2 ऑगस्ट रोजी नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात लोकशाही दिनाचे आयोजन:
2 ऑगस्ट रोजी नवी मुंबई महानगरपालिका लोकशाही दिन
महाराष्ट्र शासन निर्देशानुसार नवी मुंबई महानगरपालिका स्तरावर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते.
कोव्हीड -19 संसर्ग पसरू नये म्हणून सुरक्षित अंतर नियमाचे पालन करण्याकरिता जनहितार्थ लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आलेले नाही. तथापि शासनाने स्तरांनुसार नवीन प्रतिबंधात्मक नियमावली जारी केली असल्याने शासन परिपत्रकाद्वारे लोकशाही दिन आयोजित करणेबाबत सूचना निर्गमित केलेल्या आहेत.
यामध्ये लोकशाही दिनाचे आयोजन परिस्थितीनुरूप व शक्य असल्यास दूरचित्रवाणी परिषदेव्दारे करणे अथवा ज्या ठिकाणी कोव्हीड-19 चा प्रादुर्भाव कमी व अर्जदारांना कार्यालयात बोलविणे शक्य असेल त्या ठिकाणी सार्वजनिक आरोग्याच्या अनुषंगाने शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन केल्यानंतरच अर्जदारांना मर्यादित संख्येत समक्ष बोलावून लोकशाही दिनाचे आयोजन करणेबाबत सूचना निर्गमित केलेल्या आहेत.
त्यानुसार माहे ऑगस्ट महिन्याचा लोकशाही दिन महिन्याच्या पहिल्या सोमवारी दि. 02 ऑगस्ट 2021 रोजी होणार असून निवेदनकर्त्यांनी आपला अर्ज विहित नमुन्यात दोन प्रतींमध्ये दि. 16 जुलै 2021 पर्यंत मा. आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका यांचे नावे ‘लोकशाही दिनाकरीता अर्ज’ असे अर्जाच्या वरील दर्शनी भागी ठळकपणे नमूद करुन सादर करावयाचा आहे.
सदर अर्जात नमूद तक्रार / निवेदन हे वैयक्तिक स्वरुपाचे असावे. अर्ज एकाच विभागाशी संबंधित एकाच विषयाबाबत असावा. अर्जादाराने संबंधित विषयाबाबत याआधी विभाग कार्यालय, विभागप्रमुख स्तरावर निवेदन सादर केलेले असावे. याशिवाय लोकशाही दिनामध्ये – न्यायप्रविष्ट प्रकरणे, राजस्व/अपिल, सेवाविषयक – आस्थापनाविषयक बाबी याबाबतचे अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची नोंद घेण्यात यावी. त्याचप्रमाणे विहित नमुन्यात नसणारे व अर्जासोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्जही स्विकारले जाणार नाहीत. तसेच तक्रार / निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नसेल तर तसेच यापूर्वीच अंतिम उत्तर दिलेले आहे / देण्यात येणार आहे अशा प्रकरणी पुन्हा त्याच विषयासंदर्भात केलेले अर्जही स्विकारले जाणार नाहीत. तसेच कोणत्याही राजकीय पक्षाच्या / लोकप्रतिनिधीच्या / संस्थेच्या लेटर हेडवरील अर्ज स्विकारला जाणार नाही याचीही नागरिकांनी नोंद घ्यावी असे सूचित करण्यात येत आहे.
लोकशाही दिनाकरीता करावयाच्या अर्जाचा विहित नमुना नवी मुंबई महानगरपालिकेचे संकेतस्थळ (Website) https://www.nmmc.gov.in यावरील डाऊनलोड आयकॉनवरून अर्ज नमुना प्रत सहजपणे डाऊनलोड करुन घेता येऊ शकते याची नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.
जाहिरात