नवी मुंबई

आता येणार अनधिकृत बांधकामांवर तसेच अतिक्रमणामुळे होणाऱ्या अडथळ्यांवर अंकुश:

अनधिकृत बांधकामांवर प्रभावी अंकुश ठेवण्यासाठी आयुक्त श्री. अभिजीत बांगर घेणार नियमित आढावा, अपेक्षेप्रमाणे कामगिरी न झाल्यास कारवाईचा इशारा:

विनापरवानगी बांधण्यात येणा-या अनधिकृत बांधकामांमुळे शहराला बकाल स्वरुप प्राप्त होते हे लक्षात घेऊन माफिया वृत्तीने अनधिकृत बांधकामे करणा-यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी दिले. 22 जून रोजी घेतलेल्या अतिक्रमण विभागाच्या आढावा बैठकीमध्ये दिलेल्या निर्देशांच्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीचा विभागनिहाय आढावा घेत आयुक्तांनी तक्रार आल्यावर कारवाई करण्याऐवजी विभागातील घडामोडींकडे जागरूकतेने लक्ष देत अशाप्रकारची अनधिकृत बांधकामे सुरु असल्याचे आढळल्यास धडक कारवाई करावी असे निर्देश दिले.

याबाबत काही तक्रार प्राप्त झाल्यास संबंधीत अधिका-यांना जबाबदार धरण्यात येईल असेही आयुक्तांनी स्पष्ट केले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे, अतिक्रमण विभागाचे उप आयुक्त श्री. अमरिश पटनिगिरे तसेच सर्व विभागांचे अतिक्रमण विभागाचे अभियंते आणि वेबसंवादाव्दारे सर्व विभागांचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी उपस्थित होते.

यावेळी सादर माहितीनुसार 1 जून पासून महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 54 अन्वये 97 अनधिकृत बांधकामांना नोटीसा बजाविण्यात आल्या असून नोटीशींना विहित कालावधीत प्रतिसाद न देणा-या 48 अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आलेली आहे. मागील बैठकीतील सादर केलेली अतिक्रमण विरोधी नोटीसा व कारवाईची आकडेवारी आणि त्यानंतरच्या कालावधीतील कारवाईची आकडेवारी यांचा विभागनिहाय तुलनात्मक आढावा घेताना नाराजी व्यक्त करीत आयुक्तांनी विभागीय क्षेत्रात अधिक जागरुकतेने सर्वेक्षण करण्याचे निर्देश विभाग अधिकारी यांना दिले. अतिक्रमण विभागाच्या अभियंत्यांनी आपल्या क्षेत्रात फिरत राहून अनधिकृत बांधकामाबाबत दक्ष रहावे व नवीन अनधिकृत बांधकामे होणारच नाहीत याची दक्षता घ्यावी तसेच होत असलेल्या बांधकामांवर महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 अन्वये नोटीसा बजावून कायदेशीर कारवाई करावी असे आयुक्तांनी आदेशित केले.

अनधिकृत बांधकामे रोखण्यासाठी प्रत्येक विभागामाध्ये स्वतंत्र यंत्रणा असूनही अनधिकृत बांधकामे राजरोसपणे होत असल्याचे, एवढेच नव्हे तर काही ठिकाणी अनधिकृत पध्दतीने बहुमजली इमारती उभारल्या जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत याबद्दल आयुक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

अनधिकृत बांधकामांवर होणा-या कारवाईमध्ये सातत्य असणे गरजेचे असल्याचे नमूद करीत संपूर्ण यंत्रणेला गृहित धरून किंवा संबंधितांच्या सोयीस्कर दुर्लक्षामुळे जर अनधिकृत बांधकामे फोफावत असतील तर जबाबदारी निश्चित केली जाईल असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत अनधिकृत बांधकामांच्या ठिकाणी नागरिकांच्या माहितीसाठी जनजागृतीपर फलक ठळकपणे प्रदर्शित करावेत व ते काढून टाकले जाणार नाहीत याकडेही काटेकोर लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले. सिडको व एमआयडीसीच्या जागांवरही अनधिकृत बांधकाम होऊ नये याबाबतही दक्ष राहण्याचे स्पष्ट करण्यात आले.

अतिक्रमण विरोधी कारवाई सर्वांना समान न्याय या पध्दतीने व्हावी याचे भान ठेवून काम करावे व अशा बांधकामांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे आढळल्यास अशा अधिकारी, कर्मचा-यांवर कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी दिले.

रस्ते व पदपथ हे नागरिकांना चालण्यासाठी व रहदारीसाठी असून त्यावर कोणत्याही प्रकारच्या अतिक्रमणामुळे अडथळा चालणार नाही असे स्पष्ट करीत कोरोना प्रतिबंधात्मक आदेशानुसार सायंकाळी 4 नंतर दुकाने बंद होऊन सायंकाळी 5 पासून संचारबंदी लागू होत असल्याने फेरीवाल्यांनाही प्रतिबंध आहे याबाबत दक्ष राहण्याचे आयुक्तांनी निर्देशित केले.

धोकादायक इमारतींची यादी नवी मुंबई महानगरपालिकेने जाहीर केली असून अतिधोकादायक इमारतींव्यतिरिक्तही इतर धोकादायक इमारतींबाबत दक्ष राहण्याचे निर्देश सर्व विभाग अधिकारी यांना देण्यात आले.

अनधिकृत बांधकामांमुळे शहराच्या नियोजनबध्द विकासाला बाधा पोहचते तसेच नागरी सुविधांवर ताण पडतो तसेच अशा इमारतींमध्ये पैसे गुंतविणा-या नागरिकांचीही मोठ्या प्रमाणावर आर्थिक हानी होते. त्यादृष्टीने अतिक्रमण विभागाची जबाबदारी मोठी असून तशा प्रकारचे काम झाले पाहिजे व विभागाचे अस्तित्व जाणवले पाहिजे असे स्पष्ट करीत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी अतिक्रमण विभागामार्फत केलेल्या कामकाजाचा नियमित आढावा घेतला जाईल व हलगर्जीपणा आढळल्यास कारवाई केली जाईल असे सूचित केले.

जाहिरात

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button