अंथरूणाला खिळलेल्या बेडरिडन रूग्णांचे कोव्हीड लसीकरण:
समाजातील विविध घटक कोव्हीड लसीकरणाच्या कक्षेत यावेत अशाप्रकारे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नियोजन करण्यात येत आहे. यामध्ये जे रूग्ण अंथरूणाला खिळलेले आहेत असे बेडरिडन रूग्ण लसीकरणापासून वंचित राहू नयेत याची काळजी घेत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार त्यांच्या घरी जाऊन लसीकरण करण्यास सुरूवात करण्यात आलेली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने यापूर्वी बेघर निराधार नागरिक, तृतीयपंथी व्यक्ती तसेच रेड लाईट एरिया, कॉरी क्षेत्र अशा दुर्लक्षित ठिकाणी लसीकरण करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या संपर्कात येणा-या केमिस्ट, रेस्टॉरंट, सलून, ब्युटीपार्लर, पेट्रोलपंप येथील कर्मचारी, रिक्षा-टॅक्सी ड्रायव्हर, सोसायटी वॉचमन अशा पोटँशिअल सुपरस्प्रेडर्सचेही लसीकरण करण्यात येत आहे. त्यामध्ये आता अंथरूणाला खिळलेल्या व्याधीग्रस्त बेडरिडन रूग्णांच्या लसीकरणाला सुरूवात करण्यात आलेली आहे.
बेडरिडन रूग्णांच्या लसीकरणाबाबत सर्व महानगरपालिका नागरी आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी यांना महापालिका आयुक्तांमार्फत आदेश निर्गमित करण्यात आले असून त्यानुसार वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील बेडरिडन रूग्णांची माहिती घ्यावयाची आहे. सदर बेडरिडन रूग्णावर उपचार करीत असलेल्या वैद्यकीय तज्ज्ञांचे प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर नागरी आरोग्य केंद्रातील विशेष लसीकरण पथकाव्दारे त्या बेडरिडन रूग्णाच्या घरी जाऊन त्याचे लसीकरण करण्यात येणार आहे.
कोव्हीड लसीकरणामध्ये कोणताही घटक दुर्लक्षित राहू नये याची काळजी घेत लसींच्या उपलब्धतेनुसार लसीकरणाचे दैनंदिन नियोजन केले जात आहे. तरी एखाद्या कुटुंबात बेडरिडन रूग्ण असल्यास त्यांच्या लसीकरणासाठी नागरिकांनी नजिकच्या महापालिका नागरी आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा अथवा महानगरपालिकेच्या कोव्हीड कॉल सेंटरच्या 022-27567460 या क्रमांकावर संपर्क साधून बेडरिडन रूग्णाची माहिती द्यावी असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.