दक्षता पथकांचा कारवाईचा धडाका – कोव्हीड सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणारे 3 रेस्टॉरंट, बार, पब सील्ड आणि 4 बार व्यवस्थापनांकडून प्रत्येकी 50 हजार दंड वसूल
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मिशन ब्रेक द चेन’ व्दारे टेस्ट, आयसोलेशन आणि ट्रिट या त्रिसूत्रीवर भर देण्याप्रमाणेच नागरिकांनी कोव्हीड सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करून स्वत:चा व इतरांचा कोव्हीडपासून बचाव करावा याकरिता व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे.
त्याचप्रमाणे कोव्हीड नियमांबाबत निष्काळजीपणा दाखवित नियमांचे उल्लंघन करून सामाजिक आरोग्याला धोका पोहचविणा-या बेजबाबदार नागरिकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला जात आहे. याकरिता आधीपासूनच विभाग कार्यालय पातळीवर पोलीसांसह दक्षता पथके तैनात आहेत.
आता त्या दक्षता पथकांप्रमाणेच मुख्यालय स्तरावरून 155 जणांचा समावेश असलेली 31 विशेष दक्षता पथके परिवहन व्यवस्थापक श्री. शिरीष आरदवाड यांच्या मुख्य नियंत्रणाखाली तैनात करण्यात आली असून प्रत्येक विभाग कार्यालय क्षेत्राकरिता सकाळी व रात्री अशी 2 पथके त्याचप्रमाणे कोरोना प्रसारचा संभाव्य धोका असणा-या एपीएमसी मार्केटकरिता सकाळ, दुपार, रात्र अशा तिन्ही शिफ्टमध्ये प्रत्येकी 5 अशी 15 पथके सज्ज झालेली आहेत.
ही विशेष दक्षता पथके कोव्हीड सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणा-या नागरिक/दुकानदार यांच्यावरील कारवाई प्रमाणेच लग्न व इतर समारंभांतील संख्या मर्यादा तसेच रेस्टॉरंट, बार याठिकाणी वेळेचे व कोव्हीड सुरक्षा नियमांचे पालन होते की नाही यावरही बारीक लक्ष ठेवत आहेत. याकरिता पोलीसांसह विशेष 5 दक्षता पथके रात्रीच्या वेळी कार्यन्वित करण्यात आलेली आहेत.
अशा प्रकारची कारवाई करताना नेरूळ विभागामध्ये रात्री 11 नंतरही बार सुरू ठेवणा-या शिरवणेगाव येथील राजमहल रेस्टॉरंट अँड बार तसेच दासिल रेस्टॉरंट अँड बार आणि अभिराज लैला रेस्टॉरंट अँड बार या 3 रेस्टॉरंट अँड बारवर वेळेच्या नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी विभाग अधिकारी तथा सहा. आयुक्त श्री. दत्तात्रेय नागरे यांच्या नियंत्रणाखाली धडक कारवाई करीत 3 बार व्यवस्थापनांकडून प्रत्येकी 50 हजार याप्रमाणे एकूण रू. 1 लक्ष 50 हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल केली.
त्याचप्रमाणे तुर्भे विभागातही एपीएमसी मार्केट येथील अमृत रेस्टॉरंट अँड बार व्यवस्थापनाकडून वेळेचे उल्लंघन केल्याप्रकरणी रू. 50 हजार दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली. तसेच सेक्टर 19, तुर्भे येथील रंग दे बसंती त्याचप्रमाणे सत्रा प्लाझा, सेक्टर 19 डी तुर्भे येथील अरेबियन नाईट्स कॅफे या दोन पबवर अचानक धाड घालत सोशल डिस्टन्सींगचे उल्लंघन केल्याप्रकरणी पब सील करण्याची कारवाई करण्यात आली. तुर्भे विभागाचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी श्री. सुबोध ठाणेकर यांच्यासह दक्षता पथकाने पोलीसांच्या सहकार्याने ही कारवाई केली.
बेलापूर विभागातही विभाग अधिकारी तथा सहा. आयुक्त श्री. शशिकांत तांडेल यांच्यासह दक्षता पथकाने पोलीसांच्या सहकार्याने करावेगाव येथील कोकण किनारा बारने कोव्हीड सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बार सिलींगची कारवाई केली.
कोरानाचा प्रादुर्भाव वाढत असताना सर्व आस्थापना, व्यापारी, व्यावसायिक यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कोव्हीड सुरक्षा नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन सारखी कटू परिस्थिती ओढवू द्यायची नसेल तर आत्तापासूनच आवश्यक खबरदारी घेणे गरजेचे आहे. तरी नवी मुंबई शहरातील नागरिकांचा कोव्हीडपासून बचाव करण्यासाठी प्रत्येकाने सजग राहून कोव्हीड सुरक्षा नियमांचे पालन करावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.