महाराष्ट्र

“सर्वांसाठी घरे” या सिडकोच्या ध्येयाची वचनपूर्ती – श्री. एकनाथ शिंदे

“सिडको महामंडळातर्फे बांधण्यात आलेली ही घरे आजूबाजूच्या परिसरातील घरांच्या किंमतीशी तुलना करता अतिशय परवडणाऱ्या दरात उपलब्ध आहेत ही उल्लेखनीय बाब आहे. अतिशय उत्तम बांधकाम दर्जा असेलली ही घरे सर्वसामान्यांचा सिडकोवरील विश्वासास अधिक बळकटी देतात. या गृहनिर्माण योजनेस केंद्र सरकारकडून लागू असलेल्या अनुदानाचा भार सिडको महामंडळाने उचलला आहे. 1 जुलैपासून घराचा ताबा देण्याचे वचन सिडकोने पाळले आहे. ” असे उद्गार श्री. एकनाथ शिंदे, मंत्री, नगरविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) तथा पालकमंत्री, ठाणे जिल्हा यांनी काढले. सिडको महामंडळाच्या 2018-19 महागृहनिर्माण योजनेतील यशस्वी अर्जदारांना सदनिका सुपुर्द करण्याच्या समारंभ प्रसंगी अध्यक्ष म्हणून बोलताना त्यांनी हे उद्गार काढले. या वेळी श्री. एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते यशस्वी अर्जदारांना सदनिका सुपूर्द करण्यात आल्या. सदर कार्यक्रम हा सेक्टर-15, भूखंड क्र. 1 ते 9, पोलीस मुख्यालयामागे, कळंबोली, नवी मुंबई येथे मोजक्या मान्यवरांच्या आणि निवडक अर्जदारांच्या उपस्थितीत व कोविड-19 सुरक्षाविषयक नियमांचे काटेकोरपणे पालन करून पार पडला.

या प्रसंगी श्री. राजन विचारे, खासदार, ठाणे, डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको यांची प्रमुख उपस्थिती तर श्री. अश्विन मुद्गल, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको, श्री. कैलास शिंदे, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको यांची सन्माननीय उपस्थिती लाभली.
या प्रसंगी बोलताना श्री. एकनाथ शिंदे यांनी हजारो कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न साकार होत आहे, ही आनंदाची बाब असून कोविड-19 च्या काळातही सिडकोतील अभियंते व अधिकाऱ्यांनी घरांचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करण्याकडे लक्ष पुरविले. केवळ घर बांधणी व विकास प्रकल्प यात मर्यादित न राहता सिडकोने कोविड काळाच्या संकट समयी शासनाच्या निर्देशानुसार विविध ठिकाणी कोविड सेंटर व रूग्णालयाची उभारणी केली हे कौतुकास्पद आहे असे प्रशंसोद्गार काढले.

या प्रसंगी बोलताना डॉ. संजय मुखर्जी यांनी कोविड-19 महासाथीच्या काळात उद्भवलेल्या अडचणींवर केलेली मात तसेच अर्जदारांना भेडसावणाऱ्या आर्थिक अडचणींचा सहानुभूतीपूर्वक विचार करून अर्जदारांना दिलासा देणारे निर्णय घेतल्याचा उल्लेख केला. यशस्वी अर्जदारांना सदनिका सुपूर्द करण्याचा हा क्षण वचनपूर्तीचा आनंद देणारा आहे. आजपासून यशस्वी अर्जदारांना घरांचा ताबा टप्याटप्याने देण्यात येईल असेही ते म्हणाले.
सिडकोतर्फे प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत सन 2018-19 मध्ये 14,838 घरांची योजना सुरू करण्यात आली. सदर योजने अंतर्गत नवी मुंबईतील घणसोली, खारघर, कळंबोली, तळोजा आणि द्रोणागिरी या 5 नोड्मध्ये 11 ठिकाणी घरे साकारण्यात आली. 14,838 घरांपैकी 5,262 घरे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकासाठी तर 9,576 घरे अल्प उत्पन्न गटासाठी उपलब्ध करून देण्यात आली होती. ही घरे 1 बीएचके (1 हॉल, 1 खोली, 1 स्वयंपाकघर, 2 स्वच्छतागृहे) प्रकारातील असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी उपलब्ध असलेल्या घराचा चटई क्षेत्र 25.81 चौ.मी. तर अल्प उत्पन्न गटाकरिता असलेल्या घराचा चटई क्षेत्र 29.82 चौ.मी. इतका आहे.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी तळोजा येथे 2,862, खारघर येथे 684, कळंबोली येथे 324, घणसोली येथे 528 आणि द्रोणागिरी येथे 864 घरे उपलब्ध करून देण्यात आली होती. अल्प उत्पन्न गटासाठी तळोजा येथे 5,232, खारघर येथे 1,260, कळंबोली येथे 582, घणसोली येथे 954 आणि द्रोणागिरी येथे 1,548 घरे उपलब्ध करून देण्यात आली. या योजनेतील गृहसंकुलांना भारती शास्त्रीय संगीतातील रागांची नावे देण्याची अभिनव कल्पनाही राबविण्यात आली. सदर योजनेची संगणकीय सोडत दिनांक 2 ऑक्टोबर 2018 रोजी यशस्वीरीत्या पार पडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button