महाराष्ट्र

महाडच्या महास्वच्छता अभियानास सुरुवात, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे स्वतः रस्त्यावर

-विविध महापालिकांच्या सहकार्याने शहराच्या स्वच्छतेला सुरुवात
-शहराच्या स्वच्छतेसाठी दीड कोटींचा वाढीव निधी जाहीर
-ठाणे, नवी मुंबई, पनवेल महापालिकेची पथके तैनात
-४५० कर्मचारी, २० जेसीबी, २० डंपर, घंटागाड्या महाडच्या मदतीला

महाड – गेल्या आठवड्यात मुसळधार पावसामुळे पुराचा तडाखा बसलेल्या महाड शहराच्या स्वच्छतेसाठी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे स्वतः रस्त्यावर उतरले असून ठाण्यासह विविध महापालिकांचे कर्मचारी व आवश्यक साधनसामग्रीच्या मदतीने महाडच्या स्वच्छतेला शनिवारी मोठ्या प्रमाणावर सुरुवात करण्यात आली. नगरविकासमंत्री या नात्याने श्री. शिंदे यांनी विविध महापालिकांच्या माध्यमातून आवश्यक मनुष्यबळ व यंत्रसामग्रीची जमवाजमव करून शनिवारी सकाळी महाड गाठले, स्थानिक प्रशासनाच्या मदतीने शहराची चार भागांत विभागणी केली आणि घरोघरी कर्मचारी पाठवून साफसफाईच्या कामाला सुरुवात केली. या सर्व कामावर भर पावसात फिरून श्री. शिंदे स्वतः लक्ष ठेवून आहेत. त्याचबरोबर, शहराला स्वच्छतेसाठी वाढीव दीड कोटी रुपये देण्याची घोषणाही त्यांनी केली. त्यांनी यापूर्वीच ५० लाखांची मदत जाहीर केली होती, मात्र झालेले नुकसान पाहाता ती पुरेशी नसल्याचं निदर्शनास आल्याने वाढीव दीड कोटी रुपये देण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला.

कोकणात झालेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका महाड, चिपळूण, खेड या शहरांना बसला. महाड शहरात आणि बाजारपेठेत १३ फुटांपर्यंत पाणी शिरले होते. पूर ओसरल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची बाब होती ती शहर स्वच्छ करण्याची, महाड नगरपालिकेची क्षमता मर्यादित असल्याने या कामासाठी स्वतः नगरविकास मंत्र्यांनी पुढाकार घेतला आहे. ठाणे महापालिकेचे १५० सफाई कर्मचारी, नवी मुंबई महानगरपालिकेचे १२० सफाई कर्मचारी, पनवेल महानगरपालिकेचे १०० सफाई कर्मचारी, टीडीआरएफ पथकाचे ३० जवान असे मनुष्यबळ या स्वच्छता कामासाठी तैनात करण्यात आले आहे. याशिवाय ठाणे महापालिकेने पाठवलेले ड्रनेज लाइन स्वच्छ करणारे टँकर्स, २० जेसीबी, २० डंपर, पाच घंटागाड्या, ठाणे महापालिकेची काही जेटिंग मशिन्स, ठाणे मनपाचे तीन फायर टँकर्स, महाड नगरपालिकेचे तीन फायर टॅंकर्स, तसेच ठाणे व खोपोली वरून घरे स्वच्छ करण्यासाठी आणण्यात आलेले स्प्रेइंग मशीन्ल, रोगराई पसरू नये यासाठी धूरफवारणी करणारी फॉगिंग मशिन्स अशा समुग्रीचा समावेश आहे.

शनिवारी सकाळी नऊ वाजता श्री. शिंदे यांनी जिल्हा मदत केंद्रात परिस्थितीचा आढावा घेऊन प्रत्येकाला जबाबदारी नेमून दिली. महाड शहरात पूर ओसरल्यानंतर 15 लेप्टोस्पायरोसिसचे रुग्ण आढळले आहेत. ही साथ वाढू नये, तसेच इतर रोगही शहरात पसरू नयेत यासाठी आपण स्वतःच या स्वच्छता कामासाठी पुढाकार घेतला असून सर्व यंत्रणा कार्यान्वित केली असल्याचे श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले. पुढील दोन दिवसांत संपूर्ण शहर स्वच्छ करण्याचा निर्धार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी महाडचे आमदार भरत गोगावले, ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त अशोक बुरपल्ले, अतिरिक्त जिल्हाधिकारी अमोल यादव, महाड शहराचे मुख्याधिकारी जीवन पाटील आणि इतर अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button