गणपती चित्रशाळांत मूर्तिकारांची लगबग, पेणचे सुप्रसिद्ध गणपती उरण शहरात दाखल
उरण (दिनेश पवार) : अवघ्या महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या श्री. गणेशाचा व गणेशोत्सव काही दिवसावर येऊन ठेपला असल्याने गणपती कारखान्यात मूर्तीकारांची लगबग सुरू झाली आहे. उरण तालुक्यात चिरनेर, उरण, बोकडवीरा, डाऊर नगर, केगाव आंबीलवाडी, चाणजे, करंजा आदी ठिकाणी असलेल्या कारखान्यात कारागीर मग्न झाले आहेत.
उरण शहरात, किशोर जगे यांचे सिद्धी विनायक कला केंद्र, बाजार पेठ येथील मंगल मूर्ती कला केंद्र, श्री गणेश कला केंद्र, लंबोदर कला केंद्र अशा विविध नावाने गणपती मूर्ती विकण्यासाठी दुकाने थाटण्यात आली आहेत. अलिबाग तालुक्यातील पेण, हमरापूर आदी ठिकाणांहून गणपतीच्या सुबक, सुंदर मूर्ती आल्या आहेत. नागरिक आपल्या पसंती प्रमाणे गणेश मूर्ती बुकिंग करतांना दिसत आहेत.
बुद्धीची देवता असलेल्या श्री. गणेशाचा गणेशोत्सव कोकणात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पाच दिवस आरती, महाप्रसाद, भजन, गाणे, नाच यामुळे एक प्रकारे भक्तिमय वातावरण असते. गणेशोत्सवासाठी नागरिक लवकरच तयारीला लागत असून, जवळपास एक व महिना आधीपासूनच कारखान्यात आपल्याला हव्या असलेल्या गणेश मूर्तीची ऑर्डर देतात. अशी माहिती उरण शहरातील स्वर्गीय किशोर जगे यांचे सिद्धी विनायक कला केंद्र राजपाल नाका, केंद्राचे कविता किशोर जगे यांनी दिली.