सेक्टर 30 ए वाशी येथील हाऊस ऑफ लॉर्ड्स पबवर धडक कारवाई: नवी मुंबईमध्ये सर्रास चार नंतर दुकाने चालू असताना दिसतात, प्रशासन अशा प्रत्येक ठिकाणी कारवाई करेल का ?
-कोव्हीड नियमांच्या उल्लंघनापोटी मागील 15 दिवसात 22 लक्ष 88 हजार दंडात्मक रक्कम वसूल
-सेक्टर 30 ए वाशी येथील हाऊस ऑफ लॉर्ड्स पबवर धडक कारवाई करीत 50 हजार दंडवसूली
कोव्हीडचा प्रतिबंध रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ‘लेव्हल ऑफ रेस्ट्रिक्शन ऑफ सेफ महाराष्ट्र’ आदेशानुसार जाहीर करण्यात आलेल्या प्रतिबंधाच्या 5 स्तरांमध्ये नवी मुंबई महानगरपालिका तिस-या स्तरात आहे. त्यास अनुसरून दुकाने व आस्थापना यांना सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी आहे. तशा प्रकारचे महापलिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या स्वाक्षरीचे आदेश नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत जारी करण्यात आलेले आहेत. तथापि निर्धारित कालावधीनंतरही दुकाने / आस्थापना सुरू ठेवून आदेशाचे उल्लंघन करणा-यांविरोधात महानगरपालिकेच्या दक्षता पथकांमार्फत दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
अशाच प्रकारची कारवाई सेक्टर 30 ए, वाशी येथील हाऊस ऑफ लॉर्ड्स पबवर 24 जुलै रोजी रात्री 11 वा. नंतर करण्यात आली असून रू. 50 हजार दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली आहे. 10 जुलैपासून मागील पंधरवड्यात 31 विशेष दक्षता पथकांनी तसेच 8 विभाग कार्यालय स्तरावरील दक्षता पथकांनी 2442 व्यक्ती / दुकानदार यांच्यावर मास्क, सुरक्षित अंतर, थुंकणे त्याचप्रमाणे 4 वा. नंतर दुकाने / आस्थापना सुरू ठेवणे अशा प्रकारची प्रतिबंधात्मक कारवाई करीत 22 लक्ष 88 हजार 300 इतकी दंडात्मक रक्कम वसूल केलेली आहे.
नवी मुंबई महानगरपलिकेच्या दक्षता पथकांनी 29 एप्रिल 2020 पासून कोव्हीड वर्तन नियमांचे उल्लंघन करणा-या 70583 व्यक्ती / आस्थापना यांच्याकडून 3 कोटी 56 लक्ष 59 हजार 150 मात्र इतक्या रक्कमेचा दंड वसूल केलेला आहे. यामध्ये मास्कच्या कारवाईपोटी 29943 व्यक्तींकडून 1 कोटी 50 लक्ष 18 हजार, सुरक्षित अंतर व वेळेच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे 2804 आस्थापनांकडून 1 कोटी 16 लक्ष 44 हजार 900 आणि सुरक्षित अंतर नियमाचे उल्लंघन केल्यामुळे 36776 व्यक्तींकडून 78 लक्ष 56 हजार 650 आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकणे यामुळे 1160 व्यक्तींकडून 11 लक्ष 39 हजार 600 इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली आहे.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात जारी करण्यात आलेल्या ‘लेव्हल ऑफ रेस्ट्रिक्शन ऑफ सेफ महाराष्ट्र’ प्रतिबंधात्मक आदेशानुसार सोमवार ते शुक्रवार या दिवशी दुकाने / आस्थापना 4 वाजल्यानंतर सुरु असल्यास पहिल्या वेळेस रु.10 हजार इतकी दंडात्मक रक्कम आकारण्यात येईल तसेच रेस्टॉरंट / बार / पब 4 वाजल्यानंतर सुरु असल्यास रु.50 हजार इतकी दंडात्मक रक्कम आकारण्यात येईल असे नमूद करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे नियमांचे दुस-या वेळेस उल्लंघन झाल्यास सदर आस्थापना 7 दिवसांकरिता बंद ठेवण्याची कारवाई करण्यात येईल. त्याचप्रमाणे तिस-या वेळेस नियमांचे उल्लंघन केल्यास सदर आस्थापना कोरोना महामारीची अधिसूचना संपुष्टात येईपर्यत बंद ठेवण्याची कारवाई करण्यात येईल असे स्पष्टपणे नमूद आहे.
अशाप्रकारे दुस-यांदा नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळलेली ऐरोली, सेक्टर 6 येथील 2 दुकाने सील करण्यात आलेली आहेत. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दुकाने / आस्थापना यांच्या प्रमुखांनी दुकाने सुरू ठेवण्यासाठी 4 वाजेपर्यंत दिलेल्या सवलतीचा योग्य प्रकारे लाभ घेऊन नियमांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावयाची आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या विशेष दक्षता पथकांमार्फत कोव्हीड प्रतिबंधाचे नियम पालन होत आहे की नाही याकडे बारकाईने लक्ष दिले जात आहे.
कोव्हीड नियमावलीचे उल्लंघन हे व्यक्तीगत आणि सामाजिक आरोग्याला हानी पोहचविणारे असून अशा नियमांचे उल्लंघन करणा-या व्यक्तींना समज मिळावी हा दंडात्मक कारवाईचा मुख्य हेतू आहे. तरी नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून कोव्हीडचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सवलतींसह जारी करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक आदेशातील नियमांचे काटेकोर पालन करावे आणि कोव्हीड अनुरूप वर्तन (Covid Appropriate behaviour) ठेवून संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
2 Attachments