नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये “सार्वजनिक गणेशोत्सव 2021” मार्गदर्शक सूचना:
1)सार्वजनिक गणेशोत्सवासाठी, गणेशोत्सव मंडळांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या धोरणानुसार यथोचित पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील.
2)कोविड -19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता, नवी मुंबई महानगरपालिका तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाचे मंडपाबाबतचे धोरण यांच्याशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत. या वर्षीचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक गणपतीची सजावट करताना त्यात भपकेबाजी नसावी.
3)श्री गणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळाकरीता 4 फूट व घरगुती गणपती करिता 2 फूटांच्या मर्यादेत असावी.
4)यावर्षी शक्यतो पारंपारिक गणेशमूर्ती ऐवजी घरातील धातू / संगमरवर आदी मुर्तीचे पूजन करावे. मूर्ती शाडुची / पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रीम स्थळी विसर्जन करण्यात यावे.
5)उत्सवाकरीता वर्गणी / देणगी स्वेच्छेने दिल्यास त्याचा स्विकार करावा. जाहिरातीच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पहावे. तसेच आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी.
6)सांस्कृतिक कार्यक्रमाऐवजी आरोग्य विषयक उपक्रम / शिबिरे (उदा. रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याव्दारे कोरोना, मलेरिया, डेंग्यु इ. आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी.
7)लागू करण्यात आलेले Level Of Restriction For Breaking The Chain बाबत वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार इतर निर्बंध कायम राहतील. त्यामध्ये गणेशोत्सवानिमीत्त कोणतीही शिथीलता देता येणार नाही.
8)आरती, भजन, किर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे व तरतूदींचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.
9)श्रीगणेशाचे दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादीव्दारे उपलब्ध करून देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करावी.
10)गणपती मंडपामध्ये निर्जतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रिनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी शारिरिक अंतराचे (फिजीकल डिस्टन्सींग) तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनिटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.
11)श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणूका काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपारिक पध्दतीत विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबाव . लहान मुले आणि वरिष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनस्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळीतील / इमारतीतील सर्व घरगुती गणेशमूर्तीच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढण्यात येऊ नयेत.
12)कोविड -19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहीत केलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. तसेच या परिपत्रकानंतर जरी गणेशोत्सव प्रत्यक्ष सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत काही सूचना नव्याने प्रसिध्द झाल्यास त्याचे देखील अनुपालन करावे.
सदरहू परिपत्रकाची अंमलबजावणी करण्यास कोणत्याही व्यक्ती / संस्था / सार्वजनिक मंडळे यांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांचे विरुध्द यथास्थिती आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 मधील कलम 51 ते 60, साथरोग नियंत्रण अधिनियम, 1897 व भारतीय दंड संहिता, 1860 मधील कलम 188 नुसार दंडनीय / कायदेशिर कारवाई करण्यात येईल. सदर परिपत्रकाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी.
जाहिरात