नवी मुंबई महानगरपालिकेच्या अद्ययावत आरटी-पीसीआर लॅबची वर्षभर अविरत सेवा
एक वर्षात 4.5 लाखाहून अधिक टेस्ट करीत बजावली कोव्हीड विरोधातील लढयात महत्वाची भूमिका
कोव्हीड-19 विरोधातील लढाईमध्ये ‘मिशन ब्रेक द चेन’ ची प्रभावी अंमलबजावणी करीत कोरोनाचा प्रसार रोखण्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या नेरूळ येथील माँसाहेब मिनाताई ठाकरे रूग्णालयातील अद्ययावत आरटी-पीसीआर लॅबचा महत्वाचा वाटा आहे.
दि. 4 ऑगस्ट 2020 रोजी केवळ 11 दिवसांच्या विक्रमी कालावधीत कार्यान्वित करण्यात आलेल्या या आरटी-पीसीआर लॅबची आज यशस्वी वर्षपूर्ती होत असताना या लॅबमध्ये मागील वर्षभरात 4 लक्ष 56 हजाराहून अधिक आरटी-पीसीआर टेस्ट करण्यात आलेल्या आहेत. महत्वाचे म्हणजे या वर्षभरात दसरा, दिवाळी अथवा इतर सण किवा शनिवार, रविवार वा सार्वजनिक सुट्टी अशी एकही दिवस न थांबता या लॅबने कोव्हीड टेस्टींगचे 365 दिवस अथक आणि अविश्रांत काम केलेले आहे.
14 जुलै 2020 रोजी श्री. अभिजीत बांगर यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर ‘मिशन ब्रेक द चेन’ हाती घेत कोव्हीड रुग्णाचा लवकरात लवकर शोध घेण्याकरिता चाचण्यांच्या संख्या वाढीवर भर देण्याचे लक्ष्य नजरेसमोर ठेवले. त्यादृष्टीने अवघ्या दोनच दिवसात 16 जुलैपासून अर्ध्या तासात पाहणी अहवाल प्राप्त होणा-या रॅपीड अँटिजेन टेस्टींगला मोठ्या प्रमाणात सुरूवात करण्यात आली, त्यासाठी केंद्रांची संख्या वाढ करण्यात आली तसेच मोबाईल टेस्टींगवर भर देण्यात आला.
रॅपीड अँटीजेन टेस्ट सुरू करण्यासोबतच नवी मुंबई महानगरपालिकेची स्वत:ची आरटी-पीसीआर टेस्टींग लॅब सुरु करण्याकडेही विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले.
सेक्टर 15, नेरुळ येथील महानगरपालिकेच्या माँसाहेब मिनाताई ठाकरे रुग्णालयात आरटी-पीसीआर लॅबसाठी दुसऱ्या मजल्यावर 1800 चौफूट प्रशस्त जागेची निवड करणे, तेथे लॅबसाठी पूरक स्थापत्य – विदयुत व इतर पायाभूत सुविधा उभ्या करणे, लॅबकरिता आवश्यक यंत्रसामुग्री व उपकरणे बसविणे, ती कार्यान्वित करण्यासाठी प्रशिक्षित डॉक्टर्स व कर्मचारी नियुक्त करणे तसेच लॅब सुरु करण्याठी गरजेच्या असलेल्या शासकीय परवानग्या मिळविणे अशा सर्वच गोष्टींच्या पूर्ततेसाठी आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली एकाच वेळी युध्दपातळीवर काम सुरु करण्यात आले.
आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांचा विहित वेळेत कार्यपूर्ततेचा ध्यास आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा तसेच त्यांना लाभलेली अधिकारी – कर्मचारी यांची साथ, यामुळे केवळ 11 दिवसांच्या कालावधीत नवी मुंबई महानगरपालिकेची स्वत:ची 24 तासात 1000 आरटी-पीसीआर चाचण्यांची क्षमता असणारी आय.सी.एम.आर. प्रमाणित संपूर्ण ॲटोमॅटिक अशी “कोव्हीड-19 विषाणू चाचणी व निदान (आरटीपीसीआर) प्रयोगशाळा” 4 ऑगस्ट 2020 पासून कार्यान्वित झाली.
