लोकल ट्रेन प्रवासासाठी पहिल्या दिवशी 7 ते 3 वेळेत 1125 नागरिकांची आवश्यक कागदपत्रे प्रमाणित
कोव्हीड लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना 15 ऑगस्टपासून लोकल ट्रेनने प्रवास करता यावा याकरिता आज 11 ऑगस्टपासून मासिक पाससाठी कागदपत्रे पडताळणी करून ती साक्षांकीत करण्यासाठी महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार महानगरपालिका क्षेत्रातील सर्व रेल्वे स्टेशन्सवर विशेष मदत कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. 11 रेल्वे स्टेशन्सवरील 28 मदत कक्षांतून आज सकाळी 7 ते दुपारी 3 या पहिल्या शिफ्टमध्ये 1125 नागरिकांनी आपले आधारकार्ड व कोव्हीडचे दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र साक्षांकीत करून घेतले आहे.
यामध्ये बेलापूर रेल्वे स्टेशवरील 4 कक्षात 133, सीवूड रेल्वे स्टेशवरील 2 कक्षात 93, नेरूळ रेल्वे स्टेशवरील 4 कक्षात 228, जुईनगर रेल्वे स्टेशवरील 2 कक्षात 98, सानपाडा रेल्वे स्टेशवरील 2 कक्षात 143, वाशी रेल्वे स्टेशवरील 2 कक्षात 113, तुर्भे रेल्वे स्टेशवरील 2 कक्षात 18, कोपरखैरणे रेल्वे स्टेशवरील 4 कक्षात 79, घणसोली रेल्वे स्टेशवरील 3 कक्षात 78, रबाळे रेल्वे स्टेशवरील कक्षात 16, ऐरोली रेल्वे स्टेशवरील 2 कक्षात 126 याप्रमाणे 11 रेल्वे स्टेशनवरील 28 विशेष मदत कक्षात 1125 नागरिकांनी आपली कागदपत्रे पडताळणी करून घेतलेली आहेत. आवश्यकता लक्षात घेऊन 37 विशेष मदत कक्ष स्थापन करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.
कोव्हीडचे दोन्ही डोस घेऊन 14 दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांना 15 ऑगस्टपासून मुंबई महानगर प्रदेशातील लोकल ट्रेनमधून प्रवास करता येईल असे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.श्री.उध्दव ठाकरे यांनी जाहीर केले असून त्याविषयीची प्रमाण कार्यप्रणाली (SOP) महाराष्ट्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने जारी केली आहे.
15 ऑगस्टला मासिक प्रवासी पास मिळण्यासाठी एकाच वेळी गर्दी होऊ नये व कागदपत्रे पडताळणीमध्ये नागरिकांचा वेळ जाऊ नये याकरिता आज 11 ऑगस्टपासून संबंधित स्थानिक प्राधिकरणांच्या माध्यमातून रेल्वे स्टेशनवर मदत कक्ष स्थापन करण्यात आलेले आहेत. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 11 रेल्वे स्टेशन्सावर तेथील तिकीट खिडक्यांच्या संख्येनुसार तसेच तेथील प्रवासी संख्येचा अंदाज घेऊन आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या निर्देशाप्रमाणे विशेष मदत कक्ष स्थापन करून त्याठिकाणी सकाळी 7 ते रात्री 11 अशा दोन शिफ्टमध्ये शंभरहून अधिक कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
लोकल ट्रेन प्रवासासाठी मासिक सिझन पास घेण्याची इच्छा असलेल्या व पूर्णपणे लसीकरण झालेल्या म्हणजेच कोव्हीड लसीचे दोन डोस घेऊन 14 दिवस झालेल्या नागरिकांनी आपल्या दोन कोव्हीड डोस घेतलेल्या प्रमाणपत्राची प्रत व आधार कार्डची प्रत घेऊन रेल्वे स्टेशनवरील महानगरपालिकेच्या विशेष मदत कक्षाशी संपर्क साधावयाचा आहे. मदत कक्षावरील कर्मचारी लसीकरण प्रमाणपत्रावरील क्यू आर कोड स्कॅन करुन लसीकरणाची सत्यता पडताळतील व त्यावर पडताळणी शिक्का मारून लसीकरणाचे प्रमाणपत्र प्रमाणित करतील. तसेच फोटो आयडी म्हणून आधारकार्डच्या झेरॉक्स प्रतीवरही प्रमाणित शिक्का मारतील.
नागरिकांनी आपले आधारकार्ड आणि दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र अशा कागदपत्रांच्या साक्षांकीत प्रती रेल्वे स्टेशनवरील तिकीट काऊंटरवर दाखविल्यानंतर त्यांना 15 ऑगस्टपासून रेल्वे प्रवासासाठी मासिक पास वितरण करण्यात येणार आहे. दैनंदिन प्रवासासाठी तिकीट मिळणार नाही असे प्रमाण कार्यप्रणालीत (SOP) स्पष्ट करण्यात आले आहे.मासिक पास देताना तिकीट खिडकीवरील रेल्वे कर्मचारी लसीकरण प्रमाणपत्राचा क्रमांक पासवर नमूद करेल. प्रवाशाने प्रवास करताना मासिक पास, ओळखपत्र व लसीकरण प्रमाणपत्र सोबत बाळगणे आवश्यक आहे. ज्या प्रवाशांकडे युनिव्हर्सल पास असेल त्यांनी प्रवास करताना मासिक पास व युनिव्हर्सल पास सोबत बाळगणे आवश्यक असेल. रेल्वे स्थानकांवरील गर्दी टाळण्याकरीता नवी मुंबई पोलीस आयुक्त श्री. बिपीनकुमार सिंग यांच्या निर्देशाप्रमाणे सर्व रेल्वे स्टेशन्सवर आवश्यक पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आलेला आहे.
तरी रेल्वे प्रवास करणे आवश्यक आहे अशा कोव्हीडचे दोन्ही डोस घेऊन 14 दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांनी आपल्या लसीकरण प्रमाणपत्राची प्रत तसेच मूळ आधारकार्ड व प्रमाणित करण्यासाठी आधारकार्डची झेरॉक्स प्रत घेऊन रेल्वे स्टेशनवर सकाळी 7 ते दुपारी 3 आणि दुपारी 3 ते रात्री 11 या वेळेत सुरू केलेल्या विशेष मदत कक्षात जाऊन आपली कागदपत्रे प्रमाणित करून घ्यावीत असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.