वन्य जीवांच्या सुलभतेसाठी विशिष्ट पद्धतीचे बांधकाम असणारा भारतातील प्रथम द्रुतगती महामार्ग म्हणजे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग
मुंबई – महाराष्ट्र राज्यात सुरु असलेल्या सर्वात मोठ्या व महत्वपूर्ण प्रकल्पांपैकी एक म्हणजे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा प्रकल्प. या प्रकल्पाची विशेष बाब म्हणजे वन्य जीवांच्या सुलभतेसाठी याचे विशिष्ट पद्धतीने बांधकाम करण्यात येत आहे. एखाद्या द्रुतगती महामार्गाची उभारणी करताना वन्यजीवांच्या हालचालींवर गदा येणार नाही याची काळजी घेऊन त्यासाठी विशिष्ट पद्धतीच्या संरचनांची बांधणी करण्याचे काम भारतात प्रथमच करण्यात येत आहे. या कामासाठी वाईल्ड लाईफ इंस्टिट्यूट ऑफ इंडिया (डब्ल्यू डब्ल्यूआय) या संस्थेची मदत घेतली जात असल्याचे नगरविकास विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.
महामार्गाच्या कॉरिडॉरमध्ये मनुष्य व वन्य प्राण्यांचे होणारे अपघात टाळण्यासाठी व त्यांचा प्रवेश प्रतिबंधित करण्यासाठी महामार्गालगत करण्यात येणाऱ्या वृक्ष लागवडीमध्ये त्यांना आकर्षित करणाऱ्या आंबा, काजू, जांभूळ, संत्रा, मोसंबी व खजूर अशा १३ प्रकारच्या फळझाडांच्या लागवडीस विशेष करून वगळण्यात आले आहे.
प्रकल्पामध्ये वन्यजिव संरक्षणासाठी एकूण ९६ बाुंधकामे प्रस्तावित केली असून, त्यांची रचना वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आली आहे. यामध्ये वन्यप्राण्यांना रस्ता ओलांडण्यासाठी ७ ओव्हरपास ब्रिज तसेच अंडरपास, बॉक्स कलवर्ट व लहान-मोठ्या अश्या ८९ पूलांचा समावेश आहे. या मधून जाताना प्राण्यांना आपण जंगलातच आहोत अशी अनुभूती मिळावी म्हणून त्यानुसार या संरचनांची बांधणी करण्यात येणार आहे. वन्यवजीवांच्या वावरासाठी महत्वपूर्ण असलेल्या ठिकाणी ध्वनी नियंत्रणाची तरतूद करण्यात आली आहे. तसेच, आवश्यक त्या ठिकाणी संरक्षण भिंतीची उंची वाढवण्यात आली आहे. वन्यजिव संरक्षणाच्या कामांसाठी एकूण अंदाजे ३२६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
महाराष्ट्र समृद्धी महामार्गाने प्रवास होणार प्रदूषणमुक्त
हरित महामार्ग धोरण (वृक्ष लागवड, सुशोभिकरण आणि देखभाल) २०१५ नुसार महाराष्ट्र समृद्धी महामार्ग प्रकल्पामध्ये वृक्षारोपण करण्यात येणार आहे. या द्रुतगती महामार्गाभोवती ११ लक्ष ३१ हजार झाडे लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूंस वृक्षारोपण करण्यात येणार असून दोन्ही मार्गांच्या मध्यावर असलेल्या दुभाजकावरही सुशोभित रोपे लावण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रदूषण रहित प्रवास करणे शक्य होणार आहे. या महामार्गाभोवती मोठ्या प्रमाणात करण्यात येणाऱ्या वृक्ष लागवडीमुळे ग्लोबल वार्मिंग आणि हवामान बदल रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांमध्येही मोठा हातभार लागणार आहे.
वृक्षारोपण झाल्यानंतर या झाडांची व रोपांची ५ वर्षांकरीता नियमित काळजी व निगा राखण्यासाठी देखील नियोजन करण्यात आले आहे. या झाडांना सिंचनाच्या पद्धतीचा अवलंब करून पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. पावसाळ्यातील पाण्याची साठवण करून सर्व झाडांना ठिबक सिंचन पद्धतीने पाणी दिले जाणार आहे . पाऊस कमी असलेल्या ठिकाणी सौर पंपाद्वारे अंतर्गत पाण्याच्या स्त्रोतांमधून पाणी पुरवठा होणार आहे. भूशास्त्राचा अभ्यास करून वनस्पती मॉनिटरिंग सिस्टमद्वारे तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर झाडाची निगा राखली जावी यासाठी वृक्ष दत्तक घेणे, तसेच त्याबद्दल अहवाल देणे यासारख्या गोष्टींकडे प्रामुख्याने लक्ष दिले जाणार आहे.
महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे काम अत्यंत वेगाने सुरु आहे. तसेच नागपूर शिर्डी दरम्यानचा ५२० किमीच्या पहिल्या टप्प्याचे काम लवकरच पूर्ण होणार आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यात हा टप्पा सुरू करण्याचा प्रयत्न असेल अशी माहिती नगरविकास तसेच सार्वजनिक बांधकाम (सा. उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
नागपूर इंटरचेंज हाच या महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा झिरो पाईंट आहे. या महामार्गाचे काम जलद सुरू असले तरी पर्यावरणाचा कमीत कमी ह्रास होईल याकडे अधिक लक्ष देण्यात आले आहे. वाहनांची वर्दळ सुरू झाल्यानंतर प्रदूषण कमी करण्यासाठी वृक्षारोपण केले जाणार आहे. सांस्कृतिक, राखीव वन / वन्यजीव अभयारण्ये, संबंधित प्रदेशांचे पर्यटन वाढविण्यासाठी देखील सुशोभीकरण करण्यात येणार आहे. या प्रकल्पात ग्रीन अँड सिनिक कॉरिडोर” या स्वरूपात इकोसिस्टम तयार करण्यात येणार आहे.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग नागपुर ते मुंबई दरम्यान १० जिल्हे, २६ तालुके, ३९२ गावातून जाणार आहे. नागपुर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, ठाणे या १० जिल्ह्यांमधून जाणार आहे. तर इंटरचेंजसच्या माध्यमातून आणखी १४ जिल्हे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाला अप्रत्यक्षपणे जोडले जाणार आहेत. राज्यातील एकूण ३६ पैकी २४ जिल्ह्यांना महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा लाभ होणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात विकासाला चालना मिळणार आहे.आणि महाराष्ट्र समृद्धी महामार्गामुळे महाराष्ट्राला नवी समृद्धी प्राप्त होणार आहे.
कसा आहे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग?
नागपूर ते मुंबई ७०१ किमी पर्यंतचा महामार्ग
एकूण १२० मीटर रुंदीचा हा रस्ता ६ पदरी असणार
एकूण १० जिल्हे, २६ तालुके आणि ३९२ गावातून महामार्ग जाणार
नागपूर मुंबई हे अंतर फक्त ८ तासात कापणे शक्य
वाहने ताशी दीडशे किमी वेगाने धावू शकणार
शंभर फुटांवर डिव्हायडर