त्यापूर्वी कोव्हीड 19 चाचण्यांसाठी नवी मुंबई महानगरपालिकेला शासकीय अथवी खाजगी लॅबवर अवलंबून रहावे लागत होते. त्या लॅबवर इतरही शहरांतील चाचण्यांचा भार असल्याने तपासणी अहवाल प्राप्त होण्यास 3 ते 4 दिवस लागत होते. त्यामुळे कोव्हीड 19 प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यास अडथळा येत होता.
मात्र महानगरपालिकेची स्वत:चीच सुसज्ज आरटी-पीसीआर लॅब कार्यान्वित झाल्याने कोव्हीड 19 चा रिपोर्ट मिळण्याचा कालावधी 24 तासांवर आला. ज्याचा कोव्हीडच्या पहिल्या आणि दुस-या लाटेत जलद निदान होऊन त्वरित उपचार करण्यासाठी तसेच उशीरा निदानामुळे कोव्हीडचा होणारा प्रसार रोखण्यासाठी अतिशय उपयोग झाला. शेजारील ठाणे, पनवेल महानगरपालिकेच्या कोव्हीड टेस्ट्सचे रिपोर्ट उपलब्ध करून देण्यातही या लॅबने पहिल्या लाटेत सहकार्याची भूमिका बजावली.
पहिल्या लाटेचा अनुभव लक्षात घेता जानेवारी 2021 पासून या लॅबची क्षमता वाढवून दुप्पट करण्यात आली. दुस-या लाटेचा प्रभाव उच्चतम पातळीवर असताना या लॅबने दिवसरात्र अथक कार्यान्वित राहून 24 तासात अहवाल देण्याचे आपले व्रत बजावत कोव्हीड लढ्यात महत्वाची भूमिका निभावली.
कोव्हीड टेस्ट केल्यानंतर नागरिकांच्या मनात रिपोर्ट येईपर्यंत असणारे दडपण लवकर दूर व्हावे तसेच त्यांना कोव्हीड टेस्टचा रिपोर्ट सहजपणे उपलब्ध व्हावा याकरिता https://www.nmmccovidcare.com या महानगरपालिकेच्या कोव्हीड पोर्टलवर विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे आता नागरिक एका क्लिकवर आपला कोव्हीड रिपोर्ट पाहू शकतात तसेच त्याची प्रिंटही काढून घेऊ शकतात.
याशिवाय कोव्हीड टेस्ट करताना नागरिकांनी नोंदणी केलेल्या मोबाईलवर एसएमएस संदेशव्दारेही रिपोर्टची लिंक पाठविली जात असून त्या लिंकवर क्लिक केल्यानंतरही कोव्हीडचा रिपोर्ट सहजपणे उपलब्ध होत आहे. विशेषत्वाने प्रवास अथवा इतर कारणांसाठी आरटी-पीसीआर टेस्ट रिपोर्ट जलद आवश्यक असणा-या नागरिकांसाठी ही 24 तासात रिपोर्ट उपलब्ध करून देणारी लॅबची कार्यप्रणाली अत्यंत उपयोगी ठरलेली आहे.
कोव्हीडच्या संभाव्य तिस-या लाटेला सामोरे जात असताना या लॅबची क्षमता आणखी वाढवून प्रतिदिन 5000 टेस्ट्स इतकी करण्याचे नियोजन करण्यात आले असून त्यादृष्टीने लॅब विस्ताराच्या कार्यवाहीस सुरूवात करण्यात आलेली आहे.
मागील वर्षभरात एकही सुट्टी न घेता येथील अधिकारी, कर्मचा-यांनी केलेले अथक काम प्रशंसेस पात्र आहे. सध्याच्या काळात या लॅबचा उपयोग प्रामुख्याने कोव्हीड-19 च्या तपासणीसाठी होत असून कोव्हीडचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर एच आय व्ही, हिपॅटायटीस, स्वाईन फ्ल्यू, लेप्टोस्पायरॅसीस व इतर मॉलिक्युलर टेस्ट्स यासाठीही या लॅबचा उपयोग होणार आहे. लवकरच या लॅबची क्षमता वाढविण्यात येत आहे. त्यामुळे ही अद्ययावत उपकरणांनी अत्यंत सुसज्ज अशी लॅब नवी मुंबई महानगरपालिकेसाठी कायमस्वरुपी उपयोगी अशी उपलब्धी असून याव्दारे आरोग्य सेवेचे सक्षमीकरण झाले आहे.