात मनोगत व्यक्त करताना पूर्वी ड्रेनेज होलमध्ये उतरून काम करावे लागायचे, त्यामुळे आरोग्याच्या अडचणी यायच्या, मात्र आता महानगरपालिकेने चांगली वाहने घेतल्याने काम करायला बरे वाटते, प्रकृतीही चांगली राहते असे सांगत विशेष म्हणजे पूर्वी गटारवाले म्हटले जायचे आता सफाईमित्र म्हणतात यामुळे खूप समाधान वाटते अशा शब्दात आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी भारूड लोककला प्रकाराचा आधार घेऊन सादर केलेल्या आरंभ क्रिएशन्सच्या जनजागृतीपर पथनाट्याला आयुक्तांसह सर्वांनीच पसंतीची दाद दिली. अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिकेने टाकलेले स्वच्छतेचे हे पुढचे पाऊल नवी मुंबईला नवी दिशा देणारे असणार आहे.