महाराष्ट्र

बंदीनंतर १ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या मासेमारीसाठी ससुनडॉक, करंजा-मोरा-कसारा बंदरात हजारो मच्छीमार बोटींची लगबग !

उरण प्रतिनिधी (दिनेश पवार) : एक जुनपासुन शासनाच्या खोल समुद्रातील पावसाळी मासेमारी बंदीनंतर १ ऑगस्टपासुन मासेमारीला सुरुवात होणार आहे. पर्सियन नेट फिशिंग आणि खोल समुद्रातील मासेमारी या दोन्ही प्रकारातील सुरु होणार्‍या मासेमारीसाठी करंजा-मोरा-कसारा, ससुनडॉक बंदरात हजारो मच्छीमार बोटींची लगबग सुरु झाली आहे.

समुद्रातील ३५ ते ४० वाव पुष्ठभागावरील मासेमारीला पर्सियन नेट फिशिंग म्हणतात. तर ५० ते ७० वाव खोल समुद्रात मासेमारी केली जाते, खोल समुद्रातील मासेमारीला डीप फिशिंग म्हटले जाते. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासुनच खवळलेला समुद्र शांत होतो. निरव शांत झालेल्या सागरात पर्सियन नेट फिशिंगसाठी विशेषता नारळी पोर्णिमेनंतर पोषक वातावरण असते. राज्यभरातील लाखो मच्छीमार खोल समुद्रातील आणि पर्सियन फिशिंग या दोन प्रकारातील मासेमारी मोठ्या प्रमाणात करीत असतात.

समुद्राच्या पुष्ठभागावरील ४ ते ५ कि.मी. परिघातील परिसरात ३५ ते ४० वाव खोलीपर्यत पर्सियन नेट फिशिंग केली जाते. गोल परिघातील सर्कलमध्ये शिशाच्या गोळ्या बांधलेली जाळी समुद्रात सोडली जातात. गोळाकार सर्कल सिल केल्यानंतर समुद्राच्या पुष्ठभागावरील विविध प्रकारातील तरंगती मासळी अलगद जाळ्यात अडकली जाते. त्यानंतर यंत्राच्या साहाय्याने जाळी मच्छीमार बोटीत खेचली जातात. यामध्ये घोळ, काटबांगडे, मुशी, तकला, सुरमय,शिंगाला, तुणा, हलवा, तांब, पाखट यासारखी समुद्राच्या पुष्ठभागावरील तरंगती मासळी पकडली जाते.

खोल समुद्रातील मासेमारीसाठीही ससूनडॉक, कसारा-मोरा-करंजा बंदरात शेकडो मच्छीमारी ट्रॉलर्स सज्ज झाले आहेत. खोल समुद्रातील मासेमारीसाठी मच्छीमारांना ५० ते ७० वाव खोल समुद्रात जावे लागते. त्यासाठी एका ट्रिपसाठी १० ते १२ दिवस खर्ची घालावे लागतात. खोल समुद्रातील एका ट्रिपसाठी सव्वा ते दीड लाखापर्यत खर्च येतो. समुद्राच्या तळाशी असलेली सर्वच प्रकारची मासळी या पध्दतीत पकडली जाते. चांगल्या प्रतीची निर्यात करण्यायोगी असलेली मासळी खोल समुद्रातील मासेमारीत मिळत असल्याने या पध्दतीच्या मच्छीमारांची संख्या सर्वाधिक आहे.

कोट

१ ऑगस्ट पासूनच मासेमारी सुरू होणार आहे. मात्र मच्छीमार आठ दिवसांपासूनच मासेमारीसाठी तयारीला लागले आहेत. बोटींच्या डागडूजी, रंगरंगोटी आणि इतर तत्सम कामांची मोरा-करंजा-कसारा, ससुनडॉक विविध मच्छीमार बंदरात लगबग सुरु झाली आहे. १ ऑगस्ट पासुनच मच्छीमार बोटींना डिझेलचा कोटा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे डिझेल भरण्यासाठी मच्छीमार बोटींची कसारा आणि ससुनडॉक बंदरात गर्दीला सुरुवात झाली आहे. डिझेल, आवश्यक साधन-सामुग्री उपलब्ध होताच तात्काळ हजारो मच्छीमार बोटी १ ऑगस्टपासून मासेमारीसाठी रवाना होणार असल्याची माहीती करंजा मच्छीमार संस्थचे अध्यक्ष भालचंद्र कोळी यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button