नमुंमपा शाळांचा माध्यमिक शालांत (एस.एस.सी.) परीक्षेचा निकाल 99.92 टक्के राजर्षी शाहू महाराज विद्यालय, आंबेडकरनगर, राबाडेची सृष्टी सावंत 98 टक्के गुणांसह सर्वप्रथम
यावर्षी कोव्हीडच्या दुस-या लाटेच्या पार्श्वभूमीवर कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावीच्या प्रत्यक्ष परीक्षा न घेता विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनच्या आधारे निकाल जाहीर केला असून नवी मुंबई महानगरपालिकेच्या 19 शाळांचा निकाल 99.92 टक्के इतका जाहीर झालेला आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या एकूण 19 माध्यमिक शाळांमधून 18 शाळांचा निकाल 100 टक्के असून महापे शाळेचा निकाल 95.91 टक्के इतका आहे. एसएससीच्या 2503 विद्यार्थ्यांमधून 2501 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व महापे शाळेतील 2 विद्यार्थी अनुपस्थित आहेत. या यशस्वी विद्यार्थ्यांमधून 776 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य श्रेणी संपादन केलेली असून 928 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी संपादन केलेली आहे.
यामध्ये, डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर, राबाडा येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालय शाळा क्र. 104 मधील सृष्टी राजाराम सावंत ही विद्यार्थिनी 98 टक्के गुण संपादन करून नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांतील 2503 विद्यार्थ्यांमध्ये सर्वोत्तम गुणांची मानकरी ठरली. याच शाळेची विद्यार्थिनी लक्ष्मी सुधाकर पटेल हिने 97.60 टक्के इतके व्दितीय क्रमांकाचे सर्वोत्तम गुण संपादन केले तसेच नमुंमपा शाळा क्र. 105, घणसोलीचा विद्यार्थी अभिषेक सतेंद्र सहानी याने 97 टक्के इतके तृतीय क्रमांकाचे गुण संपादन केले.
कोरोना प्रभावित काळात नवी मुंबई महानगरपालिका शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षकवृंदाने शिक्षणाचे व मूल्यांकनाचे काम उत्तम रितीने पार पाडल्याचे नमूद करीत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्या आहेत.
जाहिरात