जेएनपीटी मध्ये माल हाताळणीमध्ये झाली वाढ
– जून महिन्यात 441,984 टीईयू ची केली हाताळणी –
मुंबई, 06 जुलै, 2021: लॉकडाउन निर्बंधांमध्ये शिथिलता आणि देशाच्या अर्थव्यवस्थेस गति आल्याने देशातील प्रमुख बंदर असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) मध्ये माल हाताळणीत वाढ झाली आहे. जेएनपीटी मध्ये जून 2020 च्या 289,292 टीईयूच्या तुलनेत जून 2021 महिन्यात 441,984 टीईयूची माल हाताळणी झाली जी मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 52.78% अधिक आहे. रेल्वे ऑपरेशनच्या बाबतीत, जेएनपीटी मध्ये जून 2021 मध्ये 548 रॅकद्वारे 88,849 टीईयू आयसीडी वाहतूक हाताळणी झाली व बंदराच्या कामगिरीत रेल्वेचा वाटा 20.10% झाला.
वैद्यकीय उपकरणांची हाताळणी करून जेएनपीटीने कोविड-19 च्या दुस-या लाटेचा सामना करण्यातही महत्वाची भूमिका पार पाडली. मागील महिन्यात जेएनपीटीने एमव्ही ह्युंदाई जहाजातुन आलेल्या एकूण 23.8 मेट्रिक टन वैद्यकीय उपकरणे असलेले दोन कंटेनर बंदरात उतरविले. जेएनपीटीच्या एपीएम टर्मिनलने एमव्ही ह्युंदाई हाँगकाँग या जहाजातुन आलेली कोविड-संबंधित औषधोपयोगी उपकरणे बंदरात उतरवली, तसेच एमव्ही मोल गारलँड या जहाजातील वैद्यकीय ऑक्सिजनचे दोन क्रायोजेनिक कंटेनर आणि एमव्ही ह्युंदाई प्लॅटिनम या जहाजातील वैद्यकीय उपकरणे असलेले चार कंटेनर बंदरात उतरविले. याव्यतिरिक्त, एमव्ही सीएमए सीजीएम रिगोलेटो जहाजातुन ही वैद्यकीय उपकरणे असलेले कंटेनर उतरविण्यात आले.
जेएनपीटीच्या या कामगिरीबद्दल बोलताना जेएनपीटीचे अध्यक्ष श्री संजय सेठी, भा.प्र.से. म्हणाले, आम्हाला अभिमान आहे की जेएनपीटीच्या कामगिरीमध्ये सुधारणा झाली असून कोरोनाच्या जागतिक साथीच्या काळातही बंदराची एकूण कंटेनर हाताळणी, कंटेनर वाहतुक आणि व्यवसायामध्ये वाढ होत आहे. आमचे प्रतिभावान आणि कुशल कामगार, सन्माननीय व मौल्यवान भागधारक यांनी यादरम्यान केलेले प्रयत्न अत्यंत प्रशंसनीय आहेत. आम्हाला सदैव सहकार्य करणा-या आमच्या व्यापार भागीदारांनी वैद्यकीय ऑक्सिजन आणि इतर वैद्यकीय उपकरणांची निरंतरपणे हाताळणी व पुरवठा करून देशाच्या आर्थिक विकासमध्ये व कोविड -19 विरुद्ध देशाच्या लढाईत एक प्रमुख योगदानकर्ता म्हणून जेएनपीटीचे स्थान कायम ठेवण्यात मदत केली आहे.”
मागील महिन्यात तंत्रज्ञानाच्या आघाडीवर महत्वपूर्ण प्रगति आणि बंदराची कार्यक्षमता वाढविण्याच्या दृष्टीने आम्ही एनएसआयसीटी व एपीएमटी येथे 2 मोबाइल एक्स-रे स्कॅनर स्थापित केले. जेएनपीटी – अँटवर्प पोर्ट ट्रेनिंग एंड कन्सल्टन्सी फाऊंडेशनने उन्नत कौशल्ये व बंदर क्षेत्रातील सुरक्षा उपायांचे महत्त्व आणि त्यांची वाढती मागणी लक्षात घेऊन “धोकादायक वस्तू व सुरक्षा व्यवस्थापन” या विषयावर ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला.
या उपाययोजनांमुळे जेएनपीटीला प्रगत जागतिक बंदरांच्या समतुल्य बनण्यास मदत होईल ज्यामुळे जगातील आघाडीच्या कंटेनर बंदरांमध्ये जेएनपीटीचे स्थान अधिक मजबूत होईल.
जेएनपीटीविषयी :
जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) हा नवी मुंबई येथील भारतातील सर्वात मोठे कंटेनर हाताळणीचे बंदर आहे. 26 मे 1989 मध्ये या बंदराची स्थापना झाली असून कामकाजाच्या तीनपेक्षा कमी दशकांत जेएनपीटी हे देशातील बल्क-कार्गो टर्मिनलवरून प्रीमियर कंटेनर पोर्ट म्हणून नावारूपाला आले.
सध्या जेएनपीटी येथे पाच कंटेनर टर्मिनल्स कार्यरत आहेत. ज्यामध्ये जवाहरलाल नेहरू पोर्ट कंटेनर टर्मिनल (जेएनपीसीटी), न्हावा शेवा इंटरनॅशनल कंटेनर टर्मिनल (एनएसआयसीटी), गेटवे टर्मिनल्स इंडिया प्रा. लि. (जीटीआयपीएल), न्हावा शेवा इंटरनॅशनल गेटवे टर्मिनल (एनएसआयजीटी) आणि नव्याने स्थापन करण्यात आलेल्या भारत मुंबई कंटेनर टर्मिनल्स प्रायव्हेट लिमिटेड (बीएमसीटीपीएल)चा समावेश आहे. या बंदरात सर्वसाधारण कार्गोकरिता शॅलो वॉटर बर्थ आणि आणखी एक लिक्विड कार्गो टर्मिनल आहे, ज्याचे व्यवस्थापन बीपीसीएल-आयओसीएल कन्सोर्टीयमद्वारे चालते.