नवी मुंबई

संयुक्त सक्रिय कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोध मोहीम व नियमित सनियंत्रण

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत “सक्रीय कुष्ठरुग्ण शोध व नियमित सनियंत्रण” तसेच राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत “सक्रीय क्षयरुग्ण शोध मोहीम” या एकत्रितपणे राबविण्याच्या निर्णय राज्य स्तरावर घेण्यात आला आहे. या संयुक्त्‍ मोहिमेत प्राथमिक अवस्थेतील कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोधून उपचाराखाली आणणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे.

राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रम अंतर्गत प्राथमिक स्थितीत नवीन कुष्ठरुग्ण शोधून त्याला पूर्ण कालावधीत मोफत औषधोपचार देऊन विकृती प्रतिबंध करणे व समाजातील कुष्ठरोग संसर्गाची साखळी खंडित करणे हे या कार्यक्रमाचे ध्येय आहे. या रोगाबाबत समाजात असलेले गैरसमज जनजागृतीव्दारे कमी करता येऊ शकतात हे लक्षात घेऊन कार्यवाही करण्यात येत आहे.

त्याचप्रमाणे राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत्‍ क्षयरोगाची लक्षणे असलेल्या व अद्याप निदान न झालेल्या संशयित क्षयरुग्णांचे थुंकी नमुने व क्ष-किरण तपासणी करुन निदान निश्चितीनंतर त्यांचेवर मोफत औषधोपचार सूरू करणे हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून कोव्हिड महामामारीमुळे उपचारासाठी न आलेल्या संशयित क्षयरुग्णांची निदान निश्चिती करणे हा या कार्यक्रमाचा भाग आहे.

नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील झोपडपट्टी, बांधकाम साईट्स, दगडखाणी इ. अतीजोखमीच्या भागात माहे जुलै 2021 ते ऑक्टोबर 2021 तसेच माहे डिसेंबर 2021 ते मार्च 2022 या कालावधीत सर्वेक्षणाच्या दोन फेऱ्या तर कमी जोखमीच्या भागात माहे जुलै 2021 ते मार्च 2022 या कालावधीत सर्वेक्षणाची एक फेरी आयोजित करण्यात येणार आहे. सदर मोहिमेंतर्गत 151 पथकांच्या माध्यमातून 4,72,911 लोकसंख्येला भेटी देऊन नागरिकांची तपासणी करून जनजागृती करण्यात येणार आहे.

प्रत्येक पथकामध्ये एक आशा स्वयंसेविका व एक पुरूष स्वयंसेवक असणार आहेत. प्रत्येक घरातील महिलांची तपासणी आशांमार्फत आणि पुरुषांची तपासणी पुरूष स्वयंसेवकामार्फत करण्यात येणार आहे. कुष्ठरोगाच्या लक्षणांमध्ये त्वचेवर फिकट / लालसर बधीर चट्टा, जाड, बधीर तेलकट/चकाकणारी‍ त्वचा, त्वचेवर गाठी असणे, कानाच्या पाळया जाड होणे, डोळे पूर्ण बंद न करता न येणे अशा प्रकारची लक्षणे विचारुन तपासणी होणार आहे.

तसेच क्षयरोगासाठी दोन आठवडयांपेक्षा जास्त खोकला, दोन आठवडयांपेक्षा जास्त ताप, वजनात लक्षणीय घट, थुंकीवाटे रक्त येणे, मानेवरील गाठ अशा लक्षणांबाबत विचारणा करण्यात येणार आहे.

यामध्ये कुष्ठरोगाची लक्षणे आढळयानंतर वैदयकिय अधिकारी यांचेकडे निदानाकरीता संदर्भित करण्यात येणार आहे. तर क्षयरोगाची लक्षणे आढऴल्यास 1 तासाच्या अंतराने दोन थुंकी नमुने घेऊन आणि एक्स रे करीता संदर्भित करुन तपासणी अंती निदान निश्चित करण्यात येणार आहे.

सदर मोहिमेमध्ये नागरिकांनी उत्तम प्रतिसाद देऊन स्वत:ची कुष्ठरोगाबाबत तपासणी करुन तसेच क्षयरोगाची लक्षणे आढळल्यास थुंकी नमुने देऊन सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button