नवी मुंबई

ऐरोली व नेरूळ रूग्णालयांचे आयसीयू बेड्समध्ये रूपांतरण कामांची आयुक्तांकडून प्रत्यक्ष पाहणी, वरील तीन मजल्यांच्या कामांना दिली 12 ऑगस्टची डेडलाईन

कोव्हीडच्या संभाव्य तिस-या लाटेची तीव्रता कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्याकडे व त्यादृष्टीने आरोग्य सुविधा निर्मिती करण्याकडे महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर बारकाईने लक्ष देत आहेत. या अनुषंगाने त्यांनी आज महानगरपालिकेच्या ऐरोली व नेरूळ येथील सार्वजनिक रूग्णालयांना भेट देत त्याठिकाणी कोव्हीड रूग्णांसाठी करण्यात येत असलेल्या प्रत्येकी 200 आयसीयू बेड्स निर्मिती कामांची प्रत्यक्ष पाहणी केली.

याप्रसंगी शहर अभियंता श्री. संजय देसाई तसेच राजमाता जिजाऊ रूग्णालय, ऐरोलीच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ. वर्षा राठोड व माँसाहेब मिनाताई ठाकरे रूग्णालय, नेरूळचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. रावसाहेब पोटे तसेच ऐरोलीचे स्थापत्य कार्यकारी अभियंता श्री. गिरीश गुमास्ते व विद्युत कार्यकारी अभियंता श्री. प्रवीण गाढे आणि नेरूळचे स्थापत्य कार्यकारी अभियंता श्री. सुभाष सोनावणे व विद्युत कार्यकारी अभियंता श्री. सुनिल लाड आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

ऐरोलीच्या राजमाता जिजाऊ रूग्णालयात सध्या चौथ्या व पाचव्या मजल्यावर तसेच नेरूळ येथील माँसाहेब मिनाताई ठाकरे रूग्णालयात सध्या पाचव्या, सहाव्या व सातव्या मजल्यावर आयसीयू कक्ष निर्मितीचे काम सुरू असून या कामांची प्रत्यक्ष पाहणी करीत आयुक्तांनी 12 ऑगस्टपर्यंत 24 तास तिन्ही शिफ्टमध्ये काम सुरू ठेवून स्थापत्य, विद्युत आणि ऑक्सिजन पाईपलाईनचे काम पूर्ण करावे असे निर्देश दिले. या तिन्ही बाबींबाबत परस्पर समन्वय ठेवून वेळेत कामे पूर्ण करून घेण्याची जबाबदारी संबंधित कार्यकारी अभियंत्यांची आहे असे स्पष्ट करीत आयुक्तांनी रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षकांनी आपल्या रूग्णालयात सुरू असलेले काम योग्य प्रकारे होत असल्याची नियमित लक्ष ठेवून खात्री करून घ्यावी व आवश्यक असलेले बदल काम सुरू असतानाच करून घ्यावेत असेही निर्देशित केले. या गोष्टींना समांतरपणे ट्रान्सफॉर्मर बसविणे व त्याविषयीच्या मंजूरीची कार्यवाहीदेखील 12 ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचेही निर्देश आयुक्तांनी दिले.

सुविधा निर्मितीची कामे करताना वापरण्यात येणा-या साहित्याचा दर्जा उत्तम असेल याची खात्री करून घ्यावी तसेच करण्यात येत असलेले कामही गुणवत्तापूर्ण राहील याची दक्षता घ्यावी आणि त्यातही विशेषत्वाने विद्युत वायरींगची कामे करताना अधिक काळजी घ्यावी असे स्पष्ट करीत आयुक्तांनी स्थापत्य व विद्युत साहित्याची प्रत्यक्ष पाहणी केली.

दोन्ही रूग्णालयांमध्ये वरच्या मजल्यांवरील सुरू असलेली कामे 12 ऑगस्टपर्यंत जलदरित्या पूर्णत्वास न्यावीत व नंतर खालच्या मजल्यांवरील कामे सुरू करावीत असे निर्देश देत आयुक्तांनी प्रत्येक गोष्ट पारखून घ्यावी व गतीने करावी अशा दोन्ही बाबी तितक्याच महत्वाच्या असल्याचे स्पष्ट केले.

कोव्हीडच्या दुस-या लाटेमध्ये आयसीयू बेड्स व व्हेटिलेटर्सची मोठ्या प्रमाणावर कमतरता भासली होती हे लक्षात घेऊन इतर देशांतील तिस-या लाटेचा अभ्यास करता तसेच आरोग्य तज्ज्ञांनी याबाबत मांडलेली मते विचारात घेता तिस-या लाटेची तीव्रता अधिक असेल असे अनुमान मांडण्यात आले आहे व त्यामध्ये मुले बाधित होण्याचे प्रमाण अधिक असेल असेही निष्कर्ष मांडण्यात आले आहेत.

या अनुषंगाने तिस-या लाटेला सक्षमपणे सामोरे जाण्यासाठी नमुंमपा वैद्यकीय टास्क फोर्समधील डॉक्टर्स तसेच शहरातील बालरोग तज्ज्ञांशी विचारविनीमय करून त्यानुसार आरोग्य सुविधा निर्मितीची कार्यवाही महानगरपालिकेने सुरू केलेली आहे. त्यामध्ये महानगरपालिकेची नेरूळ व ऐरोली या दोन्ही रूग्णालयांचे कोव्हीड रूग्णालयांच्या दृष्टीने रूपांतरण करण्यात येत असून त्याठिकाणी प्रत्येकी 200 आयसीयू बेड्सची उभारणी केली जात आहे. यामध्ये प्रत्येक रूग्णालयात कोरोनाबाधित मुलांसाठी 80 बेड्सचा पेडियाट्रिक वॉर्ड तसेच कोरोनाबाधित गर्भवती व प्रसूती झालेल्या महिलांसाठी 50 बेड्सचा विशेष वॉर्ड निर्माण केला जात आहे. महत्वाचे म्हणजे ही दोन्ही रूग्णालये प्रत्येकी 200 आयसीयू बेड्स व व्हेंटिलेटर्स सुविधेने परिपूर्ण होत असल्याने कोव्हीडनंतर या रूग्णालयांचा वापर सर्वच आजारांवरील उपचारांसाठी होणार असल्याने याव्दारे महानगरपालिकेची ही दोन्ही रूग्णालये आरोग्यदृष्ट्या सक्षम होणार आहेत.

कोव्हीडच्या तिस-या लाटेला सामोरे जाण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका नियोजनबध्द पावले उचलत असून महापालिका आयुक्त या अनुषंगाने होणा-या प्रत्येक बाबीकडे काटेकोर लक्ष देत आहेत. आजचे दोन्ही रूग्णालयांच्या पाहणी दौ-यांतून दिलेल्या निर्देशाच्या अनुषंगाने झालेल्या कामांचा पुन्हा सात दिवसांनतर आढावा घेणार असल्याचे आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी स्पष्ट केले असून यामुळे कामांना गती लाभणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button