शाडूच्या गणेश मूर्तींना पसंती: यंदा साधेपणाने गणेशोत्सव साजरा होणार
उरण (दिनेश पवार); कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साजरा करताना शासनाने काही नियम आणि अटी आखून दिल्या आहेत. त्यानुसार गणेश मंडळांनी शासनाच्या आदेशानुसार ४ फुट पेक्षा कमी उंचीच्या मूर्ती बसवाव्यात असे आवाहन राज्य सरकारने केले आहे. तसेच मिरवणुका काढू नये, मंडळाच्या परिसरात मूर्तीचे विसर्जन तर घरगुती गणपतींचे घरीच विसर्जन करावे असे अवाहन देखील करण्यात आले आहे. यंदा प्लास्टर ऑफ पॅरिस ची मूर्ती पेक्षा शाडूच्या मूर्तीला उरण मध्ये गणेश भक्तांची मागणी मोठ्या प्रमाणात आहे.
१० सप्टेंबर (गणेश चतुर्थी) ते १९ सप्टेंबर (अनंत चतुदर्शी) या काळात राज्यात सार्वजनिक आणि घरगुती गणेशोत्सव साजरा केला जाईल, सदर गणेशोत्सव साजरा करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आली आहेत. गणेशोत्सवास थोडेच दिवस राहिल्याने उरण तालुक्यात चिरनेर, करंजा, मुलेखंड, केगाव, बोकड वीरा, उरण, डाऊर नगर, करळ, सोनारी आदी ठिकाणी गणपतीचे कारखाने आहे. त्या ठिकाणी कारागीर मूर्ती बनविण्यात मग्न झाले आहेत.
उरण तालुक्यातील डाऊर नगर येथील चिंतामणी कला केंद्र मध्ये ५ वर्षापासून शाडूच्या मातीपासून मूर्ती बनविण्याचे काम सुरू आहे. यंदा घरगुती गणपती २ फुटी व सार्वजनिक गणपती ४ फुटी पर्यंत, शाडूच्या मातीपासून गणेशाची मूर्ती बनविण्यात येणार आहेत. येथे गणपती बनवण्याचे काम जून महिन्यापासून सुरु झाले आहे. त्याचप्रमाणे दुर्गामाता देवीच्या मूर्ती हि येथे बनविल्या जातात. या कामात माझा भाऊ प्रथमेश देसाई मदत करीत आहे, असे चिंतामणी कला केंद्राचे हर्षल विलास देसाई यांनी सांगितले.
गणेश मुर्तीकारांवरील विघ्न अजूनही टळलेले नाही. राज्य शासनाने गतवर्षीप्रमाणे यावर्षीही गणेशोत्सवावर निर्बंध घातल्यामुळे मूर्तिकार चिंतेत आहेत. दरम्यान, घरगुती आणि सार्वजनिक गणेशमूर्तीसाठी २ आणि ४ फूट अशी अट घालण्यात आल्यामुळे मोठ्या मूर्तीचे करायचे काय? असा सवाल उरण तालुक्यातील काही मुर्तीकारांनी उपस्थित केला आहे.
गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवावर कोरोनाचे संकट कायम आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नियमावली जाहीर केली. राज्य सरकारने जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्त्वाप्रमाणे सार्वजनिक गणेशमूर्ती ४ फुटांची, तर घरगुती गणेशमूर्ती २ फुटांची असावी, अशी मर्यादा घालून देण्यात आली आहे